मनुष्याने अधर्माचरणाची परिसीमा गाठल्यावर श्रीविष्णूचे सुदर्शनचक्र आपोआप सुटून नरसंहाराला आरंभ होईल !

१. शिशुपालाचे १०० अपराध भरल्यावर श्रीकृष्णाने त्याचा वध करणे

१ अ. शिशुपालाच्या जन्माच्या वेळी झालेली आकाशवाणी
जेव्हा शिशुपालाचा जन्म झाला, तेव्हा त्या बाळाला रूप नव्हते. ते बाळ म्हणजे काळ्या मांसाचा एक विकृत आकार होता. त्याला ३ डोळे आणि ४ हात होते. तेव्हा आकाशवाणी झाली, ‘एका दिव्य पुरुषाची दृष्टी या बाळावर पडली की, त्याला मूळ रूप प्राप्त होईल; मात्र त्याच पुरुषाकडून या बाळाचा मृत्यू होईल.’

१ आ. शिशुपालाच्या आईने श्रीकृष्णाला ‘शिशुपालाचे १०० अपराध पोटात घालण्याची कृपा करावी’, अशी प्रार्थना केल्यावर श्रीकृष्णाने ‘तथास्तु’ म्हणणे
नातेवाईक बाळाला बघायला येतात. तेव्हा श्रीकृष्णही तिथे येतो. श्रीकृष्णाची दृष्टी पडल्यावर लगेच त्या बाळाला मूळ रूप प्राप्त होते. त्या बाळाचा तिसरा डोळा आणि जास्तीचे २ हात अदृश्य होतात. बाळाची आई श्रुतशुभा ही श्रीकृष्णाची आत्या असते. ती श्रीकृष्णाला प्रार्थना करते, ‘शिशुपालाचे १०० अपराध पोटात घालण्याची कृपा करावी.’ त्यावर श्रीकृष्ण ‘तथास्तु’ म्हणतो.

१ इ. शिशुपालाने १०१ वा अपराध केल्यावर श्रीकृष्णाचा सेवक असलेल्या सुदर्शनचक्राने क्षणाचाही विलंब न करता अधर्मी शिशुपालाचा वध करणे
श्रुतशुभाला वाटते, ‘शिशुपाल श्रीकृष्णाच्या संदर्भात १०० अपराध करणारच नाही’; मात्र युधिष्ठिराने आयोजित केलेल्या राजसूय यज्ञात शिशुपाल श्रीकृष्णाचा अपमान करून त्याला नावे ठेवतो. श्रीकृष्ण शिशुपालाचे १०० अपराध होईपर्यंत शांत असतो.

शिशुपालाने १०१ वा अपराध केल्यावर श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र निघते आणि क्षणात शिशुपालाचा वध करते. श्रुतशुभा रडत रडत श्रीकृष्णाला विचारते, ‘‘भगवंता, हे कसे झाले ?’’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो, ‘‘सुदर्शनचक्र माझा सेवक आहे. वेळ आल्यावर ते त्याचे कार्य स्वतःहून करते. ‘शिशुपालाचे १०० अपराध क्षमा करणार’, असे मी तुला वचन दिले होते. मी त्याचे पालन केले. शिशुपालाकडून १०० अपराध होईपर्यंत सुदर्शचक्राने शांतपणे वाट पाहिली. जेव्हा शिशुपालाने १०१ वा अपराध केला, तेव्हा सुदर्शनचक्राला माझ्या आज्ञेचीही आवश्यकता नव्हती. सेवक सुदर्शनचक्राने त्याच्या स्वामींसाठी क्षणाचाही विलंब न करता अधर्मी शिशुपालाचा वध केला.’’

२. आताही कलियुगात श्रीविष्णूचे सुदर्शनचक्र शिशुपालाप्रमाणे मनुष्याने अधर्माचरणाची परिसीमा गाठण्याची वाट बघत आहे. ज्या दिवशी मानव अधर्माचरणाची परिसीमा गाठेल, त्या दिवशी श्रीविष्णूचे सुदर्शनचक्र त्याच्या हातातून आपोआप सुटेल आणि पृथ्वीवरील नरसंहाराला आरंभ होईल.

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९० (२१.१०.२०२१))

Leave a Comment