‘व्यवहारात माणसाला अहं असतो, ‘माझे आणि माझ्या घरच्यांचे जीवन मी चालवत आहे. मी नसलो, तर माझ्या मागे माझ्या बायका-पोरांचे, नातलगांचे काय होईल ?’ काही कारणामुळे त्या व्यक्तीचे निधन होते. त्या वेळी देव दाखवून देतो, ‘तो मनुष्य नसतांनाही त्याचे घर चालले आहे. त्याचे कुटुंबीय जीवन जगत आहेत.’ मायेमध्ये जगतांना हे जगणे कठीण असते; कारण ‘मी सर्व करतो’, अशी भावना असल्याने या भावनेमागे दुःख आणि भोग यांची शृंखलाही चालू होते; पण साधना करणार्यांचे असे नसते; कारण साधना करणार्या साधकाचा भाव असतो, ‘माझे काही नाही. सर्व देवाचेच आहे. त्याच्या कृपेनेच मला आणि माझ्या कुटुंबियांना दोन वेळचे अन्न मिळत आहे. देवाच्या कृपेनेच आमचा श्वास चालू आहे.’ त्यामुळे कुटुंबात कुणाचेही निधन झाले, तरी तो त्या परिस्थितीला योग्य पद्धतीने सामोरा जातो. त्याच्या जीवनात भोग असले, तरी त्याला त्या भोगांचे काही वाटत नाही; कारण त्याने त्याचा भार सर्वस्वी देवावर किंवा त्याच्या गुरूंवर टाकलेला असतो.
-श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ