विज्ञानातील प्रयोग चुकू शकतो; पण अध्यात्मातील कोणताही प्रयोग चुकत नाही अथवा निष्फळ ठरत नाही !

अध्यात्माचे श्रेष्ठत्व आणि विज्ञानाच्या मर्यादा

कलियुगामधे अनेक लोक विविध वैज्ञानिक प्रयोग करतात. ते सर्व प्रयोग यशस्वी होतातच, असे नाही. कित्येकदा विज्ञानातील प्रयोग चुकल्यामुळे त्यासाठी वापरलेले मनुष्यबळ, आर्थिक गुंतवणूक आणि वेळ अशी सर्व प्रकारची ऊर्जा प्रयोगाच्या अंती वाया जाते, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अध्यात्मात मात्र तसे होत नाही. साधकाने ईश्‍वराला संपूर्ण शरण जाऊन श्रद्धा आणि भक्तीभावाने केलेली कृती त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषकच ठरते. एखाद्या रुग्णाईत व्यक्तीची प्रकृती गंभीर असतांना तो बरा होण्यासाठी औषधोपचार यांसाठी पुष्कळ व्यय केला जातो. आधुनिक वैद्यही शर्थीचे प्रयत्न करतात. एवढे करूनही जर तो रुग्ण मृत झाला, तर विज्ञानाच्या स्तरावर केलेले सर्व प्रयोग निष्फळ ठरतात. याउलट रुग्ण व्यक्ती बरा व्हावा; म्हणून त्याच्या आप्तेष्टांनी देवाचे नामस्मरण केले, पूजा-पाठ केले; पण ती व्यक्ती तिच्या कर्मगतीनुसार मृत्यू पावली, तरीही तिला आध्यात्मिक स्तरावर त्याचा लाभ होतो. त्या व्यक्तीच्या आप्तेष्टांनी केलेल्या नामस्मरण आणि पूजा-पाठ यांतून मिळालेल्या आध्यात्मिक ऊर्जेचा वापर तिच्या मृत्यूत्तर प्रवासासाठी होतो. ही ऊर्जा त्या मृतात्म्याला पुढील चांगली गती मिळवून देते. त्यामुळे अध्यात्मात केलेला कोणताही प्रयोग अथवा कृती कधीही वाया जात नाही. मनुष्याला त्याचा लाभ मिळतोच. यावरून अध्यात्माचे श्रेष्ठत्व आणि विज्ञानाच्या मर्यादा दिसून येतात.

Leave a Comment