आपत्काळाची तीव्रता आता इतकी वाढत चालली आहे की, जे देवाचे खरे भक्त असतील, तेच या कठीण काळात टिकाव धरू शकतील. देवाने आता अशी चाळण लावली आहे की, ‘जे समष्टीचा विचार करून साधना करतील आणि ज्यांची देवावर पूर्ण श्रद्धा असेल, त्यांनाच तो पुढे घेऊन जाणार आहे. नाहीतर, आता ‘सुक्यासह ओलेही जळते’, या उक्तीप्रमाणे कधीतरी छंद म्हणून थोडीशी साधना करणारे, कधीतरी देवाचा एक माळ जप करणारे, कधीतरी सायंकाळी देवाचे स्तोत्र म्हणणारे; उपवास, व्रते करणे, देवदर्शनाला जाणे, यांसारख्या कर्मकांडयुक्त कृती करणारे, असे सगळे जण या आपत्काळात भरडले जातील. आता तीव्र साधना करणे आवश्यक आहे. दिवसभर देवाच्या अखंड अनुसंधानात असणारे, तन, मन आणि धन यांचा त्याग करून कायमस्वरूपी राष्ट्र अन् धर्म यांच्या उत्थापनासाठी झटणारे, निःस्वार्थ सेवेचा ध्यास घेतलेले, अखंड सेवारत असलेले साधकच आता पुढे टिकतील. आता देव एवढ्याच लोकांना घेऊन रामराज्याची स्थापना करील. त्यामुळे ‘आम्ही देवाचा एक माळ जप करतो, तर देव आमचे रक्षण करीलच’, या भ्रमात कुणीही राहू नये; कारण आता भक्त प्रल्हादासारखी खडतर साधना करण्याची वेळ जवळ आली आहे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तिरुवण्णमलई, तमिळनाडू. (१८.४.२०२०)