श्रीकृष्णाची पूजा करणे
पूजेसाठी लागणारे साहित्य
‘हळद, कुंकू, गंध, शेंदूर, अक्षता, उदबत्ती, वाती, कापूर, रांगोळी, कलश, पंचपात्री, पळी, ३ ताम्हणे, ४ समया (शक्य नसल्यास एक समईसुद्धा चालेल), समईखाली ठेवण्यासाठी ताटली, निरांजन, पंचारती, घंटा, काड्यापेटी, कापसाचे वस्त्र, २ नारळ, २ सुपार्या, ४ विड्याची पाने, ५ प्रकारची फळे अथवा ५ केळी अथवा उपलब्ध होतील तितकी फळे, सुटे पैसे (१ किंवा २ रुपयांची नाणी), १ वाटी गूळ-खोबरे, उदबत्तीचे घर आणि त्याखाली ठेवण्यासाठी ताटली, फुले, हार, बसण्यासाठी पाट किंवा आसन, तुळस, दूर्वा, बेल, समईत घालण्यासाठी तेल, निरांजनात घालण्यासाठी तूप, श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी गोड पदार्थ, उदा. शिरा, पंचखाद्य किंवा खडीसाखर अथवा दूध-साखर.
व्रताचा उपवास करण्यासाठी संकल्प (आदल्या दिवशी)
अष्टमीच्या आदल्या दिवशी म्हणजे सप्तमीला (२५.८.२०२४ या दिवशी) दुपारी १२.४० ते १.४० या वेळेत स्नानादी नित्यकर्म करून पुरुषांनी सोवळे आणि स्त्रियांनी साडी परिधान करून कपाळाला गंध किंवा हळद-कुंकू लावून पूर्व दिशेला मुख करून बसावे.
आचमन
डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी ‘नमः’ हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे.
१. श्री केशवाय नमः । २. श्री नारायणाय नमः । ३. श्री माधवाय नमः । ४. श्री गोविन्दाय नमः ।
चौथे नाव उच्चारतांना ‘नमः’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावेत आणि शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत.
५. श्री विष्णवे नमः । ६. श्री मधुसूदनाय नमः । ७. श्री त्रिविक्रमाय नमः । ८. श्री वामनाय नमः । ९. श्री श्रीधराय नमः । १०. श्री हृषीकेशाय नमः । ११. श्री पद्मनाभाय नमः । १२. श्री दामोदराय नमः । १३. श्री सङ्कर्षणाय नमः । १४. श्री वासुदेवाय नमः । १५. श्री प्रद्मुम्नाय नमः । १६. श्री अनिरुद्धाय नमः । १७. श्री पुरुषोत्तमाय नमः । १८. श्री अधोक्षजाय नमः । १९. श्री नारसिंहाय नमः । २०. श्री अच्युताय नमः । २१. श्री जनार्दनाय नमः । २२. श्री उपेन्द्राय नमः । २३. श्री हरये नमः । २४. श्री श्रीकृष्णाय नमः ।।
पुन्हा आचमनाची कृती करून वरील २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रातील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत.
देवतास्मरण
श्रीमन्महागणाधिपतये नमः । (गणांचा नायक असलेल्या अशा श्री गणपतीला मी नमस्कार करतो.)
इष्टदेवताभ्यो नमः । (माझ्या आराध्यदेवतेला मी नमस्कार करतो.)
कुलदेवताभ्यो नमः । (कुलदेवतेला मी नमस्कार करतो.)
ग्रामदेवताभ्यो नमः । (ग्रामदेवतेला मी नमस्कार करतो.)
स्थानदेवताभ्यो नमः । (येथील स्थानदेवतेला मी नमस्कार करतो.)
वास्तुदेवताभ्यो नमः । (येथील वास्तुदेवतेला मी नमस्कार करतो.)
आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः। (सूर्यादी नवग्रहदेवतांना मी नमस्कार करतो.)
सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । (सर्व देवांना मी नमस्कार करतो.)
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः । (सर्व ब्राह्मणांना (ब्रह्म जाणणार्यांना) मी नमस्कार करतो.)
अविघ्नमस्तु । (सर्व संकटांचा नाश होवो.)
देशकाल
डोळ्यांना पाणी लावून देशकालाचा उच्चार करावा –
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे भारतवर्षे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके क्रोधीनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ श्रावणमासे कृष्णपक्षे अष्टम्यांतिथौ भानुवासरे भरणीदिवसनक्षत्रे ध्रुवयोगे विष्टिकरणे एवङ्गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ
ज्यांना वरील देशकाल म्हणणे कठीण जात असेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा.
तिथीर्विष्णुस्तथा वारं नक्षत्रं विष्णुरेव च ।
योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।
अर्थ : तिथी या विष्णुसमान आहेत, तसेच वार आणि नक्षत्र हेसुद्धा विष्णुच आहेत, त्याचप्रमाणे योग अन् करण यांच्यासह संपूर्ण जगच विष्णुमय आहे.
हातात अक्षता घेऊन पुढील संकल्प म्हणावा –
मम आत्मनः परमेश्वर-आज्ञारूप सकलशास्त्रपुराणोक्त फलप्राप्तिद्वारा श्रीकृष्णप्रीत्यर्थं जयन्तीयोगसत्त्वे जन्माष्टमीव्रतं तन्त्रेण करिष्ये । (‘करिष्ये’ म्हटल्यावर पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन अक्षतांसहित ताम्हणात सोडावे.)
अर्थ : कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी जयंती योग सत्त्वातील जन्माष्ट व्रत पाळीन आणि सर्व शास्त्रे आणि पुराणे यांत सांगितलेली फळे स्वतःसाठी देवाची आज्ञा मानून प्राप्त करून घेईन.
ज्यांना दोन दिवस पूर्ण उपवास करणे शक्य आहे, त्यांनी पंचपात्रामध्ये पाणी घेऊन पुढील श्लोक म्हणावा –
वासुदेवं समुद्दिश्य सर्वपापप्रशान्तये । उपवासं करिष्यामि कृष्णाष्टम्यां नभस्यहम् ।।
अर्थ : सर्व पापांचे क्षालन होण्यासाठी मी श्रावणातील कृष्णाष्टमीला वासुदेवासाठी उपवास करतो.
ज्यांना या दिवशी अन्नरहित उपवास करणे शक्य नसेल, त्यांनी वरील श्लोक न म्हणता पुढील श्लोक म्हणावा –
वासुदेवं समुद्दिश्य सर्वपापप्रशान्तये । फलानि भक्षयिष्यामि कृष्णाष्टम्यां नभस्यहम् ।।
अर्थ : सर्व पापांचे क्षालन होण्यासाठी मी श्रावणातील कृष्णाष्टमीला वासुदेवासाठी केवळ फळ ग्रहण करतो.
आजन्ममरणं यावद्यन्मया दुष्कृतं कृतं । तत्प्रणाशय गोविन्द प्रसीद पुरुषोत्तम ।।
(पंचपात्रातील पाणी पळीने उजव्या हातात घेऊन ताम्हणात सोडावे.)
अर्थ : हे गोविंद, माझ्याकडून जन्मापासून आतापर्यंत जी काही पापे घडली असतील, त्यांच्या क्षालनासाठी हे पुरुषोत्तम, तू प्रसन्न हो.
यानंतर सप्तमीचा पूर्ण दिवस आणि जन्माष्टमीच्या दिवशी यथाशक्ती उपवास करावा.
जन्माष्टमीच्या दिवशी करायची पूजेची मांडणी
जन्माष्टमीच्या दिवशी देवघरामध्ये किंवा पवित्र जागी केळीचे स्तंभ, आंब्याची पाने इत्यादींच्या साहाय्याने पुढीलप्रमाणे किंवा जसे शक्य होईल, तसे देवकीचे सूतिकागृह (प्रसुतीगृह) बनवावे. त्यामध्ये देवकीसाठी पलंगासमान आसन ठेवावे. सूतिकागृहाच्या चारही बाजूंना पांढरा, पिवळा, लाल, हिरवा, अशा विविध रंगांच्या वस्त्रांची सजावट करावी. विविध प्रकारच्या फुलांनी सजावट करावी. विविध प्रकारची फळे ठेवावीत. सूतिकागृहाच्या चारही बाजूंनी दिवे लावावेत. मांगलिक आणि सुशोभित अशा वस्तूंनी सूतिकागृह सजवावे. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे प्रसंग, उदा. गोवर्धनधारण, कालियामर्दन आदी प्रसंगांचे चित्रण ठेवावे. सूतिकागृहाच्या दारावर द्वारपालांना ठेवावे. मूर्तीच्या जवळ पुष्पांजली घेऊन स्तवन करत असलेल्या देवी-देवता, नवग्रह, शेषनाग, वासुकीपासून सर्व नाग, कुबेरादी यक्ष, चित्रकेतूपासून सर्व विद्याधर, इंद्रादी देवता यांच्या प्रतिमा ठेवाव्यात. तलवार हातात घेऊन असलेल्या वसुदेवांची प्रतिमा त्या समवेत ठेवावी. राक्षसांच्या प्रतिमा प्रहार आणि आक्रोश करतांनाच्या असाव्यात. अप्सरा आणि गंधर्व यांना नृत्य-गायन सादर करतांना दाखवावे. वृषभ, गाय, गज यांच्या प्रतिमा आणि यमुना नदी दाखवावी.
हे शक्य नसल्यास केवळ वसुदेव, देवकी, नंद, यशोदा, श्रीकृष्ण, राम, चंडिका या सात प्रतिमा ठेवाव्यात. याप्रमाणे किंवा आपल्या स्थितीनुसार किंवा कुळाचाराप्रमाणे जशा परंपरा असतील, त्याप्रमाणे पूजेची मांडणी करावी.
(देवकी, वसुदेव, यशोदा, नंद आदी सर्व जण पुढे दिलेल्या देवतांच्या रूपात असल्याचे ग्रंथांमध्ये आढळते – देवकी साक्षात् अदितीचे, यशोदा हे दितीचे किंवा काही ग्रंथांच्या मते पृथ्वीचे, बलराम हे शेषनागाचे आणि वसुदेव हे कश्यपमुनींचे, नंद हे दक्षप्रजापतीचे, गर्गाचार्य हे ब्रह्माचे आणि इतर गोप- गोपिका, अप्सरा ही सर्व देवतांचीच रूपे आहेत.)
जर सुवर्ण, रजत, रत्न, ताम्र, पितळ, माती, काष्ठ यांपासून बनवलेली किंवा भिंतीवर काढलेली प्रतिमा असेल, तर तशी किंवा जसा कुलाचार असेल किंवा जशी शक्य असेल, तशी श्रीकृष्णाची सुंदर लक्षण असलेली प्रतिमा त्या सूतिकागृहामध्ये मध्यभागी ठेवावी. त्या सूतिकागृहामधील मुख्य आसनावर एका बाजूला प्रसूत झालेल्या आणि दुग्ध स्त्रवणार्या, अशा देवकीची स्थापना करावी. त्या आसनावर निजलेल्या बालकाची (कृष्णाची) स्थापना करावी. त्या सूतिकागृहामध्येच यशोदामातेची मूर्ती ठेवावी. ज्याप्रमाणे देवकीच्या जवळ भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली, त्याप्रमाणे यशोदामातेच्या जवळ आताच जन्मलेल्या बाळाप्रमाणे कन्येची प्रतिमा ठेवावी.
जन्माष्टमीला रात्री करावयाचे श्रीकृष्णपूजन
यानंतर अष्टमीला (२६.८.२०२४ या दिवशी) अर्धरात्री (साधारण १२.१५ ते १.१५) पूजेच्या वेळेच्या आधी स्नानादी कर्मे करून श्रीकृष्णाच्या पूजेला बसावे.
आचमन
डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी ‘नमः’ हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे.
१. श्री केशवाय नमः । २. श्री नारायणाय नमः । ३. श्री माधवाय नमः । ४. श्री गोविन्दाय नमः ।
चौथे नाव उच्चारतांना ‘नमः’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.
पूजकाने हात पुसावेत आणि ते नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ जोडावेत अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत.
५. श्री विष्णवे नमः । ६. श्री मधुसूदनाय नमः । ७. श्री त्रिविक्रमाय नमः । ८. श्री वामनाय नमः । ९. श्री श्रीधराय नमः । १०. श्री हृषीकेशाय नमः। ११. श्री पद्मनाभाय नमः । १२. श्री दामोदराय नमः । १३. श्री सङ्कर्षणाय नमः । १४. श्री वासुदेवाय नमः । १५. श्री प्रद्मुम्नाय नमः । १६. श्री अनिरुद्धाय नमः । १७. श्री पुरुषोत्तमाय नमः । १८. श्री अधोक्षजाय नमः । १९. श्री नारसिंहाय नमः । २०. श्री अच्युताय नमः । २१. श्री जनार्दनाय नमः । २२. श्री उपेन्द्राय नमः । २३. श्री हरये नमः । २४. श्री श्रीकृष्णाय नमः ।।
पुन्हा आचमनाची कृती करून वरील २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रातील सर्व पाणी ताम्हणात ओतावे. पूजकाने हात पुसावेत आणि ते नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत.
प्रार्थना
श्रीमन्महागणाधिपतये नमः । (गणांचा नायक असलेल्या अशा श्री गणपतीला मी नमस्कार करतो.)
इष्टदेवताभ्यो नमः । (माझ्या आराध्यदेवतेला मी नमस्कार करतो.)
कुलदेवताभ्यो नमः । (कुलदेवतेला मी नमस्कार करतो.)
ग्रामदेवताभ्यो नमः । (ग्रामदेवतेला मी नमस्कार करतो.)
स्थानदेवताभ्यो नमः । (येथील स्थानदेवतेला मी नमस्कार करतो.)
वास्तुदेवताभ्यो नमः । (येथील वास्तुदेवतेला मी नमस्कार करतो.)
आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः । (सूर्यादी नवग्रहदेवतांना मी नमस्कार करतो.)
सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । (सर्व देवांना मी नमस्कार करतो.)
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः । (सर्व ब्राह्मणांना (ब्रह्म जाणणार्यांना) मी नमस्कार करतो.)
अविघ्नमस्तु । (सर्व संकटांचा नाश होवो.)
सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः । लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।।
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।।
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटेचैव विघ्नस्तस्य न जायते ।।
अर्थ : सुंदर मुख असलेला, एक दात असलेला, फिकट करडा रंग असलेला, हत्तीप्रमाणे कान असलेला, विशाल पोट असलेला, (दुर्जनांच्या नाशासाठी) विक्राळ रूप असलेला, संकटांचा नाश करणारा, गणांचा नायक धुरकट रंगाचा, गणांचा प्रमुख, मस्तकावर चंद्र धारण करणारा आणि हत्तीप्रमाणे तोंड असलेला, या श्री गणपतीच्या १२ नावांचे विवाहाच्या वेळी, विद्याभ्यास चालू करतांना, (घरात) प्रवेश करतांना अथवा (घरातून) बाहेर पडतांना, युद्धावर जातांना किंवा संकटकाळी जो पठण करील किंवा ऐकील, त्याला विघ्ने येणार नाहीत.
शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् । प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ।।
अर्थ : सर्व संकटांच्या नाशासाठी शुभ्र वस्त्र नेसलेल्या, शुभ्र रंग असलेल्या, चार हात असलेल्या, प्रसन्न मुख असलेल्या अशा देवाचे (भगवान श्रीविष्णूचे) मी ध्यान करतो.
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।
अर्थ : सर्व मंगलामध्ये मंगल, पवित्र, सर्वांचे कल्याण करणार्या, तीन डोळे असलेल्या, सर्वांचे शरण स्थान असलेल्या, शुभ्र वर्ण असलेल्या हे नारायणीदेवी, मी तुला नमस्कार करतो.
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् । येषां हृदिस्थो भगवान्मङ्गलायतनं हरिः ।।
अर्थ : मंगल अशा निवासात (वैकुंठात) रहाणारा भगवान श्रीविष्णु ज्यांच्या हृदयामध्ये असतो, त्यांची सर्व कामे नेहमी मंगल होतात.
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ।।
अर्थ : हे लक्ष्मीपती (विष्णु), तुझ्या चरणकमलांचे जे स्मरण तेच लग्न, तोच उत्तम दिवस, तेच ताराबळ, तेच चंद्रबळ, तेच विद्याबळ आणि तेच दैवबळ (होय.)
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ॥
अर्थ : निळसर काळा रंग असलेला, सर्वांचे कल्याण करणारा असा (भगवान विष्णु) ज्यांच्या हृदयामध्ये वास करतो, त्यांचा पराजय कसा होईल ? त्यांचा नेहमी विजय होईल, त्यांना सर्व (इच्छित) गोष्टी प्राप्त होतील.
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थाे धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।
अर्थ : जेथे महान योगी असा (भगवान) श्रीकृष्ण आणि महान धनुर्धारी अर्जुन आहेत, तेथे ऐश्वर्य अन् जय निश्चित असतो, असे माझे मत अन् अनुमान आहे.
विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् । सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ।।
अर्थ : सर्व कार्ये सिद्धीस जाण्यासाठी प्रथम गणपति, गुरु, सूर्य, ब्रह्मा-विष्णु-महेश आणि सरस्वतीदेवी यांना नमस्कार करतो.
अभीप्सितार्थसिद्धयर्थं पूजितो यः सुरासुरैः । सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ।।
अर्थ : इच्छित कार्य सिद्धीस जाण्यासाठी देव आणि दानव सर्वांना पूजनीय असलेल्या अन् सर्व संकटांचा नाश करणार्या, अशा गणनायकाला मी नमस्कार करतो.
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ।।
अर्थ : तिन्ही लोकांचे स्वामी असलेले ब्रह्मा-विष्णु-महेश हे त्रिदेव (आम्हाला) आरंभ केलेल्या सर्व कार्यांमध्ये यश देवोत.
देशकाल
डोळ्यांना पाणी लावून देशकालाचा उच्चार करावा –
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके क्रोधीनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ श्रावणमासे कृष्णपक्षे अष्टम्यांतिथौ इंदुवासरे रोहिणीदिवसनक्षत्रे हर्षणयोगे कौलवकरणे एवङ्गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ
ज्यांना वरील देशकाल म्हणणे कठीण जात असेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा.
तिथीर्विष्णुस्तथा वारं नक्षत्रं विष्णुरेवच । योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।
अर्थ : तिथी या विष्णुसमान आहेत, तसेच वार आणि नक्षत्र हेसुद्धा विष्णुच आहेत, त्यांच्याप्रमाणे योग अन् करण यांच्यासह संपूर्ण जगत् विष्णुमयच आहे.
संकल्प
हातात अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा –
मम आत्मनः परमेश्वर आज्ञारूप सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्तिद्वारा श्रीकृष्ण प्रीत्यर्थं सपरिवार श्रीकृष्णपूजां करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपतिस्मरणं करिष्ये । कलश-घण्टा-दीप-पूजनं च करिष्ये । शरीरशुद्ध्यर्थं दशवारं विष्णुस्मरणं च करिष्ये ।
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
अर्थ : वळलेली सोंड, विशाल शरीर, कोटी सूर्यांचा प्रकाश असलेल्या हे (गणेश) देवा, माझी सर्व कामे नेहमी विघ्नरहित कर.
ऋद्धि-बुद्धि-शक्ति-सहित-महागणपतये नमो नमः । ध्यायामि ।।
अर्थ : ऋद्धि, बुद्धि आणि शक्ति यांसहित महागणपतीला नमस्कार करतो.
कलशपूजन
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥
अर्थ : हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी (नद्यांनो), या पाण्यामध्ये वास करा.
कलशाय नमः । कलशे गङ्गादितीर्थान् आवाहयामि । कलशदेवताभ्यो नमः । सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।
आचमनासाठी वापरत असलेल्या कलशावर गंध, फूल आणि अक्षता वहाव्यात.
घंटापूजन
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसाम् । कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हानलक्षणम् ॥
अर्थ : देवांच्या आगमनासाठी आणि राक्षसांच्या जाण्यासाठी देवतांना आवाहनस्वरूप घंटानाद करत आहे.
घण्टायै नमः । सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।
घंटेला गंध, फूल आणि अक्षता वहाव्यात.
दीपपूजन
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः । आरोग्यं देहि पुत्रांश्च मत: शान्तिं प्रयच्छ मे ।।
अर्थ : हे दीप, तू ब्रह्मस्वरूप आहेस. ज्योतींचा अचल स्वामी आहेस. (तू) आम्हाला आरोग्य दे, पुत्र दे, बुद्धी दे आणि शांती दे.
दीपदेवताभ्यो नमः । सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि । (समईला किंवा दिव्याला गंध, फूल आणि अक्षता वहाव्यात.)
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ।।
अर्थ : (अंतर-बाह्य) स्वच्छ असो वा अस्वच्छ असो, कोणत्याही अवस्थेत असो. जो (मनुष्य) कमलनयन (श्रीविष्णूचे) स्मरण करतो, तो आतून आणि बाहेरून शुद्ध होतो.
(या मंत्राने तुळशीपत्रावर (किंवा फुलावर) पळीतील पाणी घालून मंत्र म्हणत पूजासाहित्यावर, नंतर आपल्या मस्तकावर आणि दोन्ही खांद्यांवर पाणी प्रोक्षण करावे. यानंतर ते तुळशीपत्र (किंवा फूल) ताम्हणात सोडावे.)
त्यानंतर शरीरशुद्धीसाठी १० वेळा श्रीविष्णूचे स्मरण करावे – ९ वेळा ‘विष्णवे नमो’ आणि शेवटी ‘विष्णवे नमः ।’, असे म्हणावे.
श्रीकृष्णाचे ध्यान
यानंतर कृष्णाचे ध्यान करावे. हात जोडावेत.
अथ ध्यानं –
पर्यङ्कस्थां किन्नराद्यैर्युतां ध्यायेत्तु देवकीम् । श्रीकृष्णं बालकं ध्यायेत् पर्यङ्के स्तनपायिनम् ।
श्रीवत्सवक्षसं शान्तं नीलोत्पलदलच्छविम् । संवाहयन्तीं देवक्याः पादौ ध्यायेच्च तां श्रियम् ।।
अर्थ : पलंगावर बसलेल्या, किन्नर आदी जिच्या समवेत आहेत, अशा देवकीचे ध्यान करावे. त्याच जागी दुधप्राशन करणार्या बालकरूपातील श्रीकृष्णाचे ध्यान करावे. नीलकमलामध्ये आसनस्थ असलेल्या देवकीच्या चरणसेवेत असलेल्या लक्ष्मीचे ध्यान करावे.
देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नमः ध्यायामि ।।
देवतांचे आवाहन
यानंतर देवतांचे आवाहन करावे. ‘आवाहन करणे’, म्हणजे त्या देवतांना या पूजास्थळी येण्याची प्रार्थना करणे. आवाहन करतांना ‘देवता प्रत्यक्ष या ठिकाणी येत आहेत’, असा भाव ठेवून त्या त्या देवतेच्या चरणांवर ‘आवाहयामि’, असे म्हणत अक्षता वहाव्यात.
देवक्यै नमः ।। (देवकीला नमस्कार.) देवकीं आवाहयामि ।। (देवकीचे आवाहन करतो.)
वसुदेवाय नम: ।। (वसुदेवाला नमस्कार.) वसुदेवं आवाहयामि ।। (वसुदेवाचे आवाहन करतो.)
यशोदायै नम: ।। (यशोदेला नमस्कार.) यशोदां आवाहयामि ।। (यशोदेचे आवाहन करतो.)
नंदाय नम: ।। (नंदाला नमस्कार.) नंदं आवाहयामि ।। (नंदाचे आवाहन करतो.)
कृष्णाय नम: ।। (कृष्णाला नमस्कार.) कृष्णं आवाहयामि ।। (कृष्णाचे आवाहन करतो.)
रामाय नम: ।। (रामाला नमस्कार.) रामं आवाहयामि ।। (रामाचे आवाहन करतो.)
चंडिकायै नम: ।। (चंडिकादेवीला नमस्कार.) चंडिकां आवाहयामि ।। (चंडिकादेवीचे आवाहन करतो.)
पुढील मंत्राने सर्व देवांच्या चरणांशी अक्षता वहाव्यात.
(पूजनात पुढील १५ उपचार आहेत. त्यातील तिसर्या ते सहाव्या या उपचारांच्या वेळी हातावर पाणी घेऊन ‘प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण समोर बसलेला आहे आणि त्याच्या चरणांवर पाणी वहात आहोत’, असा भाव ठेवून ते पाणी ताह्मणामध्ये सोडावे.)
यानंतर प्रत्येक उपचाराच्या वेळी पुढील मंत्र म्हणून श्रीकृष्णादी देवतांची पूजा करावी.
विश्वेश्वराय विश्वाय तथा विश्वोद्भवाय च । विश्वस्य पतये तुभ्यं गोविन्दाय नमो नमः ।।
यज्ञेश्वराय देवाय तथा यज्ञोद्भवाय च । यज्ञानां पतये नाथ गोविन्दाय नमो नमः ।।
अर्थ : संपूर्ण विश्वाचा ईश्वर असलेल्या, ज्याच्यातून विश्व निर्माण झाले असा, विश्वाचा पालनकर्ता असलेल्या गोविंदाला नमस्कार करतो. यज्ञाचा ईश्वर असलेल्या आणि यज्ञातूनच उत्पन्न झालेल्या, यज्ञांचा पती असलेल्या गोविंदाला नमस्कार करतो.
१. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नमः ।। आवाहयामि । (श्रीकृष्णादी देवतांचे मनाने आवाहन करावे.)
२. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि । (श्रीकृष्णादी देवतांच्या चरणांवर अक्षता वहाव्यात.)
३. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। पाद्यं समर्पयामि । (ताम्हणात पाणी सोडावे.)
४. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नमः ।। अर्घ्यं समर्पयामि । (ताम्हणात पाणी सोडावे.)
५. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नमः ।। आचमनीयं समर्पयामि । (ताम्हणात पाणी सोडावे.)
६. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। स्नानं समर्पयामि । (ताम्हणात पाणी सोडावे.)
७. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। वस्त्रं समर्पयामि । (वस्त्र अर्पण करावे.)
८. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। उपवीतं समर्पयामि । (जानवे किंवा अक्षता अर्पण कराव्यात आणि हात जोडावेत.)
९. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। चन्दनं समर्पयामि । (गंध आणि फूल श्रीकृष्णादी देवतांच्या चरणांवर वहावे.)
आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। हरिद्रां समर्पयामि । (देवकी, यशोदा आणि चंडिकादेवी यांना हळद लावावी.)
आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नमः ।। मङ्गलार्थे कुङ्कुमं समर्पयामि । (कुंकू लावावे.)
आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि । (अक्षता वहाव्यात.)
१०. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पाणि तुलसीपत्राणि च समर्पयामि । (फुले-तुळस अर्पण करावी आणि हार घालावा.)
(धूप आणि दीप ओवाळतांना डाव्या हाताने घंटा वाजवावी.)
११. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। धूपं समर्पयामि । (श्रीकृष्णादी देवतांना उदबत्ती ओवाळावी.)
१२. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। दीपं समर्पयामि । (श्रीकृष्णादी देवतांना निरांजन ओवाळावे.)
नैवेद्य दाखवण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणावा.
जगन्नाथ नमस्तुभ्यं संसारभयनाशन । जगदीश्वराय देवाय भूतानां पतये नमः ।।
अर्थ : संसारातील भयाचा नाश करणार्या जगताच्या नाथा, मी तुला नमस्कार करतो. जगताचा ईश्वर आणि भूतांचा पती असलेल्या देवाला नमस्कार करतो.
१३. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। मधुर-नैवेद्यं निवेदयामि ।
प्रथम जेथे नैवेद्य ठेवणार आहोत, तेथील भूमीवर थोडेसे पाणी घालावे. त्या पाण्यावर अनामिका आणि मध्यमा यांनी भरीव चौकोन घड्याळाच्या दिशेने काढावा. त्यावर नैवेद्य ठेवावा. उजव्या हातात तुळशीची २ पाने घ्यावीत. तुळशीच्या पानावर डाव्या हाताने पळीने पाणी घालावे आणि ते पाणी समोर ठेवलेल्या नैवेद्याभोवती उजव्या हाताने घड्याळाच्या काट्याच्या (प्रदक्षिणेच्या) दिशेने फिरवून नैवेद्यावर प्रोक्षण करावे (शिंपडावे). त्यानंतर डावा हात आपल्या छातीवर ठेवावा आणि पुढील मंत्र म्हणून हातातील तुळशीपत्रांसह उजवा हात नैवेद्यापासून श्रीकृष्णापर्यंत ६ वेळा न्यावा.
प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः । उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ।
तुळशीचे एक पान नैवेद्यावर ठेवावे, दुसरे पान श्रीकृष्णाच्या चरणी वहावे आणि ५ वेळा ‘समर्पयामि’ म्हणतांना ताम्हणात पाणी सोडावे.
आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि । (गंध लावलेले फूल वहावे.)
मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि । तथा च नानाविध फलानि समर्पयामि । (‘समर्पयामि’ म्हणतांना पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे आणि फळांवर उजव्या हाताने पळीभर पाणी घालावे.)
उठून उभे रहावे. आरती प्रज्वलित करावी.
आरती
‘ओवाळू आरती…’ किंवा परंपरेनुसार श्रीकृष्णाची अन्य आरती म्हणावी. (मंगलारती ओवाळावी.)
आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: ।। मङ्गलार्तिक्यदीपं समर्पयामि ।
यानंतर आरती केलेल्या व्यक्तीने स्वतःच्या उजव्या बाजूने गोल फिरावे आणि पूजेला उपस्थित आप्तेष्टांना आरती ग्रहण करण्यासाठी दाखवावी. उपस्थित आप्तेष्टांनी आहे त्या जागेवरूनच आरती ग्रहण करावी. आरतीचे ताम्हण खाली ठेवून कापूर-आरती प्रज्वलित करावी.
आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: । कर्पूरदीपं समर्पयामि । (कापराची आरती ओवाळावी.)
१४. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: । नमस्कारं समर्पयामि । (भगवान श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार घालावा. येथे स्त्रियांनी साष्टांग नमस्कार न करता गुडघ्यावर बसून डोके टेकवून नमस्कार करावा.)
१५. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: । प्रदक्षिणां समर्पयामि । (स्वतःभोवती ३ प्रदक्षिणा घालाव्यात.)
१६. आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि । (ओंजळीने फुले वहावीत.)
आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णाय नम: । प्रार्थनां समर्पयामि । (हात जोडून पुढील प्रार्थना करावी.)
त्राहि मां सर्वलोकेश हरे संसारसागरात् । त्राहि मां सर्वपापघ्न दुःखशोकार्णवात् प्रभो ।।
सर्वलोकेश्वर त्राहि पतितं मां भवार्णवे । त्राहि मां सर्वदुःखघ्न रोगशोकार्णवात् हरे ।।
दुर्गतांस्त्रायसे विष्णो ये स्मरन्ति सकृत् सकृत् । त्राहि मां देवदेवेश त्वत्तोनान्योस्तिरक्षिता ।।
यद्वाक्कचन कौमारे यौवने यच्च वार्धके । तत्पुण्यं वृद्धिमायातु पापं दह हलायुध ।।
अर्थ : सर्व लोकांचा ईश्वर असलेल्या हे हरि, या संसाररूपी सागरापासून मला वाचव. सर्व पापांचा नाश करणार्या हे प्रभु, दुःख आणि शोक यांच्या समुद्रापासून मला वाचव. सर्व लोकांचा ईश्वर असलेल्या हे हरि, जन्म-मृत्यूच्या सागरात पडलेल्या मला वाचव. हे सर्व दुःखांचा नाश करणार्या हरि, रोगांपासून होणार्या शोकसागरापासून मला वाचव. हे भगवान विष्णु, तुझे वारंवार स्मरण करणार्या भक्तांना संकटकाळी तूच वाचवतोस. हे देवतांच्या स्वामी, तुझ्याविना माझे रक्षण करणारे कुणीही नाही, तूच माझे रक्षण कर. हे हलायुध, ही प्रार्थना जो कोणी बालक, तरुण किंवा वयस्कर तुझ्याकडे करील, त्याचे पुण्य वाढून त्याच्या पापांचा नाश होवो.
सर्व पूजा झाल्यानंतर पुढील मंत्राने वर दिल्याप्रमाणे चंद्राच्या प्रतिमेचे पूजन करावे.
सोमेश्वराय सोमाय तथा सोमोद्भवाय च । सोमस्य पतये नित्यं तुभ्यं सोमाय वै नमः ।।
चंद्रमसे नम: ।। या नाममंत्राने सर्व उपचार अर्पण करावेत.
नंतर समाहितचित्त होऊन गुडघे भूमीवर ठेवून शंखात पुष्प, कुश, चंदन आणि पाणी यांनी युक्त चंद्राला अर्घ्य द्यावे.
अर्घ्यमंत्र
क्षीरोदार्णवसम्भूत अत्रिगोत्रसमुद्भव । गृहाणार्घ्यं शशाङ्केश रोहिणीसहितो मम ।।
ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं ज्योतिषां पतये नमः। नमस्ते रोहिणीकान्तम् अर्घ्यं नः प्रतिगृह्यतां ।।
अर्थ : क्षीरसागरातून उत्पन्न झालेल्या, अत्रिगोत्रात जन्मलेल्या, रोहिणीसहित असलेल्या हे चंद्रा, माझे अर्घ्य ग्रहण कर. सर्व तार्यांचा स्वामी असलेल्या, रोहिणीचा पती असलेल्या हे ज्योत्सनापती (चंद्रा), आमचे अर्घ्य स्वीकार कर.
वरील मंत्र म्हणून ‘चंद्रमसे नमः । इदं अर्घ्यं दत्तं न मम ।’, असे म्हणून शंखातील पाणी ताम्हणात सोडावे.
याचप्रमाणे देवकीला अर्घ्य द्यावे.
अर्घ्यमंत्र
यथा पुत्रं हरिं लब्ध्वा प्राप्ता ते निर्वृतिः परा । तामेव निर्वृतिं देहि सुपुत्रं दर्शयस्व मे ।।
अर्थ : हे देवकी, ज्याप्रमाणे साक्षात् विष्णु पुत्ररूपात लाभून तू मुक्ती मिळवलीस, त्याचप्रमाणे मला सुपुत्र देऊन मुक्तीचा मार्ग दाखव.
वरील मंत्र म्हणून ‘देवक्यै नम: । इदं अर्घ्यं दत्तं न मम ।’, असे म्हणून देवकीला अर्घ्य द्यावे.
याचप्रमाणे कृष्णाला अर्घ्य द्यावे.
अर्घ्यमंत्र
जातः कंसवधार्थाय भू भारोत्तारणाय च । पाण्डवानां हितार्थाय धर्मसंस्थापनाय च ।।
कौरवाणां विनाशाय दैत्यानां निधनाय च । गृहाणार्घ्यं मया दत्तं देवक्या सहितो हरे ।।
अर्थ : जो कंसवधासाठी, सर्व पापी लोकांचा नाश करून पृथ्वीवरील भार न्यून करण्यासाठी, पांडवांच्या हितासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी कौरवांचा आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी या पृथ्वीवर अवतरित झाला, अशा देवकीसहित असलेल्या कृष्णा, मी दिलेले अर्घ्य तू स्वीकार कर.
वरील मंत्र म्हणून ‘श्रीकृष्णाय नम:। इदं अर्घ्यं दत्तं न मम ।’, असे म्हणून श्रीकृष्णाला अर्घ्य द्यावे.
अनेन कृतपूजनेन आवाहित देवक्यादि परिवार देवता सहित श्रीकृष्णादि देवताः प्रीयताम् । (असे म्हणून उजव्या हातावर पाणी घेऊन सोडावे आणि आरंभी दिल्याप्रमाणे २ वेळा आचमन करावे.)
यानंतर विष्णुस्मरण करावे – ॐ विष्णवे नमो । विष्णवे नमो । विष्णवे नमः ।। अच्युताय नमो । अनंताय नमो । गोविंदाय नमो नमः ।
या पूजेमध्ये प्रत्येकाच्या कुलपरंपरेनुसार ज्या पद्धती असतील, त्यांनी त्याप्रमाणे पूजन करावे.
पुढील रात्रीच्या वेळेत देवादिकांची स्तुती करावी, कृष्णाची आरती करावी, कृष्णाची विष्णुसहस्रनाम आदी स्तोत्रे म्हणावी, वाद्यवृंद, गायन इत्यादींमध्ये रात्र घालवावी.
यानंतर दुसर्या दिवशी सकाळी भक्तीभावाने यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालावे.
ब्राह्मणभोजन झाल्यानंतर पूजन केलेल्या देवतांच्या चरणी अक्षता वाहून त्यांचे विसर्जन करावे.
विसर्जन मंत्र – ॐ नमो वासुदेवाय गोब्राह्मणहिताय च । शांतिरस्तु शिवं चास्तु ।।
उपवास सोडण्याविषयी
ग्रंथात अनेक प्रकारे या व्रताचा उपवास सोडण्याचे नियम सांगितले आहेत. त्यातील तिथी आणि नक्षत्र यांच्या अंती उपवास सोडावा. जर भोजन करणे शक्य नसेल, तर फलादिकांनी उपवास सोडावा. ज्यांना तिथी किंवा नक्षत्र हे संपल्यावर उपवास सोडणे शक्य नसेल, त्यांनी विसर्जन झाल्यानंतर उपवास सोडावा.
हा लेख ‘पूजासमुच्चय’, ‘व्रतराज’, ‘निर्णयसिंधु’ आणि ‘धर्मसिंधु’, या ग्रंथाचा संदर्भ घेऊन केलेला आहे. याविषयी आपल्याकडे अन्य काही संदर्भ असल्यास किंवा अन्य काही प्रथा-परंपरा असल्यास ८१८०९६८६६० या क्रमांकावर आम्हाला ‘व्हॉट्स ॲप’द्वारे अवश्य कळवाव्यात.’
– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (१८.८.२०२४)
टीप १ – येथे देशकाल लिहितांना संपूर्ण भारत देशाला अनुसरून ‘आर्यावर्तदेशे’ असा उल्लेख केला आहे. ज्यांना ‘जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः …’ अशा प्रकारे स्थानानुसार अचूक देशकाल ठाऊक असेल, त्यांनी त्यानुसार योग्य तो देशकाल म्हणावा. (मूळ स्थानी)
टीप २ – वरील देशकाल ‘श्रावण कृष्ण अष्टमी (२६.९.२०२४)’ या दिवसाला अनुसरून येथे दिला आहे. (मूळ स्थानी)
सुंदर सुटसुटीत samantra पूजा विधि चा लाभ झाला
नमस्कार, उत्तम व sulabh ritine पूजा सांगितली
खूप सुंदर. धन्यवाद.
ॐ नमो नारायण
माऊली रामकृष्णहरी//जय श्रीकृष्ण//
अप्रतिम पुजा विधी माहीती . रामकृष्णहरी