समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे ?, असे समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे. समर्थ म्हणजे सम + अर्थ होय. समेला अर्थ आहे. त्यात शक्ती आणि चैतन्य आहे. विठ्ठल दोन विटांवर (द्वैत) उभा आहे, म्हणजे तो समेवर (लाभ होवो किंवा अपलाभ होवो, सर्व सारखे) उभा आहे, याचे दर्शक आहे. त्यामुळे कोटी कोटी ब्रह्मांडांचे ओझे असूनही त्याचा भार त्याला जाणवत नाही; कारण माया भासमान आहे; म्हणूनच तो कमरेवर हात ठेवून निश्चिंतपणे स्वस्थ उभा आहे. तो भक्तासाठी सदैव कार्यतत्पर आहे, याचे हे निदर्शक आहे. त्याला समर्थ असे म्हणतात. असा समर्थ पाठीशी उभा असल्याची ज्याची दृढ श्रद्धा आहे, त्याला कोणत्याही प्रकारची चिंता रहात नाही. अशा प्रकारे तो चिंतामुक्त होऊन भगवंताची सेवा करण्यासाठी निर्भयपणे कार्यरत रहातो.