आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – १०

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना शिकवणारी सनातन संस्था !

भाग ९ वाचण्यासाठी भेट द्या – आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ९

अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी
सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

आपत्कालीन लेखमालिकेतील या भागात आपण कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक बांधिलकी यांविषयीच्या पूर्वसिद्धतेविषयी जाणून घेणार आहोत. कौटुंबिक स्तरावर पहातांना घराविषयी, आर्थिक स्तरावर पहातांना संपत्तीविषयी, तर सामाजिक बांधिलकीमध्ये समाजासाठी आपण काय करू शकतो, याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

 

२. आपत्काळाच्या दृष्टीने कौटुंबिक स्तरावर करायच्या सिद्धता

२ अ. कौटुंबिक स्तरावर करायच्या सिद्धता

२ अ १. घराच्या संदर्भात करायच्या कृती
२ अ १ अ. शक्यतो नवीन घर वा सदनिका (फ्लॅट) विकत न घेता असलेल्याच घरात किंवा भाड्याच्या घरात रहाण्याचा पर्याय निवडावा !

अ. भूकंप, भूस्खलन इत्यादींमुळे घरांना हानी पोचू शकते. त्यामुळे नवीन घरासाठी गुंतवलेले पैसे वाया जाऊ शकतात. यासाठी शक्यतो नवीन घर वा सदनिका (फ्लॅट) विकत घेऊ नये. सध्याच्या असलेल्याच घरात रहाण्याचा किंवा भाड्याच्या घराचा वा सदनिकेचा पर्याय निवडावा.

आ. काही अपरिहार्य कारणास्तव घर वा सदनिका विकत घेण्याची निकड भासल्यास ‘कोणता प्रदेश त्यामानाने सुरक्षित वाटतो’, यावर विचार करावा.

इ. सदनिका विकत घ्यायची झाल्यास ती शक्यतो तिसर्‍या मजल्याच्या वर घेऊ नये. याचे कारण म्हणजे, भूकंपासारखा धोका निर्माण झाल्यास तिसर्‍या मजल्यापर्यंतच्या सदनिकेतून लवकर बाहेर पडणे सोपे जाते.

ई. एखाद्याची सध्याची सदनिका तिसर्‍या मजल्याच्या वर असेल, तर त्याऐवजी ‘अन्यत्र कुठे योग्य सदनिका मिळू शकते’, यावर विचार करावा.

२ अ २. रहात्या घराची पडझड झाली असल्यास किंवा घराच्या महत्त्वाच्या दुरुस्त्या करणे शेष असल्यास घर दुरुस्त करून घ्यावे !

रहात्या घराची पडझड झाली असल्यास किंवा घराच्या महत्त्वाच्या दुरुस्त्या करणे शेष असल्यास पुढे आपत्काळात महापूर, वादळ आदी आपत्ती ओढवल्यावर घराची आणखी पडझड होऊ शकते किंवा घर कोसळू शकते. आपत्काळात घर दुरुस्त करून घेणेही कठीण जाऊ शकते. यासाठी असे घर आताच वेळ देऊन दुरुस्त करून घेणे इष्ट आहे.

२ अ ३. रहात्या घराचा विस्तार किंवा सुशोभिकरण सध्या टाळावे !

आपत्काळात घरांना हानी पोचू शकते. त्यामुळे घराचा विस्तार किंवा सुशोभिकरण करण्यावर केलेला व्यय (खर्च) वाया जाऊ शकतो. यासाठी तसे करणे टाळावे. पुढे आपत्काळ ओसरल्यावर घराचा विस्तार किंवा सुशोभिकरण करण्याचा विचार करू शकतो.

२ अ ४. गावाला स्वतःचे घर असल्यास ते रहाण्यायोग्य स्थितीत ठेवावे !

आगामी काळात तिसरे महायुद्ध, आतंकवाद इत्यादींचा धोका गावांपेक्षा नगरांना (शहरांना) अधिक आहे. त्या परिस्थितीत गावाला जाऊनही राहावे लागू शकते. त्यामुळे कोणाचे गावाला घर असेल, तर त्यांनी ते आताच रहाण्यायोग्य स्थितीत करून ठेवावे.

२ अ ५. गावी स्वतःच्या मालकीची भूमी वा घर नसणार्‍या नगरवासियांनी शक्य असल्यास सोयीच्या गावात रहाता येण्याच्या दृष्टीने आताच घराचा विचार करावा !
२ अ ६. शिक्षण, नोकरी आदींच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या कुटुंबियांना शक्यतो भारतात बोलवावे !

भारत ही मुळात पुण्यभूमी आहे. आगामी आपत्काळात भारतापेक्षा अन्य देशांत अधिक हानी होण्याचा संभव आहे; कारण परदेशांत रज-तमाचे प्रमाण अधिक आहे. तसेच महायुद्ध चालू झाल्यावर परदेशातून भारतात सुखरूप परत येणे कठीण होईल.

२ अ ७. आपल्या पश्‍चात संपत्तीवरून (मालमत्तेवरून) नातेवाइकांत वादविवाद होऊ नयेत, यासाठी वयस्कर व्यक्तींनी मृत्यूपत्र करून ठेवावे !

 

३. आर्थिक स्तरावर करायच्या सिद्धता

३ अ. सध्याची मिळकत (उत्पन्न) आणि आतापर्यंतची बचत काटकसरीने वापरण्यामागील उद्देश

१. आपत्काळात होणार्‍या महागाईला तोंड देता येणे

२. आपत्काळात सामाजिक कर्तव्य म्हणून आपदग्रस्त बांधवांना अर्थसाहाय्य करता येणे

३. आपत्काळात राष्ट्रकर्तव्य म्हणून राष्ट्रासाठी धन अर्पण करता येणे

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी आपले पैसे, अंगावरील अलंकार आदी ‘आझाद हिंद सेने’साठी नेताजींच्या झोळीत अर्पण केले होते. आपत्काळात राष्ट्रावरचा आर्थिक ताण पुष्कळ वाढतो, उदा. मोठ्या प्रमाणावर युद्धसाहित्याची निर्मिती करावी लागते. अशा वेळी राष्ट्रासाठी धन अर्पण करणे, हे राष्ट्रकर्तव्यच ठरते.

३ अ १. आर्थिक गुंतवणूक करतांना पुढील सूत्रांचा विचार करावा !

सध्या बर्‍याच अधिकोषांचे (बँकांचे) आर्थिक घोटाळे बाहेर येत आहेत. त्यामुळे स्वतःचे पैसे सुरक्षित रहावेत, यासाठी पुढे दिलेल्या पर्यायांचा विचार करावा. पैशांची गुंतवणूक करतांना ‘You should not put all eggs in one basket (भावार्थ : एके ठिकाणी गुंतवणूक करून ती सर्व बुडण्यापेक्षा सुरक्षेच्या दृष्टीने ती गुंतवणूक विविध ठिकाणी करावी)’ या अर्थशास्त्रातील तत्त्वानुसार करावी.

३ अ २. अधिकोषांशी (बँकांशी) संबंधित व्यवहार
३ अ २ अ. ठेवी वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत अधिकोषांमध्ये ठेवाव्यात !

१. राष्ट्रीयकृत अधिकोषांवर ‘रिझर्व्ह बँके’चे नियंत्रण असते. त्यामुळे ते अधिकोष बुडीत गेले, तरी पैसे बुडण्याची शक्यता नसते; मात्र अधिकोषांतील व्यवहार करण्यावर निर्बंध घातले जातात, उदा. ठराविक रक्कमच अधिकोषातून काढता येते. याउलट खासगी किंवा सहकारी अधिकोष बुडीत गेल्यास त्यांचे दायित्व ‘रिझर्व्ह बँके’कडे नसल्याने बुडीत रक्कम मिळण्याची शक्यता अत्यल्प असते.

२. ‘एखादा अधिकोष डबघाईला आला, तर आपल्याकडील सर्वच पैसे बुडाले’, असे होऊ नये, यासाठी आपल्या परिसरातील वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत अधिकोषांमध्ये ठेवी विखरून ठेवाव्यात. राष्ट्रीयकृत अधिकोषांत प्रत्येक ठेवीदाराच्या ५ लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असते. त्यामुळे ठेवीदाराने एका राष्ट्रीयकृत अधिकोषात अधिकाधिक ५ लाख रुपयांपर्यंत ठेव ठेवावी.

३ आ. इतर सूत्रे

१. सर्व प्रकारच्या अधिकोष-खात्यांवर वारशाची [नामांकन (नॉमिनेशन) याची] नोंद करावी.

२. अधिकोषात पैसे भरणे, अधिकोषातून पैसे काढणे आदी न्यूनतम व्यवहार कुटुंबियांनाही शिकवावेत.

३ आ १. सोने, चांदी आदी मौल्यवान घटकांमध्ये गुंतवणूक करावी !

आपत्काळात एखाद्या वेळी अधिकोषातून स्वतःचे पैसे मिळण्याला मर्यादा येऊ शकते; पण सोने, चांदी आदी मौल्यवान घटक आपल्याच हातात रहात असल्याने वेळप्रसंगी आपल्याला धनाची आवश्यकता भासल्यास आपण त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो.

एखाद्याला गुंतवणूक म्हणून सोने वा चांदी विकत घ्यायची असेल, तर त्याने अंगठी, साखळी यांसारखे अलंकार विकत न घेता शुद्ध सोन्याचे वळे वा अखंड स्वरूपातील चांदी घ्यावी. यामुळे अलंकारांची घडणावळ द्यावी लागत नाही.

३ आ २. घरासाठी विहीर खणणे, सौरऊर्जेची सोय करणे आदी सर्व व्यय (खर्च) म्हणजे एक प्रकारची गुंतवणूकच आहे !
३ आ ३. भूमीमध्ये गुंतवणूक करणे

ज्यांना शक्य आहे त्यांनी लागवडीस योग्य असेल, अशी भूमी खरेदी करावी. एका व्यक्तीला भूमी खरेदी करणे शक्य नसेल, तर काही जणांनी एकत्र येऊन भूमी खरेदी करावी. भूमीतील गुंतवणुकीचा आज ना उद्या परतावा मिळतो.

३ आ ४. ज्यांनी ‘शेअर्स’मध्ये पैसे गुंतवले असतील, त्यांनी आतापासूनच उपाययोजना काढावी !

‘शेअर्स’ विकतांना त्यांचे जे बाजारमूल्य (मार्केट व्हॅल्यू) असते, त्यानुसार पैसे मिळतात. यामध्ये ‘शेअर्स’ खरेदी केले तेव्हाची जी रक्कम असते त्यापेक्षा अधिक रक्कम मिळू शकते किंवा त्याहून अल्प रक्कमही मिळू शकते. समजा मूळ रकमेपक्षा अल्प रक्कम मिळाली, तर तेवढा तोटा सोसावा लागतो. ‘शेअर्स’च्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नसते, तसेच त्यावर सरकारचे नियंत्रणही नसते. थोडक्यात ‘शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे आपल्याला परत मिळतीलच’, याची निश्‍चिती देता येत नाही. यास्तव ज्यांनी ‘शेअर्स’मध्ये पैसे गुंतवले असतील, त्यांनी आतापासूनच उपाययोजना काढावी.

३ इ. अन्य सूचना

आपत्काळात निर्माण होणारी महागाई आणि कुटुंबियांची संख्या यांचा विचार करून साधारण काही वर्षे आपली आवश्यकता भागेल इतके धन घरामध्ये सुरक्षितपणे ठेवावे.

 

४. सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून करायच्या सिद्धता

४ अ. चाळ, गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), गावातील वाडी
आदी ठिकाणी रहाणार्‍यांनी एकत्रितपणे सिद्धता केल्यास ती सर्वांना लाभदायी ठरणे

‘एकमेका साहाय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥’, असे म्हटले आहे. विहीर खणणे आणि सौरऊर्जा यांच्या निर्मितीसाठी यंत्रणा उभारणे, ‘बायो-गॅस’ संयंत्र उभारणे यांसारख्या सिद्धतांना व्यक्तीगत स्तरावर अधिक व्यय (खर्च) येतो. मात्र सर्वांनी एकत्रित मिळून या सिद्धता केल्यास त्या अल्प व्ययात होतात. आपत्काळाच्या दृष्टीने अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. सर्वांच्या गरजा विचारात घेऊन ही खरेदी घाऊकरित्या केल्यास त्यासाठीही अल्प व्यय होईल. अशा प्रकारे एकत्रितपणे सिद्धता केल्यास मनुष्यबळ आणि वेळ यांचीही बचत होईल, तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या समाजबांधवांना साहाय्यही होईल.

४ आ. वस्तूंची खरेदी करतांना गरजूंचाही विचार करून अतिरिक्त खरेदी करणे

‘वसुधैव कुटुम्बकम् । (अर्थ : पृथ्वी हे माझे कुटुंब आहे.)’, हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. यानुसार आपत्काळाच्या दृष्टीने वस्तूंची खरेदी करतांना आपली ऐपत चांगली असल्यास आपल्या जोडीला समाजातील गरजूंचाही विचार करून त्यांच्यासाठी अन्नधान्य, कपडे इत्यादी खरेदी अतिरिक्त करावी. या वस्तू आपत्काळात आपत्तीत सापडलेले, गरीब इत्यादींना देता येतात. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी काही भारतीय नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर भारतीय सैनिकांना चहा-पाणी दिले होते. वर्ष २०२० मध्ये ‘कोरोनो’ विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटाच्या वेळी देशात अचानक ‘दळणवळण बंदी’ लागू झाली. त्यामुळे अनेक कामगार, ट्रकचालक इत्यादी विविध प्रांतांत अडकून पडले. तेव्हा अनेक भारतियांनी स्वतःची पदरमोड करून अशा गरजूंना जेऊ घातले. ‘हिंदु जनजागृती समिती’सारख्या संघटनांनी गरजूंना फळे, सरबत इत्यादींचे वाटप केले. अनेक दानशूर व्यक्ती, मंडळे आणि संस्था यांनी शासनाला साहाय्यकार्यासाठी निधीही दिला.

४ इ. गरजूंसाठी वस्तूंची खरेदी करण्याची ऐपत नसल्यास आपत्काळात स्वतःची गरज भागेल इतकीच खरेदी करणे

आपत्काळापूर्वी सर्वांनाच कुटुंबासाठी अन्नधान्य, कपडे, औषधे इत्यादींची खरेदी करावी लागणार आहे. एकाच वेळी सर्वांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली, तर वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ‘आपल्याप्रमाणेच समाजबांधवांनाही सर्व वस्तू उपलब्ध व्हायला हव्यात’, हा विचार करून आपत्काळाच्या दृष्टीने आपली स्वतःची गरज भागेल इतकीच खरेदी करावी.

४ ई. आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजूंच्या साहाय्यासाठी करणे

वैद्य, शेतकरी, धान्याचे व्यापारी इत्यादींचा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील विषयांचा चांगला अभ्यास असतो. अशी मंडळी आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजूंच्या साहाय्यासाठी करू शकतात, उदा. वैद्य औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी, शेतकरी फळे, भाज्या इत्यादींच्या लागवडीविषयी, तर धान्याचे व्यापारी अन्नधान्याच्या उत्तम साठवणुकीविषयी गरजूंना सांगू शकतात.

 

५. आपत्काळाच्या दृष्टीने करायच्या अन्य सिद्धता किंवा घ्यायच्या दक्षता

५ अ. घरात अनावश्यक असलेले साहित्य न्यून करण्यास आरंभ करणे

आपत्काळाची सिद्धता म्हणून आपल्याला घरात अनेक वस्तूंची साठवणूक करावी लागणार आहे. आपत्काळात एखाद्या वेळी अडचणीत सापडलेले नातेवाईक किंवा समाजबांधव यांना आपल्या घरात आश्रयही द्यावा लागू शकतो. यासाठी आपल्या घरात अनावश्यक असलेले साहित्य न्यून करण्यास आरंभ करावा. यामुळे घरात मोकळी जागा निर्माण होईल. अनावश्यक साहित्य न्यून करण्यामुळे वस्तूंप्रती असलेली आसक्तीही न्यून होण्यास साहाय्य होईल.

५ आ. भ्रमणभाषच्या (मोबाईलच्या) संदर्भातील सिद्धता

१. दोन वेगवेगळ्या आस्थापनांचे ‘सिम कार्ड’ असलेला भ्रमणभाष जवळ बाळगणे

याचा लाभ म्हणजे, एखाद्या वेळी एका आस्थापनाची ‘रेंज’ मिळाली नाही, तरी दुसर्‍या आस्थापनाची ‘रेंज’ मिळण्याची शक्यता असते.

२. शक्य असल्यास भ्रमणभाषचे २ संच बाळगणे

एका संचाची ‘बॅटरी’ संपली, तर दुसरा संच वापरता येतो.

३. शक्य असल्यास भ्रमणभाष भारित करण्यासाठी विद्युत् पेढी (पॉवर बँक) जवळ असावी.

५ इ. नातेवाईक, ‘फॅमिली डॉक्टर’ आदी महत्त्वाच्या व्यक्तींचे आणि पोलीस ठाणे, अग्नीशमन
दल इत्यादी ठिकाणांचे दूरभाष क्रमांक अन् पत्ते भ्रमणभाषमध्ये अन् लहान वहीत नोंद करून ठेवणे

आपत्काळात आपला भ्रमणभाष भारित (चार्ज) नसल्यास त्याचा उपयोग होणार नाही. यासाठी आवश्यक ते दूरभाष क्रमांक अन् पत्ते भ्रमणभाषप्रमाणेच एका लहान वहीतही नोंद करून ठेवणे उपयुक्त आहे. अशी नोंदवही नेहमी जवळ बाळगावी. यामुळे अन्य मार्गाने, उदा. दुसर्‍याच्या भ्रमणभाषवरून वा दूरभाषवरून आपल्याला इतरांना संपर्क करता येईल. अतीमहत्त्वाचे संपर्क क्रमांक पाठ करून ठेवावेत.

५ ई. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या संदर्भात घ्यायची काळजी

आपत्काळाच्या धकाधकीमध्ये आपली महत्त्वाची कागदपत्रे (उदा. शिधापत्रिका, आधारकार्ड, अधिकोषाचे ‘पासबूक’) गहाळ होऊ शकतात. यासाठी पूर्वसिद्धतेचा भाग म्हणून अशा कागदपत्रांच्या छायाप्रती (झेरॉक्स) काढून अन्यत्र (उदा. नातेवाइकाच्या घरी) ठेवाव्यात, तसेच त्या कागदपत्रांची छायाचित्रेही भ्रमणभाषमध्ये काढून ठेवावीत. या कागदपत्रांची छायाचित्रे ‘ई-मेल ड्राईव्ह’ आणि ‘पेनड्राईव्ह’ यांमध्येही संरक्षित (सेव्ह) करावीत

५ उ. वैयक्तिक किंवा आस्थापनातील संगणकांतील
महत्त्वाची माहिती (डाटा) अन्य ठिकाणी संगणकांवर घेऊन ठेवणे (बॅकअप घेणे)

आपत्काळात आपले घर किंवा आस्थापन यांची नासधूस झाली, तरी संगणकांतील महत्त्वाची माहिती अन्यत्र घेऊन ठेवलेली असल्याने ती पुन्हा प्राप्त होईल. आस्थापनातील संगणकांतील माहिती अन्यत्र ठेवण्यापूर्वी आस्थापनातील दायित्व असलेल्या अधिकार्‍यांना संभाव्य धोक्याची कल्पना देऊन त्यांची रीतसर अनुमती घ्यावी किंवा त्यांनाच माहिती अन्यत्र ठेवण्याविषयी सुचवावे.

५ ऊ. आपत्काळात उपयुक्त ठरतील, अशा कृती आताच शिकून घेऊन त्यांचा सरावही ठेवणे

स्वयंपाक करायला येत नसलेल्यांनी साधारण गरज भागेल इतपत तरी स्वयंपाक करणे (उदा. वरण-भात, खिचडी इत्यादी सोपे पदार्थ करणे), केशकर्तन, पोहणे, शिवणयंत्रावर कपडे शिवणे यांसारख्या कृती शिकून घेणे हितावह आहे.

५ ए. घराच्या रक्षणासाठी कुत्रा पाळणे

चोर, दंगलखोर इत्यादींपासून घराचे रक्षण होण्यासाठी कुत्रा पाळावा. कुत्र्याचा सांभाळ आणि त्याच्यावरील औषधोपचार यांविषयी शिकून घ्यावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !’

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.) 

Leave a Comment