‘दिवसभर श्रम झाल्यामुळे निसर्गतःच रात्री शरीर थकते, तसेच मन आणि बुद्धी हेही थकतात. रात्री वातावरणातील वाईट शक्तींचा संचार अधिक असल्यामुळे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण येण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे जागरण करून सेवा, विशेषतः बौद्धिक सेवा करतांना सेवेत सुचण्याचे प्रमाण आणि सेवेची गती अल्प होते अन् चुका होण्याची शक्यता वाढते. यामुळे सेवेची फलनिष्पत्ती घटते. जागरणाचे आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. याउलट सकाळी लवकर उठल्यावर शरीर, मन आणि बुद्धी अधिक सक्षम असतांना सेवा केल्यास सेवेतील फलनिष्पत्ती वाढते.
१. काही विद्यार्थ्यांची प्रकृती पहाटे लवकर उठून अभ्यास करण्याची असते, तर काहींची प्रकृती रात्री जागून अभ्यास करण्याची असते. याप्रमाणेच काही साधकांना सकाळी लवकर उठून सेवा करणे चांगले वाटते, तर काहींना रात्री सेवा करणे चांगले वाटते. ज्यांना रात्री सेवा करणे चांगले वाटते, त्यांनी आरंभी नेहमीपेक्षा ५ मिनिटे लवकर झोपायला जाण्याची सवय लावावी. ते जमायला लागल्यावर १० मिनिटे लवकर झोपायला जायचा प्रयत्न करावा. अशा रितीने वेळ पुढे वेळ वाढवत नेऊन लवकर झोपायची सवय करावी. पुढे साधना वाढली की, पहाटे लवकर उठणे सहज शक्य होईल.
२. एखाद्या कारणामुळे रात्रीच सेवा करणे आवश्यक ठरत असेल, तर देवाला मध्ये मध्ये प्रार्थना करून आणि देवाच्या अधिकाधिक अनुसंधानात राहून सेवा करावी.’