लशुनादि वटी हे एक उत्तम पाचक औषध आहे.
१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग
हे एक उत्तम पाचक औषध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
उपयोग | औषध घेण्याची पद्धत | कालावधी |
---|---|---|
अ. तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, अपचन होणे, खाल्ल्यावर पोट जड होणे, पोटात गॅसेस होणे, वारंवार ढेकर येणे, उचकी आणि अंग थंड पडणे | दिवसातून २ – ३ वेळा २ – २ गोळ्या चघळून खाव्यात किंवा कोमट पाणी किंवा ताक यांसह घ्याव्यात. | १ – २ दिवस |
आ. उलटी आणि अतीसार (जुलाब) | अर्ध्या घंट्याच्या अंतराने दिवसभरात जास्तीतजास्त ५ वेळा २ – २ गोळ्या चघळून खाव्यात. | तात्कालिक |
इ. कृमी (जंत) | दोन्ही जेवणाच्या अर्धा घंटा आधी २ गोळ्या, तसेच गंधर्व हरीतकी वटी २ गोळ्या किंवा १ चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासह घ्यावे. | १५ दिवस |
२. सूचना
अ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.
आ. उष्णतेची लक्षणे (उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे इत्यादी) असतांना आणि मलाचा खडा होत असेल, तर या औषधाचा वापर करू नये.
इ. हे औषध उष्ण असल्याने उन्हाळा आणि पावसाळ्यानंतर येणारा शरद ऋतू (ऑक्टोबर हीट) या काळात जपून वापरावे.
ई. या गोळ्यांमध्ये सैंधव मीठ असल्याने या जास्त वेळ हवेच्या संपर्कात आल्यास हवेतील आर्द्रतेमुळे ओलसर होऊन खराब होतात. तसे होऊ नये, यासाठी डबीचे झाकण घट्ट लावावे.
३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !
मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण
४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !
हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’