वासा (अडुळसा) चूर्ण

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

अडुळसा चूर्ण थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे.

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
अ. नाकातून रक्त येणे, उष्णतेचे विकार, रक्तप्रदर (पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे) आणि श्‍वेतप्रदर (योनीमार्गातून पांढरा स्राव होणे) दिवसातून २ – ३ वेळा १ चमचा अडुळसा चूर्ण आणि १ चमचा खडीसाखर यांचे मिश्रण पाण्यासह घ्यावे. ७ दिवस
आ. कफ पडणारा खोकला आणि दमा (अस्थमा) १ चमचा अडुळसा चूर्ण, अर्धा चमचा सुंठ किंवा पिंपळी चूर्ण, २ चमचे मध असे मिश्रण बनवावे. दिवसातून ५ – ६ वेळा हे मिश्रण थोडे थोडे चाटावे. ७ दिवस
इ. क्षय (टी.बी.) रोगाच्या उपचारांना साहाय्यक सकाळी आणि सायंकाळी १ चमचा अडुळसा चूर्ण, १ चमचा तूप आणि १ चमचा साखर एकत्र करून घ्यावे. वर वाटीभर गरम पाणी प्यावे. १ ते ३ मास
ई. ताप हे लक्षण असलेले साथीचे विकार, तसेच गोवर आणि कांजिण्या सकाळी आणि सायंकाळी अर्धा चमचा अडुळसा चूर्ण आणि अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण यांचे मिश्रण पाण्यासह घ्यावे. ७ दिवस
उ. कोणत्याही प्रकारचे व्रण (जखम) दिवसातून २ वेळा अडुळसा चूर्णात उकळून थंड केलेले पाणी मिसळून व्रणावर लेप लावावा. ७ दिवस

 

२. सूचना

अ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.

 

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

Leave a Comment