अ. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा !
गर्भपाताला शासनाची संमती आहे, हे खरं; परंतु गर्भजल चिकित्सेविरुद्ध शासकीय कायदे आहेत. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा ! टाईम्सचा लेख (४.७.१९८८) सांगतो की, आता धार्मिक संस्थांनी या कामी पुढाकार घ्यावा. म्हणजे स्त्रियांना गर्भजल चिकित्सेपासून परावृत्त करावे. या बाबतीत कायदा हतबल आहे. अन्य सगळ्या स्त्री-रक्षणकर्त्यांनी, सामाजिक संस्थानी हात टेकले आहेत. (स्त्री-धर्म – ७, भ्रूणहत्या, पृ. १०. लेखक : गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)
आ. तथाकथित सामाजिक सौहार्दापेक्षा धर्मपालन महत्त्वाचे !
जुन्या लोकांत कडवेपणा दिसतो. शास्त्रनिष्ठेच्यापोटी ते सगळे निर्बंध स्वतःवर लादून घेतात. परंपरेचा आचार मोडता येत नाही; म्हणून ते पाळतात. ती नकारात्मक म्हणजे अकरणात्मक भूमिका आहे. असे वागून कसे चालेल ? सामाजिक सौहार्दाला तर इथे तडे जातील. बदलत्या परिस्थितीत हा आचार कसा टिकायचा ? त्याचे उत्तर असे, आचारधर्माचे निर्बंध जर प्रेमाच्या आड येत असतील, तर ते प्रेम मतलबी आहे. ते प्रेमच नव्हे, कृत्रिम आहे. कागदी फुलासारखे नकली! त्या फुलाला कुठे गंध असतो ? या कागदी फुलाकरता का आम्ही आचारधर्म सोडावा ?
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (धर्मशास्त्र, पृ. १३. )