गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस !
भौतिकतेकडे झुकलेल्या समाजाला साधनेकडे वळवणे आणि खर्या शिष्यांना मोक्षाला नेणे, हे गुरूंचे खरे कार्य आहे. खरे शिष्य याच मार्गाचे अनुसरण करून आयुष्यभर समष्टी कार्य करतात. शिष्याने गुरु करत असलेल्या समष्टी कार्यासाठी तन-मन-धनाने समर्पित होणे, ही गुरूंप्रतीची खरी कृतज्ञता होय !
गुरु-शिष्य परंपरेने दिलेले समष्टी योगदान मोठे आहे. या वैभवशाली परंपरेने हिंदु समाजाचे जीवन नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत केले. जेव्हा जेव्हा हिंदु धर्माला ग्लानी आली, तेव्हाही गुरु-शिष्य परंपरेने धर्मसंस्थापनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, हा इतिहास आहे.
आजही हिंदु धर्माला ग्लानी आल्यासारखी परिस्थिती आहे. राजसिक-तामसिक शक्तींचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सात्त्विकतेचा र्हास होऊ लागला आहे. समाज अधर्माचरणी झाल्याने राष्ट्राचे आध्यात्मिक बल क्षीण होऊ लागले आहे. त्यामुळे समाजात दंभ आणि ढोंग वाढले आहे. सर्वत्र भ्रष्टाचार आणि अनैतिकता यांची वाढ होत आहे. धर्माच्या नावाखाली सर्वत्र अनाचार वाढला आहे. थोडक्यात म्हणजे सनातन धर्माचा आत्मा अदृश्य झाला आहे आणि त्याचे प्राणहीन कवच मात्र शेष राहिले आहे. त्यामुळेच धर्मसंस्थापना करणे अपरिहार्य आहे. सध्याच्या काळातील धर्मसंस्थापना म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था असलेल्या धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची स्थापन करणे होय.
धर्मसंस्थापनेसाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज हे घटक आवश्यक आहेत. साधनेच्या बलावर राष्ट्रासाठी आध्यात्मिक बळाची, अर्थात ‘ब्राह्मतेजा’ची जोपासना करण्याचे कार्य बहुतांश संत आणि ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक संस्था करत आहे, तर राष्ट्राची दुःस्थिती पालटण्यासाठी राष्ट्र अन् धर्म प्रेमी संस्था, नियतकालिके आणि विचारवंत अनुक्रमे शारीरिक, मानसिक आणि बौदि्धक स्तरावर प्रत्यक्ष कार्य, अर्थात ‘क्षात्रतेजा’ची जोपासना करत आहेत. या कार्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
अ. शारीरिक : धर्मसंस्थापनेसाठी प्रत्यक्ष देहाने कृती करणे, उदा. प्रत्यक्ष धर्महानी रोखणे, धर्महानीविरुद्ध मोर्चे काढणे इत्यादी. याला काळानुसार १० टक्के महत्त्व आहे.
आ. मानसिक : ‘राष्ट्र अन् धर्म भावना जागृत झाल्याविना कृती होत नाही’, या तत्त्वानुसार हिंदूंचे धर्मसंस्थापनेसाठी प्रबोधन करून त्यांना कृतीप्रवण करणे, उदा. वृत्तपत्रे, नियतकालिके यांत प्रबोधनपर लिखाण करणे, व्याख्याने देणे इत्यादी. यालाही काळानुसार १० टक्के महत्त्व आहे.
इ. बौदि्धक : धर्मसंस्थापनेसाठी हिंदु समाजाला दिशा देणे, उदा. हिंदूंवरील संकटांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करणे, संघटनांना वैचारिक बळ करणे इत्यादी. यालाही काळानुसार १० टक्के महत्त्व आहे.
ई. आध्यात्मिक : धर्मसंस्थापनेच्या शारीरिक, मानसिक आणि बौदि्धक कार्याला आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी उपासना करणे, उदा. एखादे कार्य सिद्धीस जाण्यासाठी नामजप किंवा यज्ञयाग करणे. याला काळानुसार ७० टक्के एवढे प्रचंड महत्त्व आहे.
काळानुसार गुरु-शिष्य परंपरा आणि आध्यात्मिक संप्रदाय यांच्यासह प्रत्येक हिंदूने धर्मसंस्थापनेसाठी स्वक्षमता आणि साधना यांनुसार क्षात्रतेजाचे (शारीरिक, मानसिक आणि बौदि्धक स्तराचे) आणि ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक स्तराचे) कार्य करणे म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जतन करणे होय ! हिंदूंनो, यंदाच्या गुरुपौर्णिमेपासून धर्मसंस्थापनेसाठी असे योगदान देण्यासाठी कार्यरत व्हा आणि हिंदुराष्ट्र स्थापनेच्या ऐतिहासिक अध्यायातील अमरज्योत बना !’