तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

Article also available in :

अनुक्रमणिका

‘ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्याला देवतांचे आशीर्वाद मिळावेत, या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि या कार्यात सहभागी असलेल्या सनातन संस्थेच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या नाडीपट्टीमध्ये महर्षि सांगत असल्याप्रमाणे गेली ५ वर्षे भारतभर दौरा करून देवदर्शने करत आहेत. महर्षि आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी बहुतांश वेळा तमिळनाडूतील देवळांतच जायला सांगतात. तेथील सात्त्विक देवळांची वर्णने ऐकून मलाही ‘तेथील देवळांत देवदर्शनाला जावे’, असे वाटायचे. त्याचा योग मला नोव्हेंबर २०२१ मध्ये आला. या देवदर्शनातील अनुभव येथे देत आहे.

 

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ
श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. दर्शन घेतलेली पवित्र स्थाने

१ अ. देवळे


टीप – ‘बृहदीश्वर’ हे जगातील मोठ्या देवळांपैकी एक देऊळ ! या देवळाचा कळस जगात सर्वांत उंच (२१७ फूट, म्हणजे ६६ मीटर उंच) आहे. अकराव्या शतकात चोळ राजाने हे देऊळ बांधले. पाया न खणताही केवळ शिळांचा (दगडांचा) उपयोग करून जगात सर्वांत उंच उभारलेले हे देऊळ आहे. देवळाच्या कळसाच्या वर जो गोलाकार दगड बसवला आहे, त्याचे वजन ८० सहस्र किलो आहे. त्या काळी एवढा जड दगड कसा काय वर नेऊन कळसावर बसवला असेल ! या देवळाचा कळस जगातील सर्वांत उंच गणल्या जाणार्‍या इटलीमधील ‘लीनिंग टॉवर ऑफ पीसा’पेक्षाही उंच आहे. ‘लीनिंग टॉवर ऑफ पीसा’ याची उंची १८३ फूट, म्हणजे ५५.८ मीटर आहे आणि तो थोडा झुकलेला आहे; पण बृहदीश्वर देवळाचा कळस त्यापेक्षाही उंच असूनही अगदी सरळ आहे. भारतातील केवढे हे पुरातन आणि प्रगत वास्तुशास्त्र !

तंजावर (तमिळनाडू) येथील बृहदीश्वर मंदिराचा जगातील सर्वांत उंच ६६ मीटर उंचीचा कळस ! (बाजूच्या चौकोनात कळसावरील ८० सहस्र किलो वजनाची शिळा मोठी करून दाखवली आहे.)

१ आ. तीर्थस्थान

कुंभकोणम् येथे ‘महामहम्’ हे तीर्थस्थान आहे. येथे दर १२ वर्षांनी माघ मासात कुंभमेळ्याप्रमाणे मेळा भरतो. त्याला ‘ब्रह्मोत्सव’ म्हणतात. तो १० दिवसांचा असतो.

१ इ. तंजावर येथील रामदासस्वामींचा ‘झोळीमठ’

रामदासस्वामींचे शिष्य ‘भीमस्वामी’ यांनी हा मठ रामदासस्वामींची आज्ञा घेऊन स्थापन केला आहे. रामदासस्वामींना प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी भिक्षेसाठी झोळी दिली होती. ती भिक्षेची झोळी रामदासस्वामींनी या मठाला दिली; म्हणून या मठाला ‘झोळीमठ’ म्हणतात.

१ इ १. दृष्टी अधू झालेल्या एका शिल्पकाराने भावपूर्ण बनवलेल्या अप्रतिम मूर्ती !

रामदासस्वामींनी दृष्टी अधू झालेल्या एका शिल्पकाराला दृष्टी देऊन त्याच्याकडून या मठात स्थापन करण्यासाठी रामपंचायतनाच्या (राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि मारुति या सहा जणांच्या) तळहाताच्या उंचीच्या दगडाच्या मूर्ती बनवून घेतल्या. त्या मूर्ती रामदासस्वामींना पुष्कळ आवडल्याने त्यांनी त्या शिल्पकाराकडून सातार्‍याच्या सज्जनगडासाठीही राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या ३ फूट उंचीच्या मूर्ती बनवून घेतल्या. त्याही रामदासस्वामींना आवडल्या. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी शिल्पकाराला विचारले, ‘तुला काय पाहिजे ? तुझी आलेली दृष्टी आता अशीच राहू दे का ?’ यावर शिल्पकार म्हणाला, ‘या डोळ्यांनी आपण मला प्रत्यक्ष श्रीरामाचे दर्शन घडवल्याने आता आणखी काय पहायचे शिल्लक आहे ? आता मला दृष्टी नको.’ केवढा हा त्या शिल्पकाराचा भाव !

१ इ २. भीमस्वामी यांच्या एका वंशजांनी काढलेले रामदासस्वामींचे एक अप्रतिम चित्र !

या मठात भीमस्वामी यांच्या एका वंशजांनी रामदासस्वामींचे काढलेले एक चित्रही आहे. आता तेच चित्र सगळीकडे प्रसिद्ध आहे. तसेच हाताने लिहिलेल्या संपूर्ण दासबोधाची फार जुनी प्रतही तेथे आहे.

१ इ ३. रामनाम पूर्ण झाले की, भीमस्वामींचे वंशज यांच्या हातातील जपमाळ आपोआप मारुतीच्या गळ्यात पडायची !

मठात रामदासस्वामींनी रामपंचायतनासमोर स्थापन केलेला मारुतीही आहे. भीमस्वामींचे वंशज प्रतिदिन सकाळी जपमाळ घेऊन श्रीरामाच्या नामस्मरणाला बसायचे. त्यांचे रामनाम पूर्ण झाले की, त्यांच्या हातातील जपमाळ आपोआप मारुतीच्या गळ्यात पडायची. ही अनुभूती येईपर्यंत ते अन्न-पाणी घ्यायचे नाहीत. भीमस्वामींच्या पूर्वजांचा केवढा आध्यात्मिक अधिकार होता. मारुति प्रत्यक्ष रामनाम स्वीकारायचा !

 

२. देवळांची भव्यता आणि सुंदरता !

२ अ. देवळांची भव्यता

आम्ही पाहिलेली सर्वच देवळे भव्य होती. परिसरात प्रवेश करायचा दरवाजा २ हत्तींच्या उंचीएवढा आहे. प्रवेशद्वाराच्या वर देवळाचे गोपूर असायचे. गोपूराचा वरचा भाग अरूंद होत गेलेला असतो. सर्वांत वर दोन शिंगांची प्रतिकृती असते. देवळांची गोपुरे इमारतीच्या ५ – ६ मजली उंचीएवढी उंच असतात. ‘गोपूर’ म्हणजे गायीचे तोंड ते शिंगे या भागाचा आकार. गोपूर एवढे उंच असण्याचे कारण म्हणजे पूर्वी रस्ते नव्हते, तसेच दाट झाडी असायची. त्यामुळे ‘देऊळ कुठे आहे ?’, हे भक्तांना दुरून कळावे, यासाठी ती उंच बनवलेली असते. भक्तांच्या सोयीसाठी प्रत्येक दिशेला देवळाचे प्रवेशद्वार आणि त्यावर गोपूर असते. मंदिरांची गोपूरे उंच होतीच, शिवाय मुख्य देवळाचे दगडी बांधकामही साधारण २ मजली उंच आहे. आतील गर्भगृहापर्यंत जायचा मार्ग अर्धा किलोमीटर लांब आहे. यावरून देवळांची भव्यता लक्षात येईल.

२ आ. देवळांमधील सहस्रो शिल्पे

देवळाच्या प्रत्येक गोपूरावर चारही बाजूंना एकूण शेकडो मूर्ती आहे. काही देवळांना ८ गोपूरेही आहेत. देवळाच्या एका दारातून आत गेले की, काही अंतर चालून गेल्यावर पुन्हा दुसरा दरवाजा आणि त्याच्या वरही गोपूर आहेत. असे प्रत्येक दिशेच्या दरवाजाच्या संदर्भात आहे. त्यामुळे उंच अशा ८ गोपूरांवर शेकडो मूर्ती आहेत. मुख्य देवळामध्ये गर्भगृहापर्यंत जायच्या अर्ध्या किलोमीटरच्या मार्गात दोन-दोन मनुष्य उंचीची अनेक शिल्पे आहेत, नक्षीकाम आहे, तसेच छतावर रंगांनी साकारलेली अनेक चित्रे आहेत. हे सर्व इतके आखीव-रेखीव आणि सुंदर आहे की, ते बघून आम्ही थक्क होत होतो.

२ इ. पूर्वीच्या राजांनी एवढी मोठी देवळे बांधण्याचे कारण

येथील देवळांना त्याच्या चारही दिशांच्या प्रवेशद्वारांना जोडणार्‍या तटबंदीसारख्या दगडाच्या मोठमोठ्या भिंती बांधलेल्या आहेत. त्या वेळच्या चोळ आणि पंड्या या राजघराण्यांनी ही भव्य देवळे बांधली आहेत. काही देवळांचा परिसर १०-२० एकर, तर काही देवळांचा परिसर १०० एकर एवढा मोठाही आहे. देवळांमध्ये रहाण्याच्या, पाण्याच्या सर्व सोयी आहेत. देवळांना तटबंदी असण्याचे कारण म्हणजे ‘समजा एखाद्या शत्रूचे आक्रमण झाले, तर गावातील लोकांना देवळाच्या आत बोलवून त्यांचे रक्षण करता येईल’, असा विचार त्या वेळच्या राजांचा असायचा. त्या वेळच्या राजांना आपल्या प्रजेची केवढी काळजी असायची !

 

३. काही देवळांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

३ अ. पंचतत्त्वांच्या शिवलिंगांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

आम्ही पंचतत्त्वांच्या शिवलिंगांपैकी पृथ्वीतत्त्वाचा एकांबरेश्वर, तेजतत्त्वाचा अरुणाचलेश्वर, वायुतत्त्वाचा श्रीकालहस्तीश्वर आणि आकाशतत्त्वाचा चिदंबरम् यांचे दर्शन घेतले. आपतत्त्वाचा ‘जंबुकेश्वर’ याचे दर्शन आम्ही घेतले नाही. दर्शन घेतलेल्या शिवांच्या संदर्भात मला पुढील अनुभूती आल्या.

३ अ १. पृथ्वीतत्त्वाचा एकांबरेश्वर – पायांना जडत्व जाणवणे, तसेच मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवणे

या देवळापासून आम्ही अर्धा किलोमीटर दूर असतांनाच मला थंडावा जाणवू लागला; पण प्रत्यक्ष मंदिरात गेल्यावर मला पायांना जडत्व जाणवू लागले. आपण समुद्रकिनारी गेल्यावर लाट येऊन गेल्यावर आपले पाय वाळूत रुततात आणि तेव्हा आपल्या पायांना जसे जडत्व जाणवते, तसे जडत्व मला या मंदिरात गेल्यावर जाणवले, तसेच मला मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवली. त्या वेळी बाकी शरिराला कोणतीही स्पंदने जाणवली नाहीत.

३ अ २. तेजतत्त्वाचा अरुणाचलेश्वर – पुष्कळ उष्णता जाणवून घाम येणे
३ अ ३. वायुतत्त्वाचा श्रीकालहस्तीश्वर – गळा ते डोके या भागात थंडावा जाणवणे, श्वास मोकळा होणे आणि सुषुम्ना नाडी कार्यरत होणे; पण बाकी शरिराला थंडाव्याची जाणीव नसणे

येथील शिवलिंग ४ फूट उंच आहे. तेथे शिवलिंगासमोर तेलाचे २ दिवे लावलेले असतात. एक दिवा लिंगाच्या पायथ्यापासून अर्धा फूट उंचीवर असतो, तर दुसरा दिवा साडेतीन फूट उंचीवर असतो. यांपैकी खालच्या दिव्याची ज्योत नेहमी स्थिर असते, तर वरच्या दिव्याची ज्योत फडफडत असते. वरच्या दिव्याची ज्योत फडफडत असण्याचे कारण म्हणजे शिवलिंग श्वासोच्छ्वास करत असते. त्यामुळे या देवळात मला माझा गळा ते डोके या भागात थंडावा जाणवत होता, माझा श्वास मोकळा झाला होता आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली होती; पण माझ्या बाकी शरिराला थंडाव्याची जाणीव नव्हती.

३ अ ४. आकाशतत्त्वाचा चिदंबरम् – पोकळी आणि शांती जाणवणे

येथे शिवलिंग नसून केवळ गर्भगृह आहे.

– सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०२१)

 

४. देवळांचे सरकारीकरण झाल्याने दर्शनार्थींची होत असलेली लूट आणि त्याचे कारण

‘आम्ही घरातील काही जणांनी १ ते ७ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तमिळनाडूतील काही देवळे बघण्याचे नियोजन केले होते. देवळांचे दर्शन घेत असतांना देवळांच्या सरकारीकरणामुळे देवळे आणि दर्शनार्थी यांची कशी हानी होत आहे, हे माझ्या लक्षात आले. ती स्थिती येथे मांडत आहे.

अ. सरकारीकरण केलेल्या देवळांमध्ये सरकार दर्शनार्थींकडून
प्रवेशशुल्क आकारून, तसेच त्यांनी केलेल्या दानधर्मातील वाटा घेऊन त्यांना लुबाडत असणे

आम्ही दर्शन घेतलेल्या बहुतेक सर्वच देवळांमध्ये दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्यांना प्रत्येकी काही शुल्क द्यावे लागत होते. तसेच विशेष महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या रांगेतून दर्शन घेण्यासाठी सामान्य शुल्काहून दुप्पट किंवा तिप्पट शुल्क होते. दक्षिण भारतातील देवळांत प्रतिदिन सहस्रो लोक दर्शनाला येतात. त्यामुळे दर्शनशुल्काच्या माध्यमातून प्रतिदिन लाखो रुपये गोळा होतात. देवळात दर्शन घेण्यासाठी शुल्क आकारण्याची प्रथा देवळांच्या सरकारीकरणातून पडली आहे. प्रवेशशुल्कातून प्रतिदिन जमा झालेले लाखो रुपये राज्य सरकारकडे जमा होतात आणि सरकारला विनासायास देवळांकडून पैसा मिळतो. एवढेच नव्हे, तर दर्शनार्थी करत असलेल्या दानधर्मातील काही वाटा सरकार घेते. अशा प्रकारे सरकार देवदर्शनासाठी पैसे आकारून आणि त्यांनी केलेल्या दानधर्मातील वाटा घेऊन दर्शनार्थींना लुबाडत आहे, तसेच धर्मासाठीचा पैसा मायेतील गोष्टींसाठी व्यय करत आहे.

आ. कुठे भव्य देवळे बांधणारे पूर्वीचे धार्मिक वृत्तीचे राजे आणि कुठे
आताचे देवळांना लुटणारे अधार्मिक वृत्तीचे अन् नीतीमत्ताहीन राज्यकर्ते !

आम्ही दर्शन घेतलेली देवळे ही दक्षिण भारतात राज्य केलेले चोळ साम्राज्य, पल्लव राजवंश, पंड्या राजवंश इत्यादी राजघराण्यांतील राजांनी एक ते दीड सहस्र वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. आध्यात्मिक महत्त्व असलेली देवतांची स्थाने टिकून रहावीत आणि लोकांना त्यांचा लाभ व्हावा, यांसाठी या राजांनी एवढी भव्य अन् अप्रतिम देवळे बांधली. त्यांसाठी त्यांनी आपली धनसंपत्ती उदार हस्ते अर्पण केली. तेव्हा साधनसामुग्री एवढी प्रगत नव्हती. त्यामुळे अशी मोठी देवळे बांधून पूर्ण व्हायला काही दशके लागायची. काहींना तर १०० हून अधिक वर्षेही लागली आहेत. त्यामुळे ते २ – ३ पिढ्यांचे काम असायचे. पूर्वीच्या राजांनी देवळे बांधण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत आणि भारतियांची कलाकृती अन् आध्यात्मिक वारसा या निमित्ताने जपला आहे. यावरून त्या वेळच्या राजांची धार्मिक वृत्ती लक्षात येते. देवाच्या दर्शनाने लोकांना अध्यात्माकडे वळवण्यासाठी त्या वेळच्या राजांनी किती कष्ट घेतले आहेत ! याउलट आताचे राज्यकर्ते देवळे तर बांधत नाहीतच, उलट आधीच्या राजांनी बांधलेल्या देवळांची संपत्ती हडप करत आहेत ! तसेच देवळांचे सरकारीकरण करून धार्मिक वृत्तीच्या लोकांकडील (भक्तांकडील) देवळांचे व्यवस्थापन हिरावून घेऊन तेथे भक्तीभावाचा लवलेश नसणारे शासनकर्ते नेमून देवळांचे पावित्र्य न्यून करत आहेत !

इ. लोकांनी साधनेला आरंभ करणे आणि धार्मिक वृत्तीचे बनणे, हा यावर उपाय !

देवळांची अशी स्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजे आताची बहुसंख्य जनता धार्मिक राहिलेली नाही. तिच्याकडून साधना होत नाही. तिची नीतीमत्ता खालावत आहे, तसेच तिच्याकडून अधर्मही होत आहे. ‘यथा राजा, तथा प्रजा !’, अशी म्हण आहे. सध्या अधार्मिक लोकांतून शासनकर्ते निवडून येत असल्याने पुढील प्रजाही अधार्मिक निपजत आहे. देवळांत येणारे बहुसंख्य दर्शनार्थी भक्तीभावाने नव्हे, तर ‘मायेतील सकाम इच्छा देवाने पूर्ण करावी’, यासाठी येत आहेत. त्यामुळेच त्यांना पैसे मोजावे लागत आहेत. यावर उपाय म्हणजे लोकांनी साधनेला आरंभ करणे आणि धार्मिक वृत्तीचे बनणे !’

– सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment