धनुषकोडी

एक उद्ध्वस्त आणि दुर्लक्षित तीर्थक्षेत्र !

श्री. चेतन राजहंस
श्री. चेतन राजहंस

भारताच्या दक्षिण-पूर्व शेषटोकावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे धनुषकोडी ! हे ठिकाण पवित्र रामसेतूचे उगमस्थान आहे. गेल्या ५० वर्षांपासून हिंदूंच्या या पवित्र तीर्थस्थानाची स्थिती एका उद्ध्वस्त नगरासारखी झाली आहे. २२ डिसेंबर १९६४ या दिवशी हे नगर एका चक्रीवादळाने उद्ध्वस्त केले. तद्नंतर गेल्या ५० वर्षांत या तीर्थक्षेत्राचे पुनरूज्जीवन करणे, तर सोडाच; पण शासनाने हे नगर ‘भुताचे नगर’ (Ghost Town) म्हणून घोषित करून त्याची प्रतारणा केली. आज या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने बंगाल, आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतील हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या अभ्यासगटाने धनुषकोडीला भेट दिली. या भेटीत धनुषकोडीचे उलगडलेले भीषण वास्तव या लेखातून मांडत आहे.

 

धनुषकोडी येथील गोड पाणी, हे नैसर्गिक आश्‍चर्य !

धनुषकोडीच्या दक्षिणेला असलेला हिंदी महासागर निळाशार दिसतो, तर उत्तरेला असलेला बंगालचा उपसागर मळकट काळ्या रंगाचा दिसतो. या दोन्ही सागरांमधील अंतर १ कि.मी एवढेही नाही. दोन्ही सागरांचे पाणी खारे आहे. असे असले, तरी धनुषकोडी येथे एक ३ फुटापर्यंत खड्डा खोदला की, त्याला गोड पाणी लागते, हा निर्सगाने केलेला चमत्कारच नाही का ?

अवकाशातून दिसणारा रामसेतू (नासाने उपग्रहाद्वारे काढलेले चित्र)

धनुषकोडीचा भूगोल

तमिळनाडू राज्याच्या पूर्वकिनार्‍यावर रामेश्‍वरम् हे तीर्थक्षेत्र आहे. रामेश्‍वरम् च्या दक्षिण बाजूस ११ कि.मी. अंतरावर धनुषकोडी हे नगर (शहर) आहे. येथून श्रीलंका केवळ १८ मैल (अनुमाने ३० कि.मी.) अंतरावर आहे ! बंगालचा उपसागर (महोदधि) आणि हिंदी महासागर (रत्नाकर) यांच्या पवित्र संगमावर वसलेले आणि केवळ ५० गज (अनुमाने १५० फूट) रुंद असलेले धनुषकोडी हे वाळूने व्यापलेले स्थान आहे.

 

रामेश्‍वरम् आणि धनुषकोडी यांचे धार्मिक माहात्म्य !

संपूर्ण धनुषकोडी नगरात वाळूचे साम्राज्य असून त्यात जागोजागी वास्तूंचे भग्नावशेष दिसतात.

उत्तरभारतामध्ये जे काशीचे धार्मिक महत्त्व आहे, तेच महत्त्व दक्षिण भारतात रामेश्‍वरम् ला आहे. रामेश्‍वरम् हे हिंदूंच्या पवित्र चारधाम यात्रेपैकी एक धामही आहे. पुराणादी धर्मग्रंथांनुसार काशीच्या श्री विश्‍वेश्‍वराची यात्रा रामेश्‍वरम्च्या श्री रामेश्‍वराच्या दर्शनाविना पूर्ण होत नाही. काशीची तीर्थयात्रा बंगालचा उपसागर (महोदधि) आणि हिंदी महासागर (रत्नाकर) यांच्या संगमावर असलेल्या धनुषकोडी येथे स्नान केल्यानंतर आणि त्यानंतर काशीच्या गंगाजलाने रामेश्‍वराला अभिषेक केल्यानंतरच पूर्ण होते.

 

१९६४च्या चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या रेल्वेस्थानकाच्या वास्तूचे भग्नावशेष

धनुषकोडीचा इतिहास आणि रामसेतूची प्राचीनता !

रामसेतूच्या अलीकडील भागाला धनुषकोडी (‘कोडी’ म्हणजे धनुष्याचे टोक) असे म्हणतात; कारण साडेसतरा लाख वर्षांपूर्वी रावणाच्या लंकेत (श्रीलंकेत) प्रवेश करण्यासाठी श्रीरामाने त्याच्या ‘कोदंड’ धनुष्याच्या टोकाने सेतू बांधण्यासाठी हे स्थान निश्‍चित केले. एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते.

रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. या रामसेतूची रूंदी आणि लांबी यांचे प्रमाण एकास दहा आहे, असे सविस्तर वर्णन वाल्मीकि रामायणात आहे. प्रत्यक्ष मोजमापन केल्यानंतरही त्यांची रूंदी ३.५ कि.मी एवढी असून लांबी ३५ कि.मी एवढी आहे. या सेतूच्या निर्माणकार्याच्या वेळी चिमुकल्या खारीने उचललेल्या वाट्याची कथा आणि पाण्यावर तरंगत असणारे तेथील दगड या गोष्टी आम्हा हिंदूंच्या पिढ्यान्पिढ्यांना माहीत आहेत.

 

धनुषकोडी आणि रामभक्त बिभीषण

श्रीराम-रावण महायुद्धापूर्वी धनुषकोडी नगरातच रावणबंधू बिभीषण हा प्रभु रामचंद्रांना शरण आला होता. श्रीलंकेतील युद्धसमाप्तीनंतर प्रभु रामचंद्रांनी याच नगरात बिभीषणाचा श्रीलंकेचा सम्राट म्हणून राज्याभिषेक केला. याच वेळी लंकाधिपती बिभीषण प्रभु रामचंद्रांना म्हणाला, भारतातील शूर आणि पराक्रमी राजे रामसेतूचा उपयोग करून वारंवार श्रीलंकेवर आक्रमणे करतील आणि श्रीलंकेचे स्वातंत्र्य नष्ट करतील. यासाठी प्रभु आपण हा सेतू नष्ट करावा. आपल्या भक्ताची प्रार्थना ऐकून कोदंडधारी प्रभु रामचंद्रांनी रामसेतूवर बाण सोडून तो पाण्यात बुडवला. त्यामुळे हा सेतू पाण्याच्या २-३ फूट खाली गेला आहे. आजही रामसेतूवर कोणी उभे राहिल्यास त्याच्या कमरेपर्यंत पाणी असते.

 

रामसेतूचा विध्वंस करणारा सेतूसमुद्रम् प्रकल्प !

केंद्रातील हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस शासनाने व्यावसायिक लाभ लक्षात घेऊन ‘सेतूसमुद्रम शिपिंग कॅनॉल’ या प्रकल्पाद्वारे हा पुराणकालीन सेतू उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले होते. हा प्रकल्प म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेवरच आघात होता. अनुमाने २४ टक्के रामसेतू उद्ध्वस्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पावर स्थगिती आणली. तोपर्यंत मजबूत रामसेतूचा एक चतुर्थांश भाग ‘ड्रील’ करण्यात आला होता. त्यामुळे या सेतूमधील मोठे दगड चक्काचूर झाले. आजही या दगडांचे अवशेष हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांत पाण्यावर तरंगतांना दिसतात. मासेमारी करणार्‍यांच्या जाळ्यात बर्‍याचदा हे तरंगणारे दगड येतात. काही लोक धनुषकोडी किंवा रामेश्‍वरम येथे ते दगड विकतांना दिसतात. अशा प्रकारे ऐतिहासिक आणि धार्मिक आस्थेशी संबंधित वास्तूचा विध्वंस करणारे काँग्रेसवाले अखिल मानवजातीचेच नव्हे, तर इतिहासाचेही अपराधी आहेत. त्यांचा अपराध क्षम्य नाही !

 

धनुषकोडी हे वर्ष १९६४ पूर्वी मोठे नगर होते !

ब्रिटीशकाळात धनुषकोडी हे एक मोठे नगर होते, तर रामेश्‍वरम् हे लहानसे गाव होते. येथून श्रीलंकेला ये-जा करण्यासाठी नौकांची सोय होती. त्या वेळी श्रीलंकेला जाण्यासाठी पारपत्र (पासपोर्ट) लागत नव्हते. धनुषकोडी ते थलाईमन्नार (श्रीलंका) या नौकेच्या प्रवासाचे तिकीट केवळ १८ रुपये होते. या नौकांद्वारे व्यापारी वस्तूंचीही देवाणघेवाण होत असे. वर्ष १८९३ मध्ये अमेरिकेत धर्मसंसदेसाठी गेलेले स्वामी विवेकानंद वर्ष १८९७ मध्ये श्रीलंकामार्गे भारतात आले, तेव्हा ते धनुषकोडीच्या भूमीवर उतरले होते. वर्ष १९६४ मध्ये धनुषकोडी हे एक नावारूपाला आलेले पर्यटनस्थळ आणि तीर्थक्षेत्र होते. भाविकांसाठी येथे हॉटेल, कपड्यांची दुकाने आणि धर्मशाळा होत्या. त्या वेळी धनुषकोडीत जहाजबांधणी केंद्र, रेल्वेस्थानक, रेल्वेचे छोटे रुग्णालय, पोस्ट कार्यालय आणि मत्स्यपालनासारखी काही शासकीय कार्यालये होती.

वर्ष १९६४ च्या चक्रीवादळाच्या पूर्वी चेन्नई आणि धनुषकोडी यांच्यामध्ये मद्रास एग्मोरपासून बोट मेल नावाने ओळखली जाणारी रेल्वेसेवा होती. पुढे श्रीलंकेत फेरीबोटीतून जाणार्‍या प्रवाशांसाठी ती उपयुक्त होती.

 

धनुषकोडीचा विध्वंस करणारे वर्ष १९६४ चे चक्रीवादळ !

१९६४ मध्ये आलेले चक्रीवादळ हे धनुषकोडीचा विध्वंस करणारे ठरले. १७ डिसेंबर १९६४ या दिवशी दक्षिणी अंदमान समुद्रात ५ डिग्री पूर्वेस त्याचे केंद्र होते. १९ डिसेंबरला त्याने एका प्रचंड मोठ्या चक्रीवादळाच्या रूपात वेग धारण केला. २२ डिसेंबरच्या रात्री ते २७० कि.मी. प्रतिघंटा वायुवेगाने श्रीलंकेला पार करून ते धनुषकोडीच्या किनार्‍यावर येऊन आदळले. चक्रीवादळाच्या वेळी आलेल्या २० फूट उंच लाटेने धनुषकोडी शहाराच्या पूर्वेकडील पवित्र संगमावरून नगरावर आक्रमण केले आणि पूर्ण धनुषकोडी शहर नष्ट केले.

धनुषकोडीच्या बसस्थानकाजवळ चक्रीवादळात बळी पडलेल्यांचे एक स्मारक बांधण्यात आले आहे. त्यावर लिहिले आहे – ‘उच्च वेगाने वहाणार्‍या वार्‍यासह आलेल्या उच्च गतीच्या चक्रीवादळात २२ डिसेंबर १९६४ च्या रात्री प्रचंड हानी झाली आणि धनुषकोडी उद्ध्वस्त झाले !’

 

चक्रीवादळात रेल्वेचा पूल आणि रेल्वेगाडी नष्ट !

२२ डिसेंबरच्या अतिशय दुर्दैवी रात्री ११.५५ वाजता धनुषकोडी रेल्वेस्थानकात प्रवेश केलेली ६५३ क्रमांकाची ‘पंबन-धनुषकोडी पॅसेंजर’ (ती तिच्या नियमित सेवेसाठी पंबनहून ११० प्रवासी आणि ५ रेल्वे कर्मचारी यांसह निघाली होती) या प्रचंड लाटेच्या आक्रमणाची बळी ठरली ! त्या वेळी ती धनुषकोडी रेल्वेस्थानकापासून काही मीटर अंतरावर होती. पूर्ण गाडी तिच्यातील ११५ लोकांसह वाहून गेली. पंबनहून चालू झालेला धनुषकोडीचा रेल्वेमार्ग १९६४ च्या चक्रीवादळात नष्ट झाला ! चक्रीवादळानंतर रेल्वेमार्गाची दुर्दशा झाली आणि काही काळानंतर तो पूर्णतः वाळूखाली झाकला गेला !

 

प्रचंड वेगाने येणारे पाणी रामेश्‍वरम् च्या मंदिराजवळ थांबले !

हे चक्रीवादळ पुढे पुढे सरकत रामेश्‍वरम् पर्यंत आले होते, तेव्हाही ८ फूट उंचीपर्यंतच्या लाटा येत होत्या. या परिसरातील एकूण १ सहस्र ८०० हून अधिक लोक या चक्रीवादळात मृत झाले. स्थानिकांच्या मते, हा आकडा ५ सहस्र एवढा होता. धनुषकोडीतील सर्व रहिवाशांची घरे आणि अन्य वास्तू यांची या चक्रीवादळात दुर्दशा होऊन त्यांचे केवळ भग्नावशेष राहिले. या बेटावर १० कि.मी. वेगाने वारे वाहिले आणि पूर्ण शहर उद्ध्वस्त झाले; परंतु प्रत्यक्षदर्शी सांगतात की, समुद्राच्या लाटांचे प्रचंड वेगाने येणारे पाणी रामेश्‍वरम् च्या मुख्य मंदिराजवळ थांबले होते ! विशेष म्हणजे शेकडो लोकांनी रामेश्‍वरम् च्या मंदिरात चक्रीवादळापासून वाचण्यासाठी आसरा घेतला होता !

 

केवळ एक व्यक्ती वाचली !

वर्ष १९६४ च्या वादळात धनुषकोडी नगरातील सर्व जण ठार झाले. केवळ एकच व्यक्ती या वादळात वाचली, तिचे नाव कालियामन ! या व्यक्तीने समुद्रातील चक्रीवादळात पोहून स्वतःचे प्राण वाचवले; म्हणून शासनाने त्याचे नाव धनुषकोडीच्या शेजारील गावाला देऊन त्याचा गौरव केला. हे गाव ‘निचल कालियामन’ या नावाने ओळखले जाते. निचल म्हणजे पोहणारा !

 

शासनाकडून धनुषकोडी हे ‘भुताचे शहर’ म्हणून घोषित !

या संकटानंतर लगेचच तत्कालीन मद्रास शासनाने आकाशवाणीवरून धनुषकोडी या नगराला भुताचे शहर (Ghost Town) असे घोषित केले, तसेच तेथे नागरिकांना रहाण्यासाठी प्रतिबंध केला. निर्मनुष्य नगरांना भुताचे शहर (Ghost Town), असे संबोधले जाते. आता केवळ काही मच्छीमार आणि दुकानदार व्यवसायासाठी दिवसभर जाऊ शकतात. संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी त्यांना तेथून परतावे लागते.

 

वाळू आणि वास्तूंचे भग्नावशेष यांचे नगर !

आता धनुषकोडी या नगरावर पूर्णतः (मध्ये मध्ये समुद्राचे पाणी आणि वनस्पती असलेल्या) वाळूचे साम्राज्य आहे. अवकाशातील चित्रांतून या नगराकडे पाहिल्यास केवळ वाळूच दिसते. या वाळूमध्ये जागोजागी वास्तूंचे भग्नावशेष दिसतात. जहाजबांधणी केंद्र, रेल्वेस्थानक, टपाल कार्यालय, रुग्णालय, पोलीस आणि रेल्वे वसाहतीतील निवासस्थाने, शाळा, मंदिरे, चर्च आदींचे अवशेष येथे ठळकपणे दिसतात.

 

धनुषकोडीच्या विकासाकडे दुर्लक्ष !

धनुष्यकोडी नगरात जाण्यापूर्वी भाविकांना ‘एकत्रितपणे दिवसा जा आणि सूर्यास्तापूर्वी परत या’ असे सांगतात; कारण पूर्ण १५ कि.मी.चा रस्ता हा निर्मनुष्य आणि भीतीदायक आहे. सध्या जवळजवळ ५०० हून अधिक यात्रेकरू प्रतिदिन धनुषकोडीला येतात. सण आणि पौर्णिमा या दिवशी येथे सहस्रोंच्या संख्येने यात्रेकरू येतात. धनुषकोडीला पूजा-अर्चा करू इच्छिणार्‍या भाविकांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय नाही. खाजगी वाहनांचे चालक यात्रेकरूंकडून ५० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत कितीही भाडे घेतात. संपूर्ण देशातील रामेश्‍वरम् ला जाणार्‍या यात्रेकरूंच्या मागणीनुसार वर्ष २००३ ला दक्षिण रेल्वे मंत्रालयाने रामेश्‍वरम् पासून धनुषकोडीपर्यंत १६ कि.मी. रेल्वेमार्ग निर्माण करण्यासाठी एक अहवाल पाठवला होता; मात्र अद्यापपर्यंत हा प्रकल्प दुर्लक्षित आहे.

 

अयोग्य शासकीय धोरणामुळे रामसेतूचे दर्शन दुर्लभ !

भारतभरातून भाविक धनुषकोडी येथे केवळ पवित्र रामसेतूचे दर्शन घेण्यासाठी येतात. धनुषकोडीला आल्यानंतर कळते की, रामसेतूचे दर्शन घेण्यासाठी कस्टमची अनुमती लागते. हे कस्टमचे कार्यालय रामेश्‍वरम् येथे आहे. आधीच भाविक रामेश्‍वरम् ते धनुषकोडी डांबरी मार्ग नसतांना वाळूतून आणि काही वेळा सागरातून खडतर प्रवास करत येथे पोहोचतात. येथे आल्यानंतर त्यांना पुन्हा अनुमती घेण्यासाठी परत १८ कि.मी अंतर खडतर प्रवास करून रामेश्‍वरम् ला जावे लागणे, ही भाविकमनाची कुचेष्टा आहे. शासन धनुषकोडी येथे कस्टमचे कार्यालय का उघडत नाही ? त्यामुळे ९० टक्के भाविक धनुषकोडी येथे येऊनही पवित्र रामसेतूचे दर्शन घेऊ शकत नाहीत.

 

श्रीलंकेशी तुटलेला संपर्क !

भारत-श्रीलंका यांच्यात सागरी सीमावाद निर्माण झाल्याने धनुषकोडी येथून थलाईमन्नार येथे ये-जा करणारी सागरी वाहतूक बंद झाली. त्यामुळे या भागातील हिंदूंचा श्रीलंकेतील हिंदूंशी संपर्क तुटला. तत्पूर्वी प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता श्रीलंकेतून भारतात दूध घेऊन येत असे. या दुधाने दुसर्‍या दिवशी पहाटे रामेश्‍वराच्या शिवलिंगावर अभिषेक केला जाई. ही परंपरा अनेक वर्षांची होती. भारत-श्रीलंका यांच्यातील सागरी सीमावादामुळे ती नामशेष झाली. पूर्वी थलाईमन्नार ते धनुषकोडी हा ३५ कि.मी अंतराचा प्रवास नौकेद्वारे करण्यासाठी २ घंटे लागायचे. आता थलाईमन्नार येथून कोलंबो येथे ५०० कि.मी. १० घंट्यांचा प्रवास करून जावे लागते. कोलंबो ते मदुराई विमानसेवा आहे. हा प्रवास विमानाने करण्यासाठी १ घंटा लागतो. मदुराई ते रामेश्‍वरम् हा प्रवास २०० कि.मी अंतर रेल्वेने वा बसने करण्यासाठी साडेचार घंटे लागतात.

 

भाविकांची परीक्षा घेणारा रामेश्‍वरम् ते धनुषकोडी मार्गहीन प्रवास !

रस्ता बांधलेला नसल्याने १८ कि.मी. चा प्रवास वाळू आणि सागरी जल यातून करावा लागतो.

सद्यस्थितीत रामेश्‍वरम् येथून धनुषकोडीला जायचे असेल, तर एकतर त्या वाळू आणि समुद्रातून मार्ग काढत पायी जावे लागते किंवा खाजगी बसगाडीतून ! रामेश्‍वरम् ला आल्यानंतर धनुषकोडी येथे येऊन रामसेतूचे दर्शन घेण्याची भाविकांची इच्छा असते. या १८ कि.मी. अंतर असलेल्या प्रवासात हेमरपुरम् पर्यंत डांबरी रस्ता आहे. तेथून पुढील प्रवास संपूर्ण सागरी किनार्‍यावरील वाळूतून किंवा काही वेळा सागराच्या किनार्‍याजवळील पाण्यातून वाहन चालवून करावा लागतो. या ७ कि.मी. अंतरासाठी रस्ताच बांधलेला नाही. भारताचे प्रमुख तीर्थक्षेत्र असूनही येथे रस्ता बांधला न जाणे, हे आश्‍चर्यकारक आहे. भाविकांना येथे येण्याची इच्छा असते. ते अतिशय जोखीम पत्करून धनुषकोडीपर्यंत येत असतात. बहुतांश भाविक हेमरपुरम् पर्यंतच येतात. तेथून पुढे मार्ग नसल्याने ते पुढे येण्याचे धाडस दाखवत नाही. जे धाडसी असतात, तेच भाविक धनुषकोडीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. रामेश्‍वरम् ते धनुषकोडी अद्यापपर्यंत मार्ग का बांधण्यात आला नाही, हा प्रश्‍न येथे येणार्‍या प्रत्येक भाविकाच्या मनात येतो. हिंदूंच्या धर्मभावनांना कोणतेही महत्त्व द्यायचे नाही, हे भारतीय राज्यकर्त्यांचे निधर्मीवादाचे तत्त्व येथेही दिसून येते.

केवळ धर्मभावनेच्या दृष्टीनेच नव्हे, तर राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीनेही हा मार्ग बनणे आवश्यक आहे. काशीला जाणारे कोट्यवधी हिंदू जात, भाषा, प्रांत आदी भेद त्यागून रामेश्‍वराच्या दर्शनाला येण्याची आस बाळगून असतात. केवळ दक्षिण भारतातील भाविकच नव्हे, तर काश्मीरसह उत्तर भारत, आसामसह ईशान्य भारत, बंगालसह पूर्व भारत, मुंबई, गुजरात आदी पश्‍चिम भारतातील नागरिक येथे दर्शनासाठी येतात किंवा येण्याची इच्छा बाळगतात. धनुषकोडी हे राष्ट्रीय एकता साधणारे नगर आहे. तमिळनाडू शासन आणि केंद्रशासन हा लहानसा मार्ग बांधून हा राष्ट्रीय एकतेचा आधार का मजबूत करत नाहीत ?

महानगरात मेट्रो ट्रेन चालू करण्यासाठी सहस्रो कोटी रुपये खर्च केले जातात; मग केवळ ५०-६० कोटी रुपये खर्च असलेला हा मार्ग का बांधला जात नाही ? काश्मीरमध्ये पूंछ ते श्रीनगर या नगरांमध्ये मुगलकालीन मार्ग होता. या मार्गाला इस्लामी संस्कृतीची देणगी संबोधून त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले; मग १९६४ या वर्षी उद्ध्वस्त झालेला; पण हिंदूंच्या आस्थाकेंद्राशी संबंधित असलेला हा मार्ग पुनश्‍च बांधण्यात काय अडचण येते ?

 

तीर्थक्षेत्रांचा खरा विकास हिंदु राष्ट्रातच होईल !

धनुषकोडीचे भीषण वास्तव प्रत्यक्ष पाहिल्यानंतर सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी भारतीय तीर्थक्षेत्रांकडे कसे दुर्लक्ष केले आहे, हे लक्षात येते. काशीला स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा करणारे भारताचे विकासपुरुष काशीच्या यात्रेला पूर्णत्व देणार्‍या धनुषकोडी नगरालाही न्याय देतील का ?, हा प्रश्‍नच आहे. हिंदूंची असंवेदनशीलताही या दुर्गतीचे एक कारण आहे. आपण हिंदू असेच असंवेदनशील राहिलो, तर आज भरभराटीला असलेल्या अनेक तीर्थक्षेत्रांच्या भविष्यातील अवस्था धनुषकोडीसारखी होईल, हे आपण जाणून असायला हवे. हिंदूंनी शासनाने हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी, तसेच तेथे धर्मशाळा, रस्ते आदी सुविधा निर्माण करण्यासाठी आग्रही मागणी केली पाहिजे. हिंदूहित साधणारे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापणे, हाच खरा तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठीचा उपाय आहे.

– श्री. चेतन राजहंस

Leave a Comment