राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्यासाठी जीवन वाहून घेण्याची समष्टी साधना करणारे महान कर्मयोगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे !
‘मी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ‘आंतरमहाविद्यालयीन मराठी वाङ्मय मंडळा’ची स्थापना केली. तेव्हा शिवसेनेची ‘विद्यार्थी सेना’ नुकतीच कार्यरत होत होती. तेव्हा कुमार कदम इत्यादी ‘विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांबरोबर माझी जवळीक झाली. तेव्हापासून शिवसेनेबद्दल माझ्या मनात जवळीक निर्माण झाली. ती किती योग्य होती, याची प्रचिती ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदू जनजागृति समिती’ यांच्या कार्याच्या आणि अडचणींच्या वेळी अनेकदा आली आणि येत आहे.
इतर राजकारण्यांच्या तुलनेत बाळासाहेबांचे व्यक्तीमत्त्व फारच निराळे होते. त्यांना पदाची कधी हाव नव्हती. त्यांचे कार्य केवळ राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या हिताशी संबंधित होते. त्यामुळे ते एक प्रकारे कर्मयोगीच होते. या साधनेमुळेच ते आध्यात्मिकदृष्ट्या सर्वसाधारण व्यक्तीच्या बरेच पुढे गेले होते. बाळासाहेबांनी अनुसरलेल्या कर्मयोगाच्या बळावर देहत्यागानंतरही त्यांचे कार्य यापुढेही चालू राहील आणि हिंदूंना त्यांचा आधार मिळत राहील.
शिवसेनाप्रमुखांचे हिंदू राष्ट्र-स्थापनेचे विचार सत्यात आणून दाखवणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ! – प.पू. डॉ. जयंत आठवले, प्रेरणास्थान, ‘सनातन संस्था’
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूने हिंदू समाजाचा भक्कम आधारस्तंभ निखळला आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा परामर्श थोडक्यात पुढीलप्रमाणे घेता येईल.
१. व्यंगचित्रकारिता : राजकीय पक्षांचा दबाव झुगारून निर्भीडपणे व्यंगचित्रे रेखाटली. व्यंगचित्र रेखाटण्यामागे त्यांचा मनोरंजन करणे नव्हे, तर समाजाला राजकारण्यांच्या वास्तव स्वरूपाचे दर्शन घडवणे, हा होता. एक कलाकार म्हणून ते समष्टी जीवन जगले.
२. पत्रकारिता : लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’नंतर त्यांनी ज्वलंत पत्रकारितेचा एक आदर्श उभा केला. त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्यावरील संकटांवर परखडपणे भाष्य केले. पत्रकार-संपादक म्हणून पत्रकारितेचा धर्म आदर्शरित्या पाळला.
३. राजकारण : त्यांनी स्वा. सावरकरांप्रमाणे हिंदू राष्ट्रवादाचा उद्घोष केला. त्यांचे हिंदुत्ववादाचे धोरण राजकीय नव्हते, तर कृतीशील होते. साहाय्यक राजकीय पक्षांच्या चुकांवरही त्यांनी कठोर भाष्य केले. राजकीय नेते असले, तरी स्वतः कधीही राजकीय निवडणूक लढवली नाही. अशा प्रकारे त्यांनी राजकारणात आदर्श मापदंड उभा केला.
४. हिंदूंचे धार्मिक नेतृत्व : ते हिंदूंच्या दृष्टीने एक आधारस्तंभ होते. विशेषतः १९९२-९३ च्या मुंबईतील दंगलींच्या वेळी त्यांनी हिंदू धर्मियांना दिलेला आधार महत्त्वाचा होता. ‘सनातन संस्थे’वर बंदीची टांगती तलवार असतांना शिवसेनाप्रमुख आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी थोडीच आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी संस्कृतीरक्षणाच्या आणि धर्मरक्षणाच्या अनेक परिणामकारक कृती केल्या. खर्या अर्थाने ते ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून जीवन जगले.
५. आध्यात्मिक दृष्टीकोनातून : प्रत्येक कृती आदर्शरित्या पार पाडणे, हे एक प्रकारचे धर्मपालन असते. पत्रकार आणि व्यंगचित्रकार या क्षेत्रांतील त्यांचे कार्य आदर्शवत होते. व्यष्टी साधना म्हणून ते श्री भवानीदेवीची उपासना करत होतेच. धर्मशास्त्रकारांनी धर्मरक्षण ही एक प्रकारची उपासनाच असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेबांनी धर्मरक्षणासाठी कार्य करून, तसेच इतरांना त्यासाठी प्रेरित करून एक
प्रकारची समष्टी साधनाच केली आहे. धर्मपालन, व्यष्टी अन् समष्टी साधना या कृती मनुष्यजन्माची सार्थकता होण्यासाठी पुरेशा ठरतात. या जन्मात केलेल्या या पुण्यकार्याचा त्यांना सद्गती मिळण्यासाठी लाभ होईल, हे निश्चित !
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुखपत्रांतून नेहमीच हिंदू राष्ट्र-स्थापनेचा पुरस्कार केला होता. त्यांचे हे विचार सत्यात आणून दाखवणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !’
– डॉ. आठवले (कार्तिक शुद्ध पक्ष ४, कलियुग वर्ष ५११४ (१७.११.२०१२))