सुंठ चूर्णचा वापर विविध विकांरामध्ये केला जातो. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे. यांचा अभ्यास करून, तसेच वैद्यांचे मार्गदर्शन घेऊन ही औषधे वापरून पहावीत.
सुंठ चूर्ण उष्ण गुणधर्माचे असून कफ आणि वात नाशक आहे.
१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग
‘सुंठ चूर्ण उष्ण गुणधर्माचे असून कफ आणि वात नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
उपयोग | औषध घेण्याची पद्धत | कालावधी |
---|---|---|
अ. हिवाळा संपून येणार्या वसंत ऋतूमध्ये, तसेच पावसाळ्यामध्ये वातावरणातील पालटांमुळे होणारे विकार होऊ नयेत, यासाठी | १ लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये पाव चमचा सुंठ चूर्ण घालून पाण्याला उकळी आणावी आणि हे पाणी बाटलीत किंवा तांब्यात भरून ठेवावे. तहान लागेल, तेव्हा हे पाणी थोडे थोडे प्यावे. | हिवाळ्यातील थंडी न्यून झाल्यापासून पुढील १५ दिवस, तसेच पूर्ण पावसाळ्यात |
आ. पडसे (सर्दी), खोकला आणि छातीत कफ होणे | पाव चमचा सुंठ, अर्धा चमचा तूप आणि १ चमचा मध एकत्र करून दिवसातून २ – ३ वेळा चघळून खावे. | ५ ते ७ दिवस |
इ. पडश्यामुळे (सर्दीमुळे) डोके दुखणे | पुरेशा प्रमाणात सुंठीचे चूर्ण घेऊन त्यात गरम पाणी मिसळून कपाळावर पातळ लेप करावा. | ५ ते ७ दिवस |
ई. तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, पोटात दुखून शौचाला होणे, आव पडणे, अतीसार (जुलाब) आणि अपचन होणे | प्रत्येकी पाव चमचा सुंठ, तूप आणि गूळ यांचे मिश्रण दिवसातून २ – ३ वेळा शक्यतो जेवणाच्या अर्धा घंटा आधी चघळून खावे. | २ – ३ दिवस |
उ. घशात आणि छातीत जळजळणे, घशाशी आंबट येणे, मळमळणे आणि उलट्या होणे | दिवसातून ३ – ४ वेळा पाव चमचा सुंठ आणि १ चमचा पिठीसाखर यांचे मिश्रण चघळून खावे. | ७ दिवस |
ऊ. गॅसेसमुळे छातीत कळा येऊन अस्वस्थ वाटणे आणि वरचेवर ढेकर येणे | त्रास होईल तेव्हा पाव चमचा सुंठ आणि अर्धा चमचा मध वरचेवर चाटावे. | २ – ३ दिवस |
ए. आमवात (सांधे आखडणे, तसेच विशेषतः सकाळच्या वेळेत सांधे दुखणे आणि सुजणे) | दुपारी आणि रात्री जेवणाच्या आधी पाव चमचा सुंठ आणि १ चमचा एरंडेल पोटात घेऊन वर अर्धी वाटी गरम पाणी प्यावे. त्यानंतर लगेच जेवावे. यासह रात्रीच्या जेवणानंतर पुरेशा प्रमाणात सुंठीचे चूर्ण घेऊन त्यामध्ये गरम पाणी मिसळून दुखणाऱ्या सांध्यावर जाडसर लेप करावा. | १५ दिवस |
ऐ. गर्भवती स्त्रीला आलेला ताप आणि श्वेतप्रदर (योनीमार्गातून पांढरा स्राव होणे) | सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा सुंठ, अर्धी वाटी दूध आणि १ वाटी पाणी हे मिश्रण १ वाटी शिल्लक राहीपर्यंत उकळून गाळून प्यावे. हे औषध घेतल्यावर साधारण १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. | १५ दिवस |
ओ. थकवा आणि वजन न्यून असणे या विकारांवर, तसेच वीर्यवृद्धीसाठी | सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा सुंठ आणि अर्धा चमचा उगाळलेले जायफळाचे गंध १ कप दूध आणि २ चमचे तूप यांत मिसळून घ्यावे. हे औषध घेतल्यावर साधारण १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. | ३ मास |
औ. सुंठीचे अन्य उपयोग | १. जेवण बनवतांना मसाल्याच्या रूपात सुंठीचा उपयोग होतो. २. नेहमीच्या चहात चवीसाठी सुंठ घालावी. ३. दुपारच्या जेवणावर ताक प्यायचे असल्यास त्यात चवीपुरती सुंठ आणि काळे मीठ टाकून प्यावे. |
२. सूचना
अ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव प्रमाणात आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात औषधाचे चूर्ण घ्यावे.
आ. मधुमेह असल्यास औषध मध किंवा साखर यांसह न घेता पाण्यासह घ्यावे किंवा नुसतेच चघळून खावे.
इ. उष्णतेची लक्षणे (उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे इत्यादी) असतांना आणि उन्हाळा आणि पावसाळ्यानंतर येणारा शरद ऋतू (ऑक्टोबर हीट) या काळांत सुंठीचा वापर टाळावा किंवा अल्प करावा.
ई. उष्णता वाढल्यास सुंठ बंद करून १ – २ दिवस दिवसातून २ वेळा १ पेला लिंबू सरबत प्यावे.
उ. सुंठीचा लेप वाळत आल्यावर पाण्याने धुवावा. त्या ठिकाणची जळजळ सोसत नसल्यास पुन्हा लेप लावू नये. जळजळ थांबण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस चोळावा.
ऊ. चूर्णात पोरकिडे होऊ नयेत, यासाठी ते शीतकपाटात ठेवावे. अन्यथा घरी आणल्यावर एका मासात संपवावे.
३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !
मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण
४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !
हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’