बर्याच वेळा साधकांना त्यांच्या भावामुळे स्थुलातून आणि सूक्ष्म स्तरावर अनेक अनुभूती येत असतात. बरेच साधक संतांना याविषयी विचारतात, हे असे का घडले ? तसेच का घडले ? स्वप्नात मला जे दिसले, त्याचे कारण काय ? इत्यादी. या विचारांचा साधकांचे मन आणि त्यांची साधना यांवर परिणाम होतो. आरंभीच्या टप्प्याला एक जिज्ञासू म्हणून या अनुभूतींचे विश्लेषण आणि कार्यकारणभाव जाणून घेणे, योग्य असले, तरी पुढच्या टप्प्याला हे जाणून घेण्याची आवश्यकता रहात नाही; कारण तेव्हा देवच आतून सर्व उत्तरे सांगू लागतो. आपली श्रद्धा वाढली आणि त्याला भावाची जोड मिळाली, तर योग्य काळी अन् वेळीच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्यासाठी आपल्याला वेगळी ऊर्जा व्यय (खर्च) करावी लागत नाही. त्यामुळे साधनाप्रवासाच्या या अथांग महासागरात सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधनेत पुढे जायला हवे. आपण साधनेत जसे पुढे जाऊ, तसे अनुभूतींमध्ये अडकणे, म्हणजे मायाच आहे, हेही लक्षात येते.