आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना शिकवणारी सनातन संस्था !
भाग ७ वाचण्यासाठी भेट द्या – आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ७
अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी
सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
आपत्कालीन लेखमालिकेतील मागील भागात आपण कौटुंबिक स्तरावर लागणार्या नित्योपयोगी वस्तूंना असणार्या पर्यायांविषयी माहिती घेतली. या लेखांकात अन्नधान्यादींच्या साठवणुकीविषयी माहिती पहाणार आहोत. पावसाळा चालू असल्याने खरेदी केलेले धान्यादी पदार्थ वाळवता येणार नाहीत, तरी ते पदार्थ टिकण्यासाठी अन्य उपाय करता येतील.
३. आपत्काळाच्या दृष्टीने दैनंदिन (शारीरिक) स्तरावर करायच्या सिद्धता
३ ए. अन्नावाचून उपासमार न होण्यासाठी हे करावे !
३ ए १. पुढील काही मास किंवा काही वर्षे पुरेल एवढ्या अन्नधान्याची साठवणूक करणे
आपत्काळात बाजारपेठेतील दुकानांमध्ये अन्नधान्य उपलब्ध असले, तरी त्याची खरेदी करण्यासाठी प्रचंड दाटी (गर्दी) झाल्याने सर्व अन्नधान्य काही वेळेतच संपून जाते. शासनाकडून अन्नधान्याचा पुरवठा झाला, तरी तो मर्यादित स्वरूपात असतो. अशा परिस्थितीत आपल्यावर उपासमारीची किंवा अन्नधान्यासाठी वणवण करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आधीच अन्नधान्याची पुरेशा प्रमाणात साठवणूक करणे आवश्यक ठरते.
३ ए १ अ. कोणते पदार्थ साठवून ठेवावेत आणि कोणते साठवून ठेवू नयेत ?
धान्ये, कडधान्ये, तेल, तूप, मसाले यांचा साठा करावा. ठराविक ऋतूमध्ये येणार्या भाज्या किंवा फळे यांची साठवणूक शक्यतो करू नये; कारण आयुर्वेदानुसार त्या त्या ऋतूत पिकणार्या भाज्या आणि फळे खावीत, असे शास्त्र आहे. ‘अन्य ऋतूंत होणार्या भाज्या आणि फळे मुख्य आहार म्हणून किंवा अधिक प्रमाणात आणि प्रतिदिन खाणे’, हे रोगाला कारण ठरू शकते. ऋतूंनुसार भाज्या आणि फळे उपलब्ध होण्यासाठी शक्य असल्यास त्यांची लागवड करावी. .
३ ए १ आ. अन्नधान्य साठवणुकीमागील तत्त्वे
१. सेंद्रिय पद्धतीने (‘ऑरगॅनिक’ पद्धतीने – रासायनिक खते किंवा द्रव्ये न वापरता) पिकवलेली धान्ये आरोग्यासाठी लाभदायक असतात. अशी धान्ये रासायनिक फवारणी करून पिकवलेल्या धान्यांच्या तुलनेत अधिक दिवस टिकतात.
२. अन्नधान्याचे बुरशी, कीड, तसेच उंदीर, घुशी इत्यादी उपद्रवी प्राण्यांपासून रक्षण करणे आवश्यक असते.
३. पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता अधिक असल्याने या काळात अन्नधान्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
३ ए १ इ. अन्नधान्याची साठवणूक अशी करा !
‘अकोला, महाराष्ट्र येथील ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ वैद्य अरुण राठी अनेक वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने अन्नधान्याची साठवणूक करतात. ही पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
३ ए १ इ १. धान्याची खरेदी करणे आणि ते उन्हात वाळवणे
अ. साठवून ठेवण्याचे धान्य एप्रिल – मे या मासांमध्ये खरेदी करावे. शक्य असल्यास धान्य थेट शेतकर्याकडून खरेदी करावे.
आ. धान्य घरी आणल्यावर ते कडक उन्हात शक्य तितके खडखडीत वाळवावे. तांदूळ उन्हात वाळवल्याने ठिसूळ होतात. त्यामुळे ते उन्हात वाळवू नयेत.
इ. ज्या भांड्यात धान्य साठवून ठेवायचे असेल, ते भांडे स्वच्छ धुवून कडक उन्हात ठेवावे. भांडे उन्हात ठेवणे शक्य नसेल, तर ते थोडे गरम करावे. त्यातील पाणी पूर्णपणे निघून गेले पाहिजे.
ई. डब्यांऐवजी पिशव्या किंवा गोण्या वापरायच्या असतील, तर त्या शक्यतो नवीन असाव्यात. नवीन न मिळाल्यास त्या स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून त्यांतील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेल्याची निश्चिती करावी.
३ ए १ इ २. किडींपासून प्रतिबंध होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय – ‘धूपन’ करणे
अ. गोवर्या, कडूनिंबाची पाने, मोहरी, सैंधव मीठ, हळद आणि विशेषतः सुकी (तांबडी) मिरची एकत्र करून कापराच्या वडीच्या साहाय्याने जाळून धूर करावा. त्यावर धान्य साठवण्याचे भांडे उपडे धरावे आणि भांड्यामध्ये धूर भरू द्यावा.
आ. भांड्यात धूर भरल्यावर भांड्याचे झाकण लावून १५ ते २० मिनिटे बंद करून ठेवावे. या प्रक्रियेला ‘धूपन’ असे म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या अन्नधान्य साठवणुकीसाठी धूपन पुष्कळ महत्त्वाचे आहे. धूपन क्रियेमध्ये वापरल्या जाणार्या पदार्थांमुळे, विशेषतः तांबड्या मिरचीमुळे धान्याला कीड लागत नाही.
इ. ज्यांना शक्य आहे, त्यांनी धूपनासाठीच्या वरील पदार्थांमध्ये थोडा गंधक, राळ, लोहबान (एक प्रकारचा धूप) आणि वेखंड यांचाही वापर केल्यास धूपन जास्त परिणामकारक होते. हे पदार्थ आयुर्वेदीय औषधे बनवण्यासाठीचे सामान मिळते, त्या दुकानात मिळतात.
ई. पिशव्यांमध्ये धान्य साठवायचे असल्यास पिशव्यांनाही वरीलप्रमाणे धूपन करावे.
३ ए १ इ ३. धान्य भरणे
डब्याच्या आकारापेक्षा धान्य अल्प असेल, तर ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून डब्यात ठेवावे. डब्यात किंवा पिशवीत धान्य पुढीलप्रमाणे भरावे.
अ. कडूनिंबाची पाने कडक उन्हात वाळवून त्यांतील पाण्याचा अंश निघून गेल्याची निश्चिती करावी. पाने करपू देऊ नयेत. कडूनिंबाची पाने मिळाली नाहीत, तर याचप्रमाणे निर्गुंडीच्या झाडाची पाने वापरावीत.
आ. डब्यात किंवा पिशवीत धान्य भरतांना कडूनिंबाची वाळलेली काही पाने तळाशी ठेवून त्यावर कागद किंवा स्वच्छ धुवून वाळवलेले सुती कापड पसरावे. त्यानंतर डब्यात धान्य भरावे. चुकून डब्यात बाष्प गेले, तर ते कागद किंवा सुती कापड यांच्यामुळे शोषले जाते.
इ. धान्य भरतांना एका किलोला ४ – ५ या प्रमाणात मध्ये मध्ये उन्हात खडखडीत वाळवलेले बिब्बे घालावेत. बिब्बे आयुर्वेदीय औषधे बनवण्यासाठीचे सामान ज्या दुकानात मिळते, त्या दुकानात मिळतात. बिब्बे न मिळाल्यास आयुर्वेदीय ‘भीमसेनी’ कापराच्या वड्या वेगवेगळ्या कागदांत गुंडाळून एक किलो धान्यासाठी एक वडी याप्रमाणे धान्यात मध्ये मध्ये ठेवाव्यात. (सनातनचा आयुर्वेदीय ‘भीमसेनी कापूर’ सनातनच्या उत्पादनांच्या वितरकांकडे मिळतो. – संकलक)
ई. धान्य भरून झाल्यावर त्यावर पुन्हा एक कागद किंवा सुती कापड पसरून त्यावर पुन्हा कडूनिंबाच्या वाळलेल्या पानांचा एक थर रचावा.
उ. डब्याच्या झाकणाला आतील बाजूने ‘सेलोटेप’च्या साहाय्याने एक कापराची वडी चिकटवावी. कापराच्या वासामुळे मुंग्या आणि अन्य लहान किडी यांना प्रतिबंध होतो. पिशवीत कापराची वडी ठेवायची असल्यास ती कागदामध्ये गुंडाळून सर्वांत वर ठेवावी आणि पिशवीचे तोंड घट्ट बांधावे.
ऊ. डब्यात हवा जाऊ नये, यासाठी डब्याचे झाकण घट्ट लावावे. झाकण घट्ट लागण्यासाठी आवश्यकतेनुसार कागद किंवा प्लास्टिक पिशवी यांचे आच्छादन (पॅकिंग) घालावे.
३ ए १ इ ४. धान्य भरलेले डबे किंवा पिशव्या योग्य ठिकाणी ठेवणे
अ. धान्य साठवण्याची खोली पावसाळ्यात ओल न येणारी (कोरडी) असावी. धान्य साठवून ठेवण्यापूर्वी खोली स्वच्छ झाडून पुसून घ्यावी. या खोलीमध्ये वर सांगितल्याप्रमाणे ‘धूपन’ करावे आणि १५ ते २० मिनिटे खोली बंद ठेवावी. या खोलीची नियमित स्वच्छता करावी आणि आठवड्यातून एकदा धूपन करावे.
आ. धान्याचे डबे भूमीवर न ठेवता मांडणी किंवा पाट यांवर ठेवावेत. मांडणी भिंतीला टेकवून न ठेवता थोडे अंतर राखून ठेवल्यास स्वच्छता करणे सोपे जाते. धान्य साठवणुकीच्या ठिकाणी उंदीर किंवा घुशी येऊ नयेत, यासाठी खोलीची दारे, तसेच भिंती यांत फटी राहू देऊ नयेत.
इ. शक्य असल्यास धान्य साठवण्याच्या ठिकाणची हवा बाहेर काढून टाकण्याची (‘एक्झॉस्ट’ची) व्यवस्था करावी.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२०)
३ ए १ इ ५. झुरळांचा प्रतिबंध होण्यासाठी करण्याचे उपाय
पुढीलपैकी कोणताही एक उपाय करावा.
१. ‘बोरिक पावडर’ ३० ग्रॅम, कणीक १० ग्रॅम, कॉफीची भुकटी १ ग्रॅम आणि उपलब्ध असल्यास दुधाची भुकटी १ ग्रॅम यांच्या मिश्रणात किंचित पाणी मिसळावे आणि या मिश्रणाच्या सुपारीएवढ्या गोळ्या बनवून वाळवाव्यात. झुरळे येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी, विशेषतः कोपर्यांच्या ठिकाणी एकेक गोळी ठेवावी. कॉफी आणि दूधभुकटी यांच्या वासामुळे झुरळे या गोळीकडे आकर्षित होतात आणि कणीकमिश्रित ‘बोरिक पावडर’ खातात. यामुळे त्यांची प्रजननसंस्था बिघडून जाते आणि त्यांच्यापासून नवीन झुरळांची उत्पत्ती होत नाही. या गोळ्या कितीही दिवस टिकतात, तरीही आवश्यकता वाटल्यास वर्षातून एकदा या गोळ्या पालटाव्यात.
२. वर उल्लेखलेले ‘बोरिक पावडर’ इत्यादींचे मिश्रण ओले असतांनाच जेथे झुरळे येऊ शकतात, अशा ठिकाणी असलेल्या दारांच्या किंवा भिंतींच्या फटींमध्ये थोडे थोडे भरून ठेवावे.’
– डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२०)
आ. ‘भिंतीच्या कोपर्यात एक डांबरगोळी ठेवावी. डांबरगोळीच्या वासामुळे झुरळे येत नाहीत. डांबरगोळी उघडी ठेवल्यास ती काही दिवसांनी हवेत विरून जाते. त्यामुळे ती उघडी न ठेवता कागदात गुंडाळून ठेवावी.
३ ए १ इ ६. साठवलेल्या धान्याची घ्यायची काळजी
अ. ‘मासातून (महिन्यातून) एकदा साठवणुकीतील धान्याची पडताळणी (तपासणी) करावी.
आ. धान्याला ओले हात लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
इ. दिवाळीनंतर पाऊस जातो आणि ऊन पडू लागते. त्या वेळी धान्याला पुन्हा ऊन दाखवून पूर्वीप्रमाणे धूपन करून भरून ठेवावे.
३ ए १ ई. धान्याला कीड लागू नये, यासाठी करण्याचे काही अन्य उपाय
वर दिलेली धान्य साठवण्याची पद्धत सर्वच पदार्थांसाठी, उदा. सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, मसाल्याचे पदार्थ, गूळ, साखर इत्यादींसाठी वापरता येते. योग्य ती काळजी घेऊन धान्य भरल्यास धान्याला सहसा कीड लागत नाही; परंतु हवेमध्ये आर्द्रता जास्त असलेल्या समुद्रापासून जवळ असलेल्या प्रदेशांत (उदा. कोकणात) आवश्यक वाटल्यास वरील पद्धतीसह पुढील उपायही करता येतील. पुढील कोणताही उपाय करण्यापूर्वी वर सांगितल्याप्रमाणे ‘धूपन’ करणे अत्यावश्यक आहे.
३ ए १ ई १. धुवून वापरू शकतो, अशा धान्यांसाठी उपाय
तांदूळ आणि डाळी, ज्या आपण धुवून वापरू शकतो अशा धान्यांसाठी पुढीलपैकी कोणताही एक पर्याय वापरू शकतो. धान्य धुवून घेतल्याने धान्याला लावलेले कीड प्रतिबंधक घटक निघून जातात.
अ. ‘बोरिक पावडर’ : ही धान्यामध्ये नीट मिसळून घ्यावी. १० किलोला १०० ग्रॅम ‘बोरिक पावडर’ पुरते. धान्य कागदावर पसरून थोडी थोडी ‘बोरिक पावडर’ धान्यावर घालून धान्य हाताने वर-खाली करावे, जेणेकरून ‘पावडर’ सर्व धान्याला लागेल.
आ. शंखजिरे आणि चुना यांचे मिश्रण : ३ भाग शंखजिरे (हिंदी भाषेत संगजीरा) आणि १ भाग चुना यांचे मिश्रण बोरिक पावडरप्रमाणे धान्याला लावावे. हे पदार्थ आयुर्वेदीय औषधे बनवण्यासाठीचे सामान मिळते, त्या दुकानात मिळतात. शंखजिरे हे एक खनिज आहे.
इ. राख : विशेषतः डाळींना, तसेच मूग, हरभरे इत्यादी द्विदल धान्यांना राख लावली जाते. साधारणपणे १० किलो धान्यासाठी एक ते दीड किलो कोरडी राख वापरावी. डब्यात धान्य भरतांना आरंभी राखेचा एक थर करून त्यावर धान्याचा एक थर आणि पुन्हा राखेचा एक थर असे आलटून पालटून करावे. सर्वांत शेवटी राखेचा एकेक थर करावा.
३ ए १ ई २. सहसा धुवून वापरत नाही, अशा धान्यांसाठी उपाय
ज्वारी, बाजरी आणि गहू यांना एरंडेल तेल लावावे. साधारण २० किलो धान्याला अर्धी वाटी (७५ मि.ली.) एरंडेल तेल चोळून लावावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२०)
३ ए १ उ. रवा, तेल, मसाले, भाज्या इत्यादी पदार्थ साठवण्याच्या काही पद्धती
‘पुढील सर्व पदार्थ डब्यांत भरण्यापूर्वी डब्यांचे धूपन करणे आवश्यक आहे. पुढे दिलेली पद्धत वापरावी.
१. रवा : रवा शीतकपाटात (‘फ्रीज’मध्ये) ठेवावा. शीतकपाटात ठेवलेला रवा १ वर्ष टिकतो. रवा शीतकपाटाच्या बाहेर ठेवायचा असल्यास तो भाजून हवाबंद डब्यात भरून ठेवावा. असा रवा साधारणपणे ६ ते ७ मास टिकतो.
२. पोहे : पोहे हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.
३. शेंगदाणे : भुईमुगाच्या शेंगा साठवून ठेवाव्यात आणि आवश्यकतेनुसार त्या फोडून त्यांतील शेंगदाणे वापरावेत. भुईमुगाच्या शेंगांतील शेंगदाणे वर्षभर चांगले रहातात. बाजारपेठेत मिळणारे शेंगदाणे साधारणपणे २ ते ३ मासांपेक्षा अधिक काळ टिकत नाहीत.
४. साखर, गूळ आणि तेल : हे हवाबंद डब्यात भरून ठेवावे. मुंग्या येऊ नयेत, यासाठी डब्याच्या झाकणाला आतील बाजूने सेलोटेपने कापराची वडी चिकटवावी. साठवलेले तेल ६ मासांच्या आत वापरावे, नाहीतर तेलाला वास येऊ शकतो.
‘प्लास्टिक’ पिशवी किंवा गोणपाट यांद्वारे नीट आच्छादित केलेली गुळाची ढेप ४ ते ५ वर्षे टिकू शकते. फोडलेला गूळ लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे गुळाच्या लहान ढेपा खरेदी करून ठेवाव्यात आणि त्या आवश्यकतेनुसार फोडाव्यात.
५. मीठ : सुटे मीठ चिनी मातीच्या बरणीत किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवावे. बरणीला झाकण लावून झाकणावर सुती कापड घालून ते बरणीच्या गळ्याशी नाडीने बांधावे. असे मीठ ४ ते ५ वर्षे टिकते. वातावरणातील आर्द्रतेमुळे मीठ ओलसर होते; म्हणून ते कधीही उघडे ठेवू नये. मीठ ओलसर झाल्यास ते उन्हात वाळवून कोरड्या बरणीत भरावे.
६. चिंच : ही तिच्यातील चिंचोके (बिया) काढून वाळवावी आणि मीठ लावून साठवावी.
७. मसाल्याचे पदार्थ : उन्हात वाळवून हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.
८. कांदा, बटाटे आणि लसूण : कांदे, बटाटे आणि लसूण नीट साठवल्यास साधारणपणे एक ते दीड वर्ष टिकू शकतात. कांदा, बटाटे आणि लसूण परिपक्व असावी. लसूण वाळलेली असावी. कांदे आणि बटाटे वारा लागेल, अशा कोरड्या ठिकाणी पसरून ठेवावेत. कांदे आणि बटाटे एकत्र ठेवू नयेत. कांदा आणि लसूण यांच्या माळा खरेदी केल्या असतील, तर त्या टांगून ठेवाव्यात.
९. काही भाज्या आणि पालेभाज्या
९ अ. सुरण : सुरण वर्षभर चांगला टिकतो. सुरणाचा भाजीसाठी आवश्यक तेवढा कापून उर्वरित भाग तसाच टोपलीत ठेवला, तरीही तो वर्षभर चांगला रहातो.
९ आ. भोपळा : भोपळा उंच टांगून किंवा जाळी असणार्या मांडणीत ठेवावा. असा भोपळा १ वर्ष टिकतो. भोपळा भूमीवर ठेवल्याने तो लवकर खराब होण्याची शक्यता असते.
९ इ. गाजर आणि काकडी : तुकडे करून मीठ लावून उन्हात वाळवून ठेवता येतात.
९ ई. पालेभाज्या : कोथिंबीर, पुदीना, मेथी आणि पालक निवडून, तसेच हरभर्याच्या रोपाची पाने खुडून उन्हात वाळवावीत. या भाज्या हवाबंद डब्यांत भरून ठेवल्यास ६ मास ते १ वर्षापर्यंत टिकतात. अशा पालेभाज्या कोवळ्या किंवा ओल्या नसाव्यात.
९ उ. टोमॅटो आणि कैरी : टोमॅटो आणि कैरी यांच्या फोडी वाळवून त्यांची पूड करावी. अशी पूड १ वर्ष टिकते. ही पूड अन्नपदार्थांत आंबटपणा आणण्यासाठी उपयुक्त ठरते.’
– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२०)
९ ऊ. फणसाच्या आठळ्या (बिया)
१. ‘आठळ्या धुऊन वाळवून त्यांना थोडी माती फासून ओल येणार नाही, अशा ठिकाणी भूमीत एक उथळ खड्डा करून (शक्यतो चुलीच्या शेजारी) ठेवण्याची पद्धत आहे. अशा आठळ्या ४ ते ६ मास टिकतात. या काळात या आठळ्या खड्ड्यातून काढून धुऊन उकडून किंवा भाजून खाता येतात.’
२. आठळ्या धुऊन वाळवून शीतकपाटात ठेवल्यासही त्या ४ ते ६ मास टिकतात.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२०)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’
भाग ९ वाचण्यासाठी भेट द्या – आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ९
(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)
Nice information
Thank you