ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ – ईशावास्योपनिषद, मंत्र १
अर्थ : या जगातील प्रत्येक अणू-रेणूमध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे. तेव्हा त्यागी वृत्ती (संयम) ठेवून जगाचा उपभोग घे. (आपल्या उन्नतीसाठी (प्रभुकार्यासाठी) कार्य कर); परंतु त्याच वेळी कुणाच्या धनाची अभिलाषा बाळगू नकोस.
सध्या ‘बहिर्मुख राहून तसे वागल्याने आणि भगवंताने दिलेली शक्ती स्वतःची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी न वापरल्याने आपण स्वतःच स्वतःची हानी करत आहोत अन् आपले जीवन व्यर्थ घालवत आहोत’, हे आपल्या लक्षातच येत नाही.
संयम ठेवून चांगले वागलो, तर प्रगती होते. स्वेच्छेने आणि अहंयुक्त वागण्याने व्याधी, दुःख आणि त्रास चालू होतो. आपल्यातील स्वभावदोष काढून व्यवस्थित वागणे महत्त्वाचे आहे. नेहमी स्वच्छता करून, म्हणजे आवरण काढून राहिले पाहिजे. त्याला ‘पूजा’ किंवा ‘साधना’ असे म्हणतात. पूजा म्हणजे पूजनीय वस्तूला चैतन्यमय स्थितीत ठेवणे. ही साधना आहे. येथे केवळ चित्र किंवा मूर्ती यांची पूजा अभिप्रेत नाही. विघातक कार्य बंद करून (आवरण काढून) चैतन्य प्रस्थापित करणे, याला ‘पूजा’ म्हणतात.’