भूजमध्ये जोगीदास नावाच्या डाकूचा खूप दबदबा होता. भूजचा राजाही त्याला घाबरत असे. डाकू असूनही त्याने ब्रह्मचर्य व्रत घेतले होते. एका रात्री एक कामातूर युवती जोगीदासकडे आली. जोगीदास तिच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘माते परत जा’. एकदा घोड्यावर बसून गावात फेरफटका मारत असतांना सकाळी शेतात १८ वर्षांची एक सुंदर युवती एकटीच काम करत होती. जोगीदासने विचारले, ‘तू एकटीच शेतात आहेस. तुला भीती वाटत नाही ?’ मुलगी म्हणाली, ‘जोपर्यंत जोगीदास जिवंत आहे, तोपर्यंत मुलींकडे वाईट नजरेने पहाण्याची कुणाचीही हिंमत नाही’.
कोणाबद्दलही प्रेम किंवा द्वेष नसलेला श्रीकृष्ण !
अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने अभिमन्यूचा मुलगा गर्भावस्थेत मेला. श्रीकृष्ण म्हणाला, ‘माझ्या मनात पांडवांविषयी किंचितही प्रेम किंवा कौरवांविषयी किंचितही द्वेष नसेल, तर हा बालक जिवंत होईल.’ गर्भावस्थेतील बालक जिवंत झाला.
संत झाल्यावरही मूर्तीपूजा करणारे वासुदेवानंद सरस्वती !
एका शिष्याने प.प. टेंब्ये महाराज, म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती यांना विचारले, ‘महाराज आपण स्वतःच देवस्वरूप असतांना स्वतःजवळ मूर्ती का ठेवता ? आता मूर्तीपूजेची काय आवश्यकता आहे ?’ महाराज म्हणाले, ‘ज्या मूर्तीच्या योगाने मला ही परम भाग्याची अवस्था प्राप्त झाली, तिला विसरणे शक्य आहे का ?’
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द २०१०)