‘तीव्र आपत्काळात केवळ साधनाच मनुष्याला वाचवू शकेल’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी वेळोवेळी केलेले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !

Article also available in :

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळात जीवनावश्यक वस्तू, औषधे यांविना हाल होऊ नयेत, यासाठी स्थुलातून पूर्वसिद्धता करण्याविषयी जागृती केली. त्यासह आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांची आध्यात्मिक स्तरावर सिद्धताही ते करवून घेत आहेत. आता कोरोना महामारीच्या काळातच बाह्य परिस्थिती इतकी प्रतिकूल झाली आहे, तर भावी भीषण आपत्काळात काय स्थिती असेल ? त्या वेळी साधनेने लाभलेले आत्मबळच साधकांचे रक्षण करेल, हेच परात्पर गुरु डॉक्टर पुन्हा पुन्हा सांगतात !

 

परात्पर गुरु डॉक्टरांनी काढलेले उद्गार सत्य होत असल्याचे अनुभव !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हा साधकांना पुढे येणार्‍या तीव्र आपत्काळाविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यातील सारस्वरूपाची सूत्रे येथे दिली आहेत.

अ. आपत्काळाची तीव्रता एवढी भयंकर राहील की, ‘साधकांना बाहेर जाऊन प्रचार-प्रसार करणेही शक्य होणार नाही. त्यांना घरी बसून रहावे लागेल, कोरोनाच्या काळात आपण हे अनुभवत आहोत.’

आ. पिण्याचे पाणी आणि अन्न मिळवण्यासाठी दंगे होतील.

(सध्या कोरोनामुळे रुग्णालयात खाटा, ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन यांचा प्रचंड तुटवडा आहे. इतकेच काय, तर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहेत. दळणवळणबंदी आणि निर्बंध यांमुळे रोजगार गेले आहेत, आस्थापने बंद आहेत. त्यातही पुढे येणार्‍या तिसर्‍या महायुद्धात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होईल. हेच परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते ! – संपादक)

इ. मार्गांवर शवांचा खच पडेल. त्यातून वाट काढत चालणेही कठीण होईल. आपले आप्तजन किंवा मित्र यांचे शव पडलेले पाहूनही त्यांच्यासाठी काहीही न करता आपल्याला जीव वाचवण्यासाठी पळावे लागेल.

(कोरोना महामारीच्या काळात कोरोनाबाधित पालकांचे शव घेण्यास त्यांच्या मुलांचीही सिद्धता नव्हती, असे अनेक प्रसंग घडले ! ‘कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार केल्यास कोरोनाचा संसर्ग होईल’, अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे ! परात्पर गुरु डॉक्टरांचे वरील बोल किती खरे आहेत, हेच यातून लक्षात येते ! – संपादक)

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती, देहली.

 

आपत्काळात तरून जाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन

संस्थेच्या आरंभीच्या काळात अध्यात्माचे अभ्यासवर्ग घेताना परात्पर गुरु डॉ. आठवले

 

श्रद्धेचे महत्त्व

१. आपत्काळात साधकांच्या साधनेची खरी परीक्षा होणार आहे. त्या काळात श्रद्धा असलेलेच टिकतील.

२. ‘ईश्‍वर आणि धर्म यांच्याप्रती श्रद्धा नसणे अन् साधना न करणे’, हाच खरा आपत्काळ आहे. पुढे प्रत्यक्ष आपत्काळ आल्यावर अशा अश्रद्ध लोकांना कोण वाचवणार ?

 

साधना करण्याचे महत्त्व

पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर स्वतः साधकांमधील स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी सत्संग घेत असत. त्या सत्संगांतून साधकांचा साधनेचा पाया पक्का झाला.

१. आपत्काळात ‘मनोबल आणि आत्मबल’ यांचीच आवश्यकता असणार आहे. त्यामुळे साधना आणि धर्म यांचा प्रसार करा. धर्माचरण आणि साधना यांमुळे मनोबल आणि आत्मबल वाढेल.

२. आपत्काळात प्रशासन आणि शासन व्यवस्था कोलमडेल. तेव्हा समाज आशेने साधकांकडेच पाहील. तेव्हा साधकांना समाजाचे नेतृत्व करून दिशा द्यावी लागेल.

 

आपत्काळात एकेक दाण्याचाही विचार करणार्‍यांचीच देव काळजी घेणार असणे

‘वर्ष २००१ – २००२ या काळात धान्याला ऊन दाखवून झाल्यानंतर सायंकाळी ते गोळा करतांना इतरत्र पसरलेले दाणे साधिका वेचत होत्या. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही एकेक दाणा उचलत आहात’, हा तुमच्या साधनेचा चांगला भाग आहे. पुढे आपत्काळात सर्वांना एकेका दाण्याचीही किंमत कळेल. ईश्‍वरही आपत्काळात अशा एकेका दाण्याचा विचार करणार्‍यांचीच काळजी घेईल.’’

‘कोणत्या झाडाची पाने अन्न म्हणून खाऊ शकतो ?’ किंवा ‘असे एखादे झाड आहे का ? की, त्याचे एखादे पान खाऊनही भूक लागणार नाही’, याची माहिती करून घ्या’, असेही परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले.

 

आवश्यकता नसतांनाही अधिक दूध मागवल्यास ‘आपत्काळात
देवाच्या नियोजनानुसार साधकांच्या वाट्याचे दूध न्यून होणार असणे’, असे सांगणे

‘एकदा एका कार्यक्रमात शेवटच्या दिवशी साधकांची उपस्थिती अल्प असूनही दूध अधिक प्रमाणात मागवले गेले. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी सांगितले, ‘‘साधक संख्या अल्प होणार होती, तर दूधही अल्पच मागवायला पाहिजे होते. ‘आवश्यकता नसतांना दूध अधिकचे मागवल्याने आपत्काळात ईश्‍वराने केलेल्या नियोजनातील साधकांना मिळणारे तेवढे दूध न्यून होणार आहे’, हे साधकांच्या लक्षात येत नाही !’’

 

साधकांसाठी निवासव्यवस्थेचे नियोजन

१. महानगरांपासून ४० ते ५० कि.मी. दूर अंतरावरील जागा पहावी; कारण या महायुद्धात महानगरे बेचिराख होतील.

२. सध्या जे एकटे-दुकटे रहात आहेत, संघटित होत नाहीत, त्यांना आपत्काळात कष्ट भोगावे लागतील. जे आताच संघटित होतील, ते पुढे स्वतःचे रक्षण करू शकतील.

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती, देहली.

 

आपत्काळात सर्व साधकांचा सांभाळ
करण्यासाठी सिद्धता करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

अधिवक्ता योगेश जलतारे

सनातन संस्थेचा प्रत्येकच साधक अत्यंत काटकसरीने वागतो. मी याविषयी एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘आपण सर्वच क्षेत्रांत अत्यंत काटकसरीने वागतो. आपल्याला तर पैशाची आवश्यकता नसते, तरी एवढी सिद्धता कशासाठी ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘आज साधक त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करू शकतात. तिसरे महायुद्ध चालू झाल्यावर कुणाकडे काहीच नसेल. पैसा असला, तरी अन्नधान्य नसेल किंवा अन्नधान्य असले, तरी पैसा नसेल. त्या वेळी आपल्याला सर्व साधकांचा सांभाळ करावा लागणार आहे. त्यासाठी सिद्धता करायला हवी.’’

तेव्हा मला वाटले, ‘आश्रमातीलच काय; पण प्रसारातील साधकदेखील स्वतःच्या भविष्याविषयी इतका सतर्क राहून विचार करत नसेल’; पण परात्पर गुरु डॉक्टर मात्र काळाच्या पलीकडे जाऊन साधकांच्या हितासाठी झटत आहेत.’

– अधिवक्ता योगेश जलतारे, रामनाथी आश्रम, गोवा.

Leave a Comment