वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या ५ व्या दिवशी म्हणजे २८ जून या दिवशीच्या पहिल्या सत्रात सनातन संस्थेच्या ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या गुजराती ‘ई-बुक’चे प्रकाशन उत्तरप्रदेशातील पावन चिंतन धारा आश्रमचे संस्थापक पू. प्रा. पवन सिन्हा गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर माजी मुख्य जिल्हा न्यायाधीश अधिवक्ता दिलीप देशमुख, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समनव्यक श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्थित होते.
27.6.2024
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव मधील हिंदु राष्ट्रसाठी वैचारिक आंदोलन या विषयावरील सत्र
हिंदु राष्ट्राच्या ‘नॅरेटिव्ह’च्या विरोधात लढण्यासाठी बौद्धिक योगदान द्या ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
सद्य:स्थितीत विषयाचा प्रॉपगँडा करून राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह’ पसरवले जात आहेत. यामागे एखादी व्यक्ती असल्याचे वरवर दिसत असले, तरी यामागे राष्ट्रविरोधी शक्ती कार्यरत आहेत. मार्क्सवादी, नास्तिकतावादी, पुरोगामी, मिशनरी हे एकत्रितपणे येऊन अजेंडा ठेवून काम करत आहेत. भारताला तोडण्याचा आणि हिंदु धर्म नष्ट करण्याचा त्यांचा डाव आहे. अकलाख याच्या हत्येनंतर हे पुरस्कार वापसीची चळवळ वापरतात; मात्र राजस्थानमधील कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर मात्र हे मौन बाळगतात. हे लोक लव्ह जिहादविषयी बोलत नाहीत. एकीकडे ही मंडळी धर्माला ‘अफूची गोळी’ म्हणतात, तर दुसरीकडे केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करतात. निवडक घटनांविषयी हे शांतता बाळगतात. यांचा सामना करण्यासाठी हिंदूंनाही एकत्रित कार्य करावे लागेल. चित्रपटसृष्टी, सामाजिक माध्यमे, न्यायव्यवस्था, राजकारण, क्रीडा, कला आदी माध्यमांतून राष्ट्र आणि हिंदु धर्म विरोधी कथानक सिद्ध करण्याचे काम झालू आहे. मागील १० वर्षांत या सर्व क्षेत्रात मोठे वैचारिक ध्रुवीकरण झाले आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. बौद्धिक समाज मतभेदामुळे एकत्रित कार्य करत नाही, असे म्हटले जाते; मात्र भविष्यात हा निष्कर्ष पालटावा लागेल. बौद्धिक मतभेद विसरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना एकत्रित कार्य करावे लागेल. ‘ब्रेन वॉशिंग’ म्हणजे खर्या अर्थाने बुद्धी शुद्ध करून बौद्धिक युद्धामध्ये सहभागी व्हावे लागेल, असे वक्तव्य सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ‘हिंदु विचारमंथन महोत्सव : वैचारिक आंदोलनाची दिशा’ या विषयावर बोलतांना केले.
26.6.2024
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव मध्ये अनुभवकथन आणि उपासनेचे महत्त्व
हिंदु राष्ट्राचे कार्य थांबवण्यासाठी ‘हिंदु आतंकवादा’चे कथानक रचण्याचा प्रयत्न ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समझौता एक्सप्रेस बाँबस्फोट, अजमेर बाँबस्फोट, मालेगाव स्फोट प्रकरण असो किंवा डॉ. दाभोलकर हत्या आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरण असो, अशा विविध प्रकरणांत निरपराध हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली; पण त्यांच्या विरोधात काहीच पुरावे मिळाले नाहीत. यात त्यांचे जीवन मात्र उद्ध्वस्त झाले. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना कारागृहात टाकायचे आणि त्यांच्याविषयी ‘हिंदु आतंकवादा’चे हे खोटे कथानक चालवून त्यांची अपकीर्ती करायची, हे हिंदुविरोधी शक्तींचे षड्यंत्र होते. यातून त्यांना हिंदु राष्ट्राचे कार्य थांबवायचे होते, असे उद्गार सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त काढले.
ते म्हणाले, ‘‘डॉ. दाभोलकर हत्या आणि कॉ.पानसरे हत्या प्रकरणांतही २५ हून अधिक निरपराध हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते अद्यापही कारागृहात आहेत. ते कोणत्याही संघटनेचे असले, तरी ‘हिंदु आतंकवाद’ हे कथानक सिद्ध करणार्यांसाठी ते हिंदूच आहेत. अशा हिंदुत्वनिष्ठांच्या मागे आपली संवेदना कायम असली पाहिजे आणि त्यांना सोडवणे हे प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनेला स्वतःचे कर्तव्य वाटले पाहिजे. आज वृत्तवाहिन्या हिंदु संघटनांच्या बाजूने नाहीत. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना खोट्या कथानकांना सत्याच्या आधारावर तोंड द्यायचे आहे. त्यासाठी आपली ‘इकोसिस्टिम’ अधिक बलवान करणे आवश्यक आहे. आपला पथ धर्माचा आहे. त्यामुळे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील; पण ते आपल्याला नष्ट करू शकणार नाहीत. धर्माच्या मार्गावर चालत असल्यामुळे आपले कुणी वाईट करू शकत नाही. या संघर्षात आपलाच विजय होणार असून हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चितपणे होणार आहे.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना मिळालेला ‘भारत गौरव पुरस्कार’ हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अद्वितीय कार्याचा सन्मान ! – सद़्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सनातन संस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. सनातन संस्था ही धर्मकार्याची प्रसार आणि प्रचार करणारी संस्था आहे. सनातन संस्था जिज्ञासूंना आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना शिकवते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी २२ मार्च १९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सनातन संस्थेने देशभर गावागावांत साधनासत्संग चालू करून लोकांना साधनेचे महत्त्व सांगितले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्थेने विविध विषयांवर ग्रंथनिर्मिती केली आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ प्रकाशित करून ‘हिंंदु राष्ट्रा’चा विचार समोर ठेवला. सनातन संस्थेच्या दिव्य कार्याची कीर्ती आता विदेशातही पसरली आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या वैश्विक कार्यामध्ये सनातन संस्थेच्या अद्वितीय योगदानामुळे ५ जून २०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये ‘भारत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अद्वितीय कार्याचा हा सन्मान आहे.
25.6.2024
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ‘भारत गौरव’ पुरस्कार देऊन आम्हीच गौरवान्वित झालो ! – पंडित सुरेश मिश्रा, संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, सर्व ब्राह्मण महासभा, जयपूर
विदेशातील हिंदूंना जोडण्यासाठी आणि भारतियांना विदेशात वसवण्यासाठी आम्ही ‘भारत गौरव’ पुरस्काराचा प्रारंभ केला आहे. त्या माध्यमातून सहस्रो भारतियांना विदेशात वसवण्यात यश मिळाले आहे. हा पुरस्कार देण्यासाठी काही वेळा भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही नावे सुचवली आहेत. इंग्लंडच्या संसदेत ८ वेळा या पुरस्काराचे वितरण झाले आहे. यावर्षी फ्रान्सच्या संसदेत झाले आणि नंतर न्यूयॉर्कमध्ये करण्याचे ठरवले आहे.
या वर्षी ‘भारत गौरव’ पुरस्कार फ्रान्सच्या संसदेत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दिला. तो त्यांच्या उत्तराधिकारी (सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांनी स्वीकारला. त्यामुळे आम्हीच गौरवान्वित झालो. या अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी समितीचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला समितीची माहिती पुस्तिका दाखवली. त्यावरील प.पू. डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिले आणि त्यांचे छायाचित्र पाहून त्यांच्या देवत्वाकडे मी इतका आकर्षित झालो की, मला वाटले, ‘हे ‘भारत गौरव’ आहेत.’ त्याचवेळी मी त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.
24.6.2024
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी संदेश
सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या सर्व हिंदु राष्ट्रविरांना माझा नमस्कार. या वर्षी हिंदु राष्ट्र अधिवेशनाची तपपूर्ती (१२ वर्षे) होत आहे. या अधिवेशनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या धर्मनिष्ठ आणि देशभक्त यांच्या संघटनामुळे आज धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्मितीच्या संकल्पशक्तीची स्पंदने वैश्विक स्तरावरही जाणवत आहेत. हिंदु राष्ट्र ईश्वराच्या इच्छेनुसार योग्य वेळी स्थापन होणार आहे. खरे तर अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन सूक्ष्मातून रामराज्याला, म्हणजे हिंदु राष्ट्राला प्रारंभ झालेलाच आहे. आता रामराज्यरूपी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष साकार होण्यासाठी स्वक्षमतेनुसार तन-मन-धन आणि प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची, म्हणजेच सर्वोच्च योगदान देण्याची आवश्यकता आहे. सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे, हे लक्षात घेऊन धर्मसंस्थापनेचे महान कार्य करा !
काय आहे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव ?
संपूर्ण विश्वभरात हिंदुविरोधी वक्तव्य आणि हिंदुद्वेषांच्या गुन्ह्यांमध्ये (hate crime) अभूतपूर्व वाढ झाली आहे. दररोज भारतीय हिंदूंना खोटी माहिती, फसवणूक, कट्टरता आणि द्वेषजन्य गुन्ह्यांचा सामना करावा लागत आहे. हिंदूंवर सर्व बाजूंनी आक्रमण होत आहेत. हा हिंदुद्वेष आपण किती काळ सहन करणार? धर्माच्या आधारावर असलेले हिंदु राष्ट्र हाच यावर एकमेव उपाय आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात हिंदु जनजागृती समिती मशालवाहक राहिली आहे. या ध्येयाला साध्य करणे सोपे काम नाही आणि यासाठी प्रत्येक हिंदूच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे. म्हणून हिंदुत्वासाठी समर्पित प्रत्येक लहान-मोठ्या हिंदु संघटनेला एकत्रित करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन केले आहे.
२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत गोवा येथे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव (१२ वे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) आयोजित केले आहे. भारताला शीघ्रातीशीघ्र हिंदु राष्ट्र कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कार्ययोजना बनवण्यासाठी देश-विदेशातील १००० हून अधिक धर्माभिमानी, अधिवक्ता, उद्योगपती इत्यादी यात सहभागी होतील.