काही जणांमध्ये मनाने करणे, अव्यवस्थितपणा, अनावश्यक बोलणे, अकारण मोठ्या आवाजात बोलणे यांसारखे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू प्रबळ असतात. ते त्यांच्या प्रकृतीत इतके मुरलेेले असतात की, त्यांना त्यांची जाणीवही नसते आणि म्हणून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून त्यांवर मात करणे त्यांना इतरांच्या तुलनेत कठीण जाते. यामुळे त्यांना निराशा येते किंवा प्रक्रिया राबवणेच नको वाटते. श्री गुरुचरित्रात दिल्याप्रमाणे कुष्ठरोग झालेल्या नरहरि नावाच्या ब्राह्मणाने गुरूंवरील श्रद्धेमुळे गुरूंच्या आज्ञेनुसार औदुंबराच्या वाळलेल्या फांदीला ४ वर्षे पाणी घातले. नंतर त्या फांदीला पाने फुटली आणि त्या ब्राह्मणाचा कुष्ठरोगही बरा झाला ! मग आपण स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवावी, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले असल्याने त्याप्रमाणे प्रयत्न केले, तर त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही का ? अवश्य मिळेल; पण त्यासाठी साधकांनी प्रयत्नांची कास धरतांना श्रद्धा आणि सबुरी ठेवायला हवी.