सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट असून तरुण मुले-मुली हिंदु संस्कृतीचा र्हास करत असल्याचे दिसणे
‘सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट आहे. तरुण मुले-मुली आपल्या हिंदु संस्कृतीचा र्हास करतांना दिसत आहेत. मुला-मुलींचे कपडे, त्यांची केशरचना आणि मुलींच्या कपाळावर कुंकू नसणे हे सर्व पाहिल्यावर अयोग्य वाटते, एकूणच तरुणांचे राहणीमान, वागणे-बोलणे इत्यादी सर्वच गांभीर्याने विचार करण्याजोगे आहे. साम्यवाद आणि आधुनिकीकरण यांच्या नावाखाली आपण आपली संस्कृती विसरलो आहोत.
पूर्वजांनी दिलेली शिकवण टिकवणे आवश्यक !
आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली शिकवण आपण टिकवू शकलो, तरी पुष्कळ आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीविषयी आज थोडेतरी ठाऊक आहे; पण आपल्या पुढच्या पिढीला तेही ठाऊक नसणार. हे सर्व नामशेष होण्याआधी आपणच ते टिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.