ज्या गुरूंनी जन्मोजन्मी आपल्यासाठी कष्ट घेतले आहेत, त्यांना ‘स्वतः उत्तम शिष्य बनून दाखवणे’, हीच खरी त्यांना आवडणारी गुुरुदक्षिणा असणे
‘आतापर्यंत गुरूंनी आपल्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले आहेत. ‘आपल्या अनेक पूर्वजन्मांमध्ये गुरूंनी आपल्याला कसे सांभाळले असेल ?’, याविषयी कल्पना करणेही कठीण आहे. त्यांनीच आपल्याला जीवनात क्षणोक्षणी सावरले आहे. त्यांच्या अनंत जन्मांच्या कृपेमुळेच आज आपण या देवमार्गाला लागलो आहोत. आपल्या गुरूंनी आपल्याला साधनेत इथपर्यंत आणण्यासाठी केवढे अपार कष्ट घेतले असतील, त्रास सोसले असतील, हे केवळ त्यांनाच ठाऊक ! ते कधीच याविषयी बोलून दाखवणार नाहीत; पण साधना करण्याची जी संधी गुरूंच्या कृपेने आपल्याला लाभली आहे, तिचे आता सार्थक करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत श्री गुरूंनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले आहेत, त्यांप्रती कृतज्ञता म्हणून तरी आपण साधनेत पुढे जाण्यासाठी कष्टाने तीव्र प्रयत्न करायला हवेत, मग कितीही संघर्ष झाला तरी चालेल ! गुरूंना आपण त्यांचा ‘उत्तम शिष्य’ बनून दाखवले पाहिजे. यापेक्षा त्यांना आवडणारी ‘गुरुदक्षिणा’ ती कोणती ?’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ