‘ज्ञान’ हे पावित्र्य आणि मांगल्याचे जन्मस्थान आहे; म्हणूनच खर्या अर्थाने ज्ञानी, म्हणजेच विद्वान मनुष्याची किर्ती दूरवर पसरते. असे हे ज्ञान मनाच्याही पलीकडील निर्गुण अवस्थेत गेल्यानंतर जी अनुभूती येते, ते खरे ज्ञान !
खरे ज्ञान हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे !
आपण ‘आपल्याला ज्या गोष्टीचे ज्ञान आहे’, असे म्हणतो, ती खरे म्हणजे त्या गोष्टीची माहिती असते. साठवलेल्या स्मृतीला ‘ज्ञान’ म्हणत नाहीत. मेंदूचे मुख्य काम संगणकाप्रमाणे असते. पंचज्ञानेंद्रियाद्वारे मेंदूला कळणार्या गोष्टी तो साठवून ठेवतो आणि योग्य वेळी त्यांचा उपयोग करतो. त्यामुळे एखाद्या मनुष्याचे पुष्कळ वाचन असेल, त्याला पुष्कळ अनुभव असेल किंवा ऐकीव गोष्टीद्वारे त्याला मिळालेली माहिती असेल, तरी त्याला या माहितीचा उपयोग होतो; म्हणून लोक त्याला ‘ज्ञानी’ म्हणतात. स्मृती जेवढी तीक्ष्ण असेल, तेवढे विविध माध्यमांतून साठवलेल्या माहितीद्वारे त्याला विस्तारित बोलता येते; पण म्हणून हे खरे ज्ञान नव्हे. खरे ज्ञान हे बुद्धीच्या पलीकडील असते. जेव्हा मेंदू स्थिर आणि निराकार होतो, तेव्हा माणसाला ज्ञान स्फुरते. मन आणि मेंदू स्वतंत्र आहेत. मेंदू मनाशी संपर्क साधू शकत नाही; परंतु मन मात्र मेंदूशी संपर्क साधू शकते. खरे ज्ञान हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे.