‘कोरोना’च्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी उपयुक्त मंत्र

सध्या ‘कोरोना’ची साथ सर्वत्र पसरत आहे. ‘या विषाणूंची लागण होऊ नये’, यासाठी वैद्यकीय उपचारांसमवेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, तसेच स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी मंत्र-उपायही करावेत. हे मंत्र आणि त्यांसंदर्भातील सूचना येथे दिल्या आहेत.

 

१. मंत्रजपासंबंधी सूचना

अ. सुवेर किंवा सुतक असलेल्या व्यक्तींनी मंत्रजपाचे उपाय करू नयेत. मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रीने मंत्र म्हणू किंवा ऐकू नयेत. या काळात नामजपादी अन्य उपाय करू शकतो.

आ. मंत्र केवळ ऐकण्यापेक्षा तो भावपूर्ण म्हणणे जास्त लाभदायक असते. त्यामुळे ज्यांना मंत्र म्हणणे शक्य आहे, त्यांनी मंत्र म्हणावेत. मंत्राचे उच्चार योग्य व्हावेत, यासाठी सोबत दिलेला ऑडिओ ऐकत असतांना त्यात दिल्याप्रमाणे ते म्हणावेत. काही दिवसांनी मंत्र योग्य रितीने म्हणण्याचा सराव होऊन तो तोंडपाठ झाल्यावर मंत्र ऐकण्याची आवश्यकता रहाणार नाही.

इ. ३ मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र म्हणावा. जो मंत्र योग्य उच्चारांसह आणि अधिक भावपूर्ण म्हणणे स्वतःला सोपे जाते, तो मंत्र निवडावा.

ई. संस्कृत भाषेमध्ये अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. अनुस्वाराच्या पुढचे अक्षर कोणते आहे, यावरून अनुस्वाराचा उच्चार ङ्, ञ्, ण्, न्, म् आदी होतो. अनुस्वाराचा योग्य उच्चार समजावा, यासाठी या मंत्रामध्ये अनुस्वाराऐवजी शक्य तेथे त्याच्या उच्चारासाठी येणारे अक्षर लिहिले आहे. काही मंत्रात स्वल्पविराम दिले आहेत. मंत्र म्हणतांना त्या ठिकाणी किंचित थांबावे.

उ. मंत्राचा अर्थ लक्षात घेऊन तो म्हटल्यास भावजागृती होण्यास साहाय्य होते. यासाठी येथे मंत्रांचे अर्थही दिले आहेत.

ऊ. निवडलेला मंत्र सकाळी, दुपारी आणि सायंकाळी प्रत्येकी २१ वेळा म्हणावा.

ए. सकाळी मंत्र म्हणतांना पाणी अभिमंत्रित करावे आणि हे पाणी स्वतःच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत घालून दिवसभर थोडे थोडे प्यावे.

ऐ. पाणी असे अभिमंत्रित करावे : हात साबण लावून स्वच्छ धुवावेत. त्यानंतर एका फुलपात्रात (पेल्यात) पाणी घेऊन त्यात उजव्या हाताची पाचही बोटे बुडवून मंत्रजप करावा. फुलपात्र चांदी, तांबे, पितळ, काच किंवा चीनी माती यांचे असावे. या प्रकारचे फुलपात्र न मिळाल्यास स्टीलचे भांडे वापरावे. तेही मिळणे शक्य नसेल, तेव्हाच प्लास्टिकचे भांडे वापरावे. मंत्रजप करतांना फुलपात्र भूमीवर न ठेवता स्वतःच्या मांडीवर, आसनावर किंवा लाकडी पटलावर ठेवावे.

ओ. अंघोळ करून मंत्रजप केल्यास रज-तमाचे आवरण दूर होऊन मंत्राची परिणामकारकता वाढते.

 

२. मंत्रजप म्हणण्यापूर्वी करावयाची प्रार्थना !

‘हे सूर्यदेवते, मला कोणतीही व्याधी झाली असल्यास त्यातील विष तुझ्या कोवळ्या किरणांनी नष्ट होऊ दे. चांगली साधना करता येण्यासाठी माझे शरीर निरोगी राहू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

 

३. मंत्रजप

मंत्र क्र. १

श्री धन्वन्तरि

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेला विषाणूनाशक मंत्र

 

अत्रिवद् वः क्रिमयो हन्मि कण्ववज्जमदग्निवत् ।
अगस्त्यस्य ब्रह्मणा सम् पिनष्म्यहङ् क्रिमीन् ।। – अथर्ववेद, कांड २, सूक्त ३२, खंड ३

अर्थ : ऋषी म्हणतात, हे कृमींनो (रोग उत्पन्न करणार्‍या सूक्ष्म जंतूंनो) ! अत्रि, कण्व आणि जमदग्नि या ऋषींनी ज्याप्रमाणे तुमचा नाश केला, त्याप्रमाणे मीही तुमचा नाश करीन. अगस्त्य ऋषींच्या मंत्राने मी ‘रोग उत्पन्न करणारे सूक्ष्म जंतू पुन्हा वाढू शकणार नाहीत’, अशी व्यवस्था करीन.

मंत्र क्र. २

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेला विषाणूनाशक मंत्र

 

हतासो अस्य वेशसो हतासः परिवेशसः ।
अथो ये क्षुल्लका इव सर्वे ते क्रिमयो हताः ।। – अथर्ववेद, कांड २, सूक्त ३२, खंड ५

अर्थ : या कृमींचे (रोग उत्पन्न करणार्‍या सूक्ष्म जंतूंचे) घर नष्ट झाले, त्या घराच्या जवळचे घर नष्ट झाले आणि जे लहान-लहान बीजरूपात होते, तेही नष्ट झाले.

मंत्र क्र. ३

मंत्र-उपचार तज्ञ डॉ. मोहन फडके, पुणे यांनी सांगितलेला
श्वसनसंस्थेच्या सर्व विकारांवर उपयुक्त मंत्र (६ वेळा ॐकार असलेला गायत्री मंत्र)

सूर्यदेवतेची प्रतिमा

 

 

ॐ भूः । ॐ भुवः । ॐ स्वः । ॐ तत्सवितुर्वरेण्यम् । ॐ भर्गो देवस्य धीमहि । ॐ धियो यो नः प्रचोदयात् ।। – ऋग्वेद, मंडल ३, सूक्त ६२, ऋचा १०

अर्थ : दैदीप्यमान भगवान सविता (सूर्य) देवाच्या त्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. ते (तेज) आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.

हे मंत्र सनातन चैतन्यवाणी अ‍ॅपवरही उपलब्ध आहेत.

Leave a Comment