पर्यटकांनी आकृष्ट व्हावे; म्हणून सर्वपक्षीय केंद्र आणि राज्य सरकारे जाहिरातींवर प्रतीवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात. वर्ष २०१६ मध्ये केवळ केरळ राज्य ८० कोटी रुपये खर्च करणार आहे ! पाश्चात्त्य विचारसरणीचे अंधानुकरण करणार्या सरकारांनी भारतात आदर्श पर्यटन आयोजित करावे, हे अपेक्षित नाही !
अध्यात्म लाखो जणांना शेकडो वर्षे भारताकडे खेचत आहे. हा केवळ इतिहासच नाही, तर आजही अनेक संतांकडे आणि आध्यात्मिक संस्थांकडे लाखो विदेशी साधना शिकण्यासाठी येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांना हे ज्ञात नाही का ? भारताचा इतिहास हजारो वर्षांचा असल्याने ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी रामसेतू, द्वारका इत्यादी अनेक स्थाने भारतात आहेत, हेही केंद्र आणि राज्य सरकारांना ज्ञात नाही का ?
भारताच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा लाभ घेतल्यास भारताला पुढील लाभ होतील.
१. भारताचे आध्यात्मिक महत्त्व जगाला सांगितले, तर जाहिरातींवर एकही रुपया खर्च न करता पर्यटकांच्या अनेक पटींनी अध्यात्मातील जिज्ञासू भारतात येतील.
२. समुद्र किनारे, मसाज पार्लर, बार (दारूगुत्ते) इत्यादींकडे आकृष्ट होणारे पर्यटक रज-तमप्रधान असतात. त्यांच्यामुळे भारताची सात्त्विकता न्यून होते. याउलट अध्यात्मातील जिज्ञासूंमुळे भारताची सात्त्विकता अल्प होणार नाही. हा अब्जावधी रुपयांपेक्षा महत्त्वाचा लाभ आहे.
३. अध्यात्मातील जिज्ञासूंचे जन्माचे कल्याण होईल; कारण जगात कोठेही उपलब्ध नाही, ते अध्यात्मशास्त्र त्यांना भारतात शिकता येईल. भारतातून परत गेल्यावर त्यांतील काहीजण साधनेला आरंभ करतील आणि त्यांच्या देशातही साधनेसंदर्भात माहिती देतील. त्यामुळे मानवजातीचे भले होण्यास साहाय्य होईल.
अर्थात, हे करणे सर्वधर्मसमभावी राज्यकर्त्यांना अशक्य आहे. हे शक्य होण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले