वैराग्य दाखवण्यापेक्षा मनातील वैराग्य हे अधिक महत्त्वाचे असते. सर्व गोष्टींचा संपूर्ण उपभोग घेत असूनही श्रीकृष्ण मनातून पूर्णतः विरक्त होता. एकदा यमुनेला पूर आलेला होता. यमुनेच्या पलीकडे आलेल्या निराहारी तपस्वी मुनींना भेट म्हणून कृष्णाने आपल्या मित्राला फळे घेऊन जाण्यास सांगितले. मित्राने विचारले, यमुनेला तर पूर आलेला आहे. एकही नावाडी आपली होडी सोडावयास तयार नाही. मग मी कसा जाणार ? कृष्ण म्हणाला, ‘मी जर आजन्म ब्रह्मचारी असेन, तर तू यमुनेवरून चालत जाऊ शकशील’. तो मित्र भूमीवरून चालल्याप्रमाणे पूर आलेल्या यमुनेच्या पात्रातून चालत ऋषींकडे गेला. त्याने ऋषींना फळे अर्पण केली. ऋषींनी फळे खाल्ली आणि त्याला सांगितले, ‘आता तू परत जाऊन कृष्णाला आमचा नमस्कार सांग.’ मित्राला पुन्हा तोच प्रश्न पडला; कारण यमुनेचा पूर काही अजून ओसरला नव्हता. तेव्हा ऋषींनी त्याला सांगितले, ‘मी जर खराखुरा निराहारी असेन, तर तू यमुनेवरून चालत जाशील’. तो मित्र सहजपणे यमुनेवरून चालत परत गेला. जरी कृष्ण अनेक स्त्रियांचा स्वामी असला आणि निराहारी ऋषींनी फळे खाल्ली, असे जरी आपल्याला वरकरणी दिसत असले, तरी ते दोघेही संपूर्ण विरक्त असल्याने कृष्णाने आपले ब्रह्मचारित्व आणि ऋषींनी आपले निराहारित्व टिकवले, म्हणजे त्यांचे कर्म अकर्म कर्म होते.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले. (ख्रिस्ताब्द १९९०)