आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – २

अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी सिद्धता
करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

भाग १ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – १

पूर, भूकंप, तिसरे महायुद्ध, कोरोना महामारीसारखी संकटे आदी आपत्काळात टिकून रहाण्यासाठी करायच्या सिद्धतेविषयीच्या या लेखमालिकेतील पहिल्या भागात चुल, गोबर गॅस आदींविषयी माहिती पाहिली. आता दुसर्‍या भागात आपण ‘अन्ना’विषयी माहिती पहाणार आहोत. ‘अन्न’ ही जीवित रहाण्यासाठीची एक मूलभूत आवश्यकता आहे. आपत्काळात आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी आधीच अन्नधान्याची पुरेशी खरेदी करून ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या पिढीला विविध प्रकारचे अन्नधान्य साठवण्याच्या आणि ते दीर्घकाळ टिकवण्याच्या पद्धती ठाऊक नसतात. यासाठी आम्ही काही पद्धती या लेखात दिल्या आहेत. अन्नधान्याचा साठा कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी अन्नान्नदशा न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड करणेही आवश्यक आहे. भात (तांदूळ), कडधान्ये अशांसारख्या अन्नधान्यांची लागवड करणे सर्वांनाच शक्य नाही; मात्र कंदमुळे, अल्प पाण्यात अधिक उत्पादन देणार्‍या बारमाही पिकणार्‍या भाज्या आणि बहुउपयोगी फळझाडे यांची लागवड घराच्या परसात आणि सदनिकेच्या (‘फ्लॅट’च्या) आगाशीतही करता येते. या लागवडीविषयीच्या उपयुक्त सूचना लेखात दिल्या आहेत.

३ अ ३. अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करण्यास आतापासूनच आरंभ करणे

अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.

३ अ ३ अ. तांदूळ, कडधान्ये इत्यादी पिके घेणे

जे शेतकरी नाहीत, अशांनी याविषयी जाणकारांकडून शिकून घ्यावे.

३ अ ३ आ. भाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि फळझाडे यांची लागवड करणे

याविषयी वाचकांना तोंडओळख होण्यासाठी पुढे थोडक्यात दिशादर्शन केले आहे.

घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला लागवडीसाठी मार्गदर्शक पुस्तिकेसाठी येथे क्लिक करा !

३ अ ३ आ १. भाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि फळझाडे यांची लागवड करण्याची आवश्यकता

अ. काही मास कुटुंबाला पुरतील एवढी धान्ये, कडधान्ये इत्यादींची साठवणूक करता येते; मात्र त्यांच्या तुलनेत भाज्या, फळे इत्यादींची साठवणूक करणे तेवढे शक्य नसते.

आ. आपत्काळात आहारात भाज्यांचा वापर केल्यास साठवलेली कडधान्ये कुटुंबाला अधिक दिवस पुरतील.

इ. धान्ये आणि कडधान्ये यांचे उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतभूमीची आवश्यकता असते, तर भाज्या, फळझाडे इत्यादींची लागवड घराच्या आगाशीत आणि परसातही करता येते.

ई. धान्ये आणि कडधान्ये यांच्या तुलनेत बर्‍याच भाज्या अल्प कालावधीत तयार होतात.

उ. शरिराला आवश्यक असे घटक, उदा. काही जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स), खनिजे, तंतुमय पदार्थ (फायबर) हे भाज्या, कंदमुळे आणि फळे यांद्वारे मिळतात. त्यामुळे ‘आहारात काही प्रमाणात भाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि फळे असावीत’, असे आहारशास्त्र सांगते.

ऊ. प्रतिदिन भाकरी-पोळीसमवेत आमटी वा उसळ खाऊन आलेला तोच-तोचपणा भाज्यांमुळे दूर होतो, तसेच भाज्यांमुळे भोजन अधिक रुचकरही बनते.

ए. भाज्या आणि फळे यांचा औषध म्हणूनही वापर करता येतो.

३ अ ३ आ २. आपत्काळाच्या दृष्टीने कोणत्या भाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि फळझाडे लावणे अधिक लाभदायी आहे ?

‘आपत्काळात अल्प कालावधीत अधिक पीक किंवा फळे मिळणे आवश्यक असते’, हे लक्षात घेऊन पुढील लागवड करणे हितावह आहे – अळू वगळता बहुतेक पालेभाज्या; गवार, कोबी, वाटाणा, ‘फ्लॉवर’, टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, भोपळी मिरची अन् सर्व वेलवर्गीय भाज्या (उदा. वाल, तोंडली); बटाटा, बीट, गाजर, मुळा, रताळी, विदारीकंद, कारांदे, कोनफळ आणि कणगी या कंदवर्गीय भाज्या; अननस, पपई, केळी, चिकू आणि डाळिंब ही फळझाडे.

३ अ ३ आ ३. भाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि फळझाडे केव्हा लावावीत ?

बहुतेक पालेभाज्या, वांगी, टोमॅटो अन् भेंडी या भाज्या केव्हाही लावाव्यात. वेलवर्गीय (उदा. तोंडली) आणि शेंगवर्गीय (उदा. गवार) भाज्या पावसाळ्याच्या आरंभी किंवा हिवाळ्याच्या अखेरीस लावाव्यात. कंदवर्गीय भाज्या (उदा. रताळे) आणि फळझाडे पावसाळा चालू झाल्यावर लगेचच लावावीत.’

– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्च २०२०)
३ अ ३ आ ४. आपत्काळाच्या दृष्टीने सदनिकेच्या सज्जात (‘फ्लॅट’च्या ‘गॅलरी’त) अन् घराच्या आगाशीत (गच्चीत) भाज्या आणि पालेभाज्या लावण्यासाठी मातीच्या कुंड्यांपेक्षा अन्य पर्याय अवलंबिण्याची आवश्यकता

‘मातीच्या कुंड्यांमध्ये झाडे लावणे’ हे झाडांच्या वाढीच्या दृष्टीने आदर्श आहे; परंतु मातीच्या कुंड्या हाताळतांना फुटू शकतात. आपत्काळामध्ये काय होईल, याची शाश्‍वती नसल्याने कुंड्या फुटून होणारी हानी टाळण्यासाठी या काळात मातीच्या कुंड्यांपेक्षा पत्र्याची पिंपे; तेलाचे रिकामे पत्र्याचे डबे; प्लास्टिकच्या गोण्या, पिशव्या, डबे, पसरट ‘टब’ किंवा पिंपे आदी पर्यायी साधनांचा वापर करणे जास्त चांगले आहे. या पर्यायी साधनांमधून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांच्या तळापासून अर्धा इंच वर समान अंतरावर २ – ३ छिद्रे पाडावीत. तळात छिद्रे पाडल्यास त्यांतून झाडांची मुळे भूमीत जाण्याची शक्यता जास्त असते; म्हणून तळात छिद्रे पाडू नयेत.’

– श्री. माधव रामचंद्र पराडकर, डिचोली, गोवा. (२८.५.२०२०)

३ अ ३ आ ५. सदनिकेच्या सज्जात लावायच्या भाज्या

‘सज्जात दिवसाचे ३ – ४ घंटे (तास) सूर्यप्रकाश येत असेल, तर तेथे वांगी, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर इत्यादी लावू शकतो. सज्जात सूर्यप्रकाश फारसा येत नसला, तरी तेथे आले लावू शकतो.

३ अ ३ आ ६. घराच्या आगाशीत लावायच्या भाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि फळ

सदनिकेच्या सज्जात लावायच्या भाज्या; बहुतेक पालेभाज्या; ‘फ्लॉवर’, कोबी, गवार, भेंडी इत्यादी भाज्या; तोंडलीसारख्या वेलवर्गीय भाज्या; बटाटा, मुळा, बीट आणि गाजर या कंदवर्गीय भाज्या; तसेच अननस.

३ अ ३ आ ७. घराच्या आवारात लावायच्या भाज्या आणि कंदवर्गीय भाज्या

सदनिकेच्या सज्जात आणि घराच्या आगाशीत लावू शकणार्‍या भाज्या; वाल इत्यादी वेलवर्गीय भाज्या; तसेच रताळी, कणगी इत्यादी कंदवर्गीय भाज्या.

३ अ ३ आ ८. घराच्या आवारात लावायची फळझाडे

लिंबू, केळी, पेरू, चिकू, पपई, अननस, सीताफळ आणि अंजीर’

३ अ ३ आ ९. ‘घरच्या घरी सेंद्रिय (रासायनिक खतांचा वापर न करता) भाजीपाला लागवड कशी करावी ?’ या विषयावरील मार्गदर्शक पुस्तके

१. लेखकाकडे विक्रीसाठी उपलब्ध पुस्तके

पुस्तकांची नावे : १. गच्चीवरची बाग अन् २. तुम्हाला माहित आहे का
लेखक : श्री. संदीप चव्हाण, नाशिक (भ्र.क्र. ९८५०५६९६४४ आणि ८०८७४७५२४२)
प्रकाशक : वैशाली राऊत, शुभारंभ प्रकाशन, संगमनेर.

२. संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध पुस्तक

पुस्तकाचे नाव : स्वतःच बना डॉ. बगीचा… अर्थात् गच्चीवरील सेंद्रिय भाजीपाल्यासाठी मार्गदर्शन
लेखक : श्री. संदीप चव्हाण, नाशिक

– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्च २०२०)
३ अ ३ इ. गायी आणि बैल पाळणे

दूध, गोमूत्र, शेण, गोवर्‍या आदींसाठी गायी, तर शेती, बैलगाडी आदींसाठी बैल उपयुक्त आहेत. गाय आणि बैल पाळणे, गायीचे दूध काढणे, या जनावरांच्या आजारपणात त्यांची काळजी घेणे इत्यादींविषयी जाणकारांकडून शिकून घ्यावे.

३ अ ४. भोजनात रानभाज्यांचा (पावसाळ्यात आपोआप रूजून येणार्‍या भाज्यांचा) वापर आतापासूनच आरंभ करणे

टाकळा, भारंगी, कुरडू, आघाडा यांसारख्या पुष्कळ रानभाज्यांचा वापर आहारात करता येतो. रानभाज्यांच्या वापराविषयी ठाऊक नसल्यास जाणकारांना विचारावे. कोल्हापूर येथील ‘निसर्ग मित्र (भ्र.क्र. ९४२३८ ५८७११)’ या संस्थेने ‘औषधी रानभाज्या’ नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यात ६१ रानभाज्यांचे औषधी आणि आहारातील उपयोग भाज्यांच्या छायाचित्रांसह दिले आहेत.

रानभाज्यांविषयी उपयुक्त माहितीसाठी येथे क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

संकलक : (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बाह्य दुवे (External links)

१. घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला लागवडीसाठी मार्गदर्शक पुस्तिका

२. रानभाज्यांविषयी उपयुक्त मराठी भाषेतील माहिती

२ अ. महाराष्ट्रात उगवणार्‍या काही रानभाज्यांची नावे

२ आ. रानभाज्यांचे पौष्टिकत्व

३. रानभाज्यांविषयी माहिती देणारी मराठी पुस्तके (‘बुकगंगा’वर)

३ अ. आरोग्यदायी रानभाज्या

३ आ. रानभाज्या

३ इ. बखर रानभाज्यांची

४. रानभाज्यांविषयी उपयुक्त इंग्रजी भाषेतील माहिती

४ अ. Wild Vegetables

४ आ. Surviving in the Wild: 19 Common Edible Plants

४ इ. The Ultimate Army Field Guide to Wild Edible Plants

भाग ३ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ३

 

Leave a Comment