दक्ष प्रजापती यांची पुत्री देवी सती स्वत:च्या पित्याने आयोजित केलेल्या यज्ञ समारंभामध्ये पती शिव यांचा अपमान सहन करू शकली नाही आणि त्याच यज्ञवेदीमध्ये उडी घेऊन देवी सतीने तिचे जीवन संपवले. भगवान शिवाला जेवढा राग स्वत:च्या अपमानाचा आला नाही, त्यापेक्षा अधिक दु:ख सतीच्या मरणाने झाले. या दुर्घटनेने भगवान शिव अस्वस्थ झाले. त्यांनी सतीच्या मृत शरिराला खांद्यावर घेऊन प्रलयंकारी तांडव नृत्याला आरंभ केला. त्यामुळे संपूर्ण विश्व विनाशाच्या मार्गावर येऊन पोहोचले. ही सर्व स्थिती पाहून सर्व देवता श्रीविष्णूंच्या जवळ गेले आणि हा प्रलय रोखण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली. देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांत हळू हळू खंडित केले. अशा प्रकारे देवी सतीच्या शरीराचे ५१ भाग झाले. ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरिराचा अंश पडत होता, तेथे शक्तीपीठ स्थापन झाले. या ५१ शक्तिपिठांपैकी एक स्थान पाटलीपुत्रची (पटणाची) ग्रामदेवी ‘भगवती पटनेश्वरी’ हिचे मंदिर आहे. या ठिकाणी देवी सतीची दक्षिण (उजवी) जांघ पडली होती. त्याची खूण आजही मंदिरात आढळते.
पटना (बिहार) येथे पटन देवीची २ मंदिरे आहेत. बडी पटन देवी आणि छोटी पटन देवी ! मानसिंह नावाचा राजा प्रथम पश्चिम द्वाराकडून आलेे म्हणून पहिले मंदिर बडी पटन देवी आणि नंतर पूर्व द्वाराकडून आले म्हणून छोटी पटन देवी मंदिर ! बडी पटन देवीच्या मंदिरात श्री लक्ष्मी, श्री सरस्वती आणि श्री काली देवी यांच्या मूर्ती आहेत. येथील मूर्ती कोणी स्थापन केली ते माहीत नाही. छोटी पटन देवी मंदिर शिवपिंड स्वरूपात आहे. विजय शंकर गिरी हे येथील महंत आहेत.
सर्व देवींना भावपूर्ण नमस्कार करूया !