पहाणे हे तेजतत्त्वाच्या स्तरावरील असते, तर ऐकणे हे आकाशतत्त्वाच्या स्तरावरील असते. त्यामुळे पहाण्यापेक्षा ऐकण्यात अधिक आनंद असतो. एखादी कलाकृती किंवा व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी तिच्याकडे अधिक काळ पहाता येत नाही. त्याचे आणखीन एक कारण म्हणजे तेथे विषय एकच रहातो. याउलट आकाशतत्त्वाच्या स्तरावर विविध विषयांवर बोलता येते; म्हणूनच चित्रे किंवा मूक चित्रपट यांच्यापेक्षा आकाशवाणी अधिक लोकप्रिय असते. पहाण्यातून शिकण्याला मर्यादा येते. तसे ऐकण्यातून शिकतांना होत नाही; म्हणूनच आपल्याकडे वेद, उपनिषदे इत्यादी सर्व पाठांतर करून शिकत असत, वाचून नाही.
यावरून दुसर्याचे ऐकण्याचेही महत्त्व लक्षात येते !
पहाणे आणि ऐकणे हे दोन्ही एकत्र असल्यास ते अधिक परिणामकारक होते, उदा. चित्रपट आणि दूरचित्रवाणी; म्हणूनच हल्ली पहाणे आणि ऐकणे हे दोन्ही एकत्र असलेले दृक्श्राव्य माध्यम वापरण्यात येते. या तत्त्वाचा वापर साधनेसंदर्भातही करणे आवश्यक आहे.
– डॉ. आठवले (१०.१०.२०१३)