कुटुंबकर्ता घरच्या लोकांची अन्न, वस्त्र, निवारा आदी व्यवस्था करतो, त्याचप्रमाणे समाज आणि राष्ट्र यांची व्यवस्था करणारे नेते हवेत !

कुटुंबातच तर सहिष्णुता श्‍वासाश्‍वासातून उमटू शकते. घरच्या लोकांची अन्न, वस्त्र, निवारा आदी व्यवस्था केल्यावर कुटुंबकर्ता आपल्या भोजनादीचा विचार करतो. हेच सूत्र समाज आणि राष्ट्र यांच्या स्थैर्याकरिताही आवश्यक नाही का ? तसेच ग्रामपती हा जर आदर्श कुटुंबघटक असेल, कुटुंबांचे व्यवस्थापन करणारा असेल, तर गावाच्या लोकांचे भोजन आणि निवारा यांचा प्रबंध केल्यावरच स्वतःचे जेवण आणि वस्त्र यांचा विचार करील. तोच न्याय प्रांतपतीकरिता, मुख्यमंत्र्याकरिता. प्रांताच्या अन्नपान, वस्त्र आणि निवारा यांची व्यवस्था त्याने आधी करायची आहे. त्याविना स्वतःची तरतूद करायचा त्याला अधिकारच नाही. राष्ट्रपतीने आधी राष्ट्राची चिंता वाहायची आहे, स्वतःची नव्हे. सर्वस्वाचा होम करायला त्याने सिद्ध व्हायचे आहे. हीच योग्यता, ही परमप्रेमपूर्ण विशाल ममता आणि विश्‍वास नेतृत्वही करू शकतो. मग राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद यात कुठे विरोध उरतो ? दोन्हींचा समन्वय सहज होतो. हे समन्वित स्वरूप व्यक्ती आणि राष्ट्र, व्यष्टी आणि समष्टी यांच्या कल्याणालाच कारणीभूत होणार नाहीका ? – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (वाङ्मय पत्रिका घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक १२.)

Leave a Comment