संशमनी वटी हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे प्रसिद्ध औषध आहे.
१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग
हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे प्रसिद्ध औषध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
उपयोग | औषध घेण्याची पद्धत | कालावधी |
---|---|---|
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, तसेच जुनाट ताप, कडकी (अंगात मुरलेला ताप), शरीर क्षीण होणे, पण्डुरोग (हिमोग्लोबिन अल्प असणे), पुष्कळ दिवसांचा खोकला, श्वेतप्रदर (योनीमार्गातून पांढरा स्राव होणे), वीर्यस्राव, थकवा या विकारांवर, तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मेंदू आणि पचनसंस्था यांना बळ देण्यासाठी, कोणत्याही दीर्घकाळ असलेल्या रोगामध्ये आणि गर्भवती, बाळंतीण, लहान मुले, नाजुक प्रकृतीची माणसे, तसेच वृद्ध यांच्यासाठी उपयुक्त | दिवसातून २ – ३ वेळा २ – २ गोळ्या २ घोट पाणी किंवा १ वाटी दूध यांसह घ्याव्यात. गोळ्या दुधासह घ्यायच्या असल्यास रिकाम्या पोटी घ्याव्यात आणि त्यानंतर १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. | ३ मास |
२. सूचना
अ. गोळी चावून किंवा चूर्ण करून घेतल्यास तिची परिणामकारकता वाढते.
आ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात गोळ्यांचे चूर्ण घ्यावे.
३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !
मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण
४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !
हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’