‘कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी दोन्ही सैन्य समोरासमोर उभे होते. अर्जुनाने आपल्यासमोर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि कौरवांना पाहिले, तेव्हा त्याच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की, माझे बांधव, पितामह आणि प्रत्यक्ष माझे गुरु यांना मी मारल्यास मला नरक मिळेल. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितले, ‘‘अरे ! आता हे तुझे बांधव नाहीत. द्रोण हे गुरु नाहीत आणि भीष्म हे पितामह नाहीत. या सर्वांनी आतापर्यंत तुला किती त्रास दिला, ते आठव. तुम्हाला मारण्यासाठी लाक्षागृहाला आग लावली. प्रत्येकाला ठार मारण्यासाठी काय काय उपाय केले. खोटा जुगार खेळून तुम्हाला पराजित केले. द्रौपदीची विटंबना केली, त्या वेळी हे सर्व उपस्थित होते ना ! त्या वेळी त्यांनी दुर्योधनाला किंवा धृतराष्ट्राला कडक शब्दांत सांगितले नाही की, हे तुझे कृत्य धर्माच्या विरुद्ध आहे. एवढेच नव्हे, तर तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार १२ वर्षे वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवासही भोगला आहे. परत येऊन आपले राज्य मागावे, तर दुर्योधनाने तुम्हाला सुईच्या टोकावर मावेल, एवढी भूमीही देण्यास नकार दिला. त्या वेळी हे सर्व उपस्थित होते ना ! दुर्योधनाला ठाऊक होते की, आता हे सर्वजण दुर्बल झाले आहेत. त्यामुळे त्याने अशी भाषा वापरली. त्यानंतर आपण ठरवले की, आता युद्धाशिवाय पर्याय नाही. अशा दुष्ट लोकांशी व्यवहार करतांना त्यांच्याशी शत्रू म्हणूनच वागले पाहिजे. आपण एकदा असे ठरवल्यावर तुला अशी वाईट बुद्धी कशी सुचली ? अरे ! तू जर ठरल्याप्रमाणे युद्ध करणार नसशील, तर हे लोक तुला षंढ म्हणतील आणि तुझा अपमान करतील. आज लोकांच्या मनात तू शूर आणि वीर धर्नुधारी आहेस. तू विजयश्री आणणारा आहेस. अपमान हा मरणाहून अधिक तापदायी आहे. दृष्टांना मोकळे सोडणे, त्यांचे लांगूलचालन करणे, हे महापाप आहे. त्यामुळे तुला नरकात जावे लागेल. त्यासाठी तू ऊठ आणि युद्धाला उभा रहा. अरे, या युद्धात तुला मरण आले, तरी तू वरच्या लोकांत जाशील आणि जिंकलास, तर राज्य भोगशील. जे बोलतात त्याप्रमाणे वागतात, ते खरे शूरवीर असून तेच खरे पूजनीय असतात.’’