आवळा चूर्ण थंड गुणधर्माचे असून वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखणारे आहे.
१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग
हे औषध थंड गुणधर्माचे असून वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
उपयोग | औषध घेण्याची पद्धत | कालावधी |
---|---|---|
अ. केस गळणे आणि पिकणे | आवळा, गुळवेल आणि गोखरू यांचे समभाग १ चमचा मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यातून घ्यावे. नंतर अर्धा घंटा काही खाऊ-पिऊ नये. | ३ मास |
आ. केस काळे होण्यासाठी | सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा आवळा चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे. नंतर अर्धा घंटा काही खाऊ-पिऊ नये. यासह आठवड्यातून २ वेळा एका लोखंडी कढईत २ ते ४ चमचे आवळा चूर्ण थोड्याशा पाण्यात रात्रभर भिजत घालावे. सकाळी हे काळे झालेले मिश्रण केसांना अर्धा घंटा लावून ठेवावे. नंतर केस धुवावेत. | नेहमी |
इ. डोकेदुखी | सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा आवळा चूर्ण १ चमचा तूप आणि १ चमचा खडीसाखर यांच्या मिश्रणासह खावे. | ३ ते ५ दिवस |
ई. डोके गरम होणे | त्रास होईल तेव्हा पुरेशा प्रमाणात आवळा चूर्ण दुधात वाटून त्याचा कपाळावर लेप लावावा. एका घंट्याने लेप कोमट पाण्याने धुऊन टाकावा. | तात्कालिक |
उ. डोळ्यांचे विकार | रात्री झोपतांना १ चमचा चूर्ण अर्धा चमचा तूप आणि १ चमचा मध यांतून घ्यावे. | ३ मास |
ऊ. नाकातून रक्तस्राव होणे | सकाळी आणि सायंकाळी अर्धा चमचा आवळा चूर्ण अर्धी वाटी पाण्यात मिसळून घ्यावे, तसेच पुरेशा प्रमाणात आवळा चूर्ण तुपात भाजून त्यात ताक मिसळून त्याचा कपाळावर जाडसर लेप करावा. हा लेप १ घंट्यानंतर पाण्याने धुऊन टाकावा. | ३ ते ५ दिवस |
ए. तोंडाला कोरड पडणे | १० मनुका आणि १ चमचा आवळा चूर्ण एकत्र वाटून चटणी बनवावी. याच्या लहान गोळ्या करून त्या दिवसातून ३ – ४ वेळा चघळाव्यात. | ७ दिवस |
ऐ. पित्तामुळे उलट्या होणे | १ चमचा आवळा चूर्ण अर्धा चमचा उगाळलेले चंदन आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण चघळून खावे. | तात्कालिक |
ओ. बद्धकोष्ठता | दोन्ही जेवणांपूर्वी १ चमचा चूर्ण कोमट पाण्यासह घ्यावे. | १५ दिवस |
औ. मधुमेह | सकाळी आणि सायंकाळी १ चमचा आवळा चूर्ण आणि १ चमचा ओल्या हळदीच्या चकत्या वाळवून बनवलेले चूर्ण वाटीभर पाण्यातून घ्यावे. नंतर अर्धा घंटा काही खाऊ-पिऊ नये. | ३ मास |
अं. लघवीला साफ न होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, लघवीला अल्प मात्रेत होणे आणि श्वेतप्रदर (योनीमार्गातून पांढरा स्राव होणे) | १ चमचा आवळा चूर्ण रात्री पाण्यात भिजत घालून त्यात सकाळी अर्धा चमचा जिर्याची पूड आणि १ चमचा खडीसाखर घालून घ्यावे. याप्रमाणे सकाळी आवळा चूर्ण भिजत घालून सायंकाळी घ्यावे. | ५ ते ७ दिवस |
क. हातापायांची आग होणे, गरगरणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे आणि मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे | दिवसातून २ – ३ वेळा १ चमचा आवळा चूर्ण आणि १ चमचा खडीसाखर १ वाटी पाण्यात मिसळून प्यावे. | ७ दिवस |
ख. खरूज | दिवसातून २ – ३ वेळा पुरेशा प्रमाणात आवळा चूर्ण पाण्यात कालवून खरजेच्या ठिकाणी पातळ लेप करावा. १ तासाने हा लेप कोमट पाण्याने धुऊन टाकावा. | ५ ते ७ दिवस |
ग. अकाली वृद्धत्व येऊ नये, यासाठी, तसेच शरीर निरोगी रहाण्यासाठी | सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा आवळा चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे. यानंतर अर्धा घंटा काही खाऊ-पिऊ नये. | ३ मास |
२. सूचना
अ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.’
३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !
मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण
४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !
हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’