लघुमालिनी वसंत हे औषध शरिरातील अग्नीला प्रदीप्त करून जुनाट ताप इत्यादी विकार दूर करणारे आहे.
१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग
हे औषध शरिरातील अग्नीला प्रदीप्त करून जुनाट ताप इत्यादी विकार दूर करणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
उपयोग | औषध घेण्याची पद्धत | कालावधी |
---|---|---|
अ. अंगात मुरलेला ताप, ‘स्प्लीन’ वाढणे, वारंवार अतीसार होणे, शरीर क्षीण होणे, मूळव्याध, भूक न लागणे, रक्तप्रदर (पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे), श्वेतप्रदर (योनीमार्गातून पांढरा स्राव होणे) आणि डोळ्यांचे विकार | सकाळी आणि सायंकाळी १ – २ गोळ्या २ चिमूट पिंपळी चूर्ण आणि १ चमचा मध यांचे मिश्रण / १ वाटी दूध यांसह घ्याव्यात. गोळ्या घेण्यापूर्वी आणि नंतर १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. | १ ते ३ मास |
आ. पावसाळा किंवा हिवाळा या ऋतूंमध्ये थंड वार्याच्या स्पर्शामुळे अंगावर पित्त उठणे आणि खाज येणे | दिवसातून २ – ३ वेळा २ ते ४ गोळ्या अर्धा चमचा मधासह घ्याव्यात. यासह रात्री झोपतांना थोड्या पाण्यासह १ चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे, तसेच सकाळी अंघोळीपूर्वी पाव चमचा मिरपूड २ चमचे तुपातून सर्वांगाला चोळावी. | ७ ते १५ दिवस |
इ. लहान मुलांचा ताप | ३ वर्षांपर्यंतच्या बाळांसाठी अर्धी गोळी आणि त्याहून मोठ्या मुलांसाठी १ गोळी दिवसातून २ – ३ वेळा अर्धा चमचा मधात मिसळून द्यावी. | ५ दिवस |
२. सूचना
अ. तोंड येणे आणि अंगाची आग होणे ही लक्षणे असतांना हे औषध घेऊ नये.
आ. गोळी चावून किंवा बारीक चूर्ण करून घेतल्यास तिची परिणामकारकता वाढते.
३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !
मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण
४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !
हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’