२१.५.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या संपादकीय लेखामध्ये एका व्यक्तीचे नाव चुकीचे लिहिले गेले. या प्रसंगाला अनुसरून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी चुका का होतात ?’ आणि प्रायश्चित्ताविषयी कसा दृष्टीकोन ठेवावा’, याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे देत आहे.
श्रीरामाप्रमाणे प्रायश्चित्त घ्यायला हवे !
‘सध्या साधक कितीही मोठी चूक झाली, तरी लहान-सहान प्रायश्चित घेतात. चित्तावर पुन्हा चूक होणार नाही’, असे संस्कार होतील, असे प्रायश्चित्त घेतले पाहिजे.
खरे प्रायश्चित्त प्रभु रामचंद्र आणि सीतामातेने घेतले. राज्यातील सामान्य नागरिकाच्या म्हणण्याला महत्त्व देऊन श्रीरामाने पत्नी सीतेचा त्याग केला. वास्तविक सीतेने त्यासाठी अग्नीदिव्य करून आपले पावित्र्य सिद्ध केले होते. सीतेनेसुद्धा रामाच्या निर्णयाला मान्यता दिली होती. अगदी अंतिम स्थितीत सीतेने स्वतःला भूमीत विलीन केले. श्रीरामाला राज्यपद मिळूनही त्याचे जीवन त्यागमयच होते. हे खरे त्यागमय जीवन ! याला प्रायश्चित्त’ म्हणतात.
‘श्रीरामाने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आनंद कसा मिळेल’, असे राज्य केले. त्याने ‘प्रभु श्रीराम’ या शब्दाचे अस्तित्व (भक्ती) प्रत्येकाच्या हृदयात निर्माण केले. त्याने ‘राम’ या शब्दात इतके सामर्थ्य निर्माण केले की, त्याच्या नावाने उद्धार होतो आणि दुष्ट शक्ती निघून जातात. ‘राम’ नामातील सामर्थ्य आजही प्रत्ययास येते आणि कित्येक जिवांना शांती मिळते.