एका डॉक्टरांनी तेथील एका निराश्रित हिंदु महिलेची करुण कहाणी सांगून तिच्यासाठी संघ काय करील ? असा प्रश्न केला. त्यावर डॉ. हेडगेवार उत्तरले, ‘सध्या संघ काहीही करू शकत नाही. मात्र तुम्ही ते काम अंगावर घेत असाल, तर मी व्यक्तीशः साहाय्य देण्यास तयार आहे’. मग काय करायचा तुमचा संघ ? अशा शब्दांत त्या प्रश्न् विचारणाऱ्या गृहस्थाने असमाधान व्यक्त केले. त्यावर डॉक्टर हसून म्हणाले, ‘मला तुमची मोठी मौज वाटते ! समजा, एखादे मोठे घर पेटलेले असून माडीतल्या लोकांना वाचवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत, त्या वेळी जर कोणी म्हणू लागला की, अहो, सोप्यावरची तुळीपण पेटली आहे, त्यासाठी तुम्ही काही करत नसाल, तर काय उपयोग तुमचा ? तर ते ठीक होईल का ? आपल्या देशाची आज अशीच स्थिती असून समाजात जागृती करण्याचा प्रयत्न संघाने चालवला आहे. ज्यांना दुसरे भाग पेटलेले दिसतात व त्याबद्दल हळहळ वाटते त्यांनी ते कार्य अवश्य करावे; पण संघ म्हणजे संघटित समाज अशी स्थिती निर्माण होईपर्यंत संघच सर्व काही करील, अशी अपेक्षा कशी बाळगता येईल बरे ? तशी स्थिती निर्माण करण्यासाठीच आमची खटपट असून तसे झाल्यावर मात्र संघ काय करील ? असा प्रश्न विचारावाच लागणार नाही’. त्यांनी या उत्तराने सर्वांचे समाधान केले.
– श्री. नाना पालकर (त्रैमासिक लोकजागर, गुढीपाडवा विशेषांक २००९, पृष्ठ २१)