घरच्या लागवडीतील वनस्पतींच्या पानाफुलांपासून बनवता येणारे चहाचे विविध पर्याय

Article also available in :

नेहमीच्या चहाचे दुष्परिणाम असल्याने बर्‍याच जणांना ‘चहा पिणे बंद करायला हवे’, असे वाटत असते; परंतु ‘चहाला काहीतरी पर्याय असावा’, असेही वाटत असते. त्यांच्यासाठी घरच्या लागवडीतील पानाफुलांपासून बनणारे हे पर्याय उपलब्ध आहेत. नियमित एकाच चवीचा चहा पिण्यापेक्षा असे विविध पर्याय वापरल्यास मनालाही नाविन्यातील आनंद अनुभवता येईल.

१. गोकर्णाची निळी फुले, २. लिंबू, ३. गवती चहाची पाने, ४.दालचिनी, ५. तुळस, ६. गूळ

 

१. गोकर्णाच्या फुलांचा निळा चहा (Blue Tea)

‘गोकर्णाची वेल आणि तिची निळी फुले सर्वांनाच परिचित आहेत. गोकर्णाच्या वेलीला लहान लहान शेंगा येतात. या शेंगा झाडावरच सुकल्या की, त्यातून बी निघते. या बिया रुजत घालून त्यांपासून गोकर्णाची वेल बनवता येते. गोकर्णाच्या फुलांचा ‘निळा चहा’ बनवता येतो.

१ अ. साधारण २ कप चहासाठी लागणारे साहित्य

अडीच कप पाणी, निळ्या गोकर्णाची ८ ते १० फुले, ४ – ५ तुळशीची पाने, लहानसा आल्याचा तुकडा, ४ लहान तुकडे गवती चहाची पात आणि दालचिनीचा १ लहानसा तुकडा

१ आ. कृती

गोकर्णाची फुले हलक्या हाताने धुऊन घ्यावीत; कारण फुले चोळल्यास त्यांचा निळा रंग निघून जातो. या फुलांसहित वरील सर्व साहित्य २ मिनिटे उकळावे आणि मिश्रण काही वेळ झाकून ठेवावे. नंतर त्यात चवीपुरता गूळ आणि आवडीनुसार लिंबाचा रस घालून कोमट चहा प्यावा.

 

२. जास्वंदीच्या पाकळ्यांचा तांबडा चहा (Red Tea)

गोकर्णाच्या फुलांप्रमाणेच जास्वंदीच्या पाकळ्यांचाही चहा बनवता येतो. तांबड्या देशी जास्वंदीच्या पाकळ्या काढून चाळणीमध्ये धुऊन घ्याव्यात. बाजूला दिलेल्या गोकर्णाच्या फुलांच्या चहाप्रमाणेच अन्य साहित्य वापरावे आणि कृतीही तशीच करावी.

वरील दोन्ही चहांसाठी ताजी फुले उपलब्ध न झाल्यास आदल्या दिवशीची कोमेजलेली फुलेही घेता येतात.

सौ. राघवी मयूरेश कोनेकर

 

३. तुळस आणि आले यांच्या पानांचा हिरवा चहा (Green Tea)

पेठेत मिळणारे आल्याचे कंद मातीत लावून आल्याची लागवड सहज करता येते. कंद लावल्यापासून नवीन आले काढणीला येईपर्यंत साधारण ८ – ९ मासांचा कालावधी लागतो. या काळात वाढणार्‍या रोपाला पुष्कळ पाने येत रहातात. या पानांचा चहा बनवता येतो. तुळशीचेही अनेक प्रकार लावता येतात, उदा. राम तुळस, कृष्ण तुळस, रानतुळस, कापूर तुळस, धूप तुळस. या चहामध्ये आपल्या आवडीनुसार तुळशीची एक किंवा एकाहून अधिक प्रकारची पाने घालता येतात.

३ अ. साधारण २ कप चहासाठी लागणारे साहित्य

अडीच कप पाणी, ५ – ६ आल्याची पाने, ५ – ६ तुळशीची पाने, ४ लहान तुकडे गवती चहाची पात, आवडीनुसार थोडी वेलची पूड किंवा दालचिनी, लवंग आणि मिरी यांपैकी कोणताही एक मसाल्याचा पदार्थ

३ आ. कृती

सर्व पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. वरील सर्व साहित्य ५ मिनिटे उकळावे. नंतर त्यात चवीपुरता गूळ आणि आवडीनुसार लिंबाचा रस घालून कोमट चहा प्यावा. आपल्या लागवडीत पुदीना किंवा पानओवा लावलेला असल्यास आपल्या आवडीनुसार त्यांची पानेही यामध्ये वापरून चवीमध्ये विविधता आणता येते.’ (२७.९.२०२२)

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा.
‘आपण वर दिल्याप्रमाणे विविध प्रकारचे चहा करून प्यायल्यास त्याबद्दलचा आपला अनुभव खाली दिलेल्या संगणकीय पत्त्यावर अवश्य कळवावा. आपत्काळात चहा न मिळाल्यास आपण आपल्या आवडीचा चहा करून पिऊ शकाल आणि त्याविषयीचे लिखाण प्रसिद्ध करण्यास अवश्य कळवा. इतर साधकांनाही याचा लाभ होईल. – संकलक

संगणकीय पत्ता : [email protected]

Leave a Comment