प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
१. साधक : ‘साधक कसा पाहिजे ? जागृत, तत्पर आणि संवेदनशील !
२. यज्ञकर्म : कर्म करतांना त्यात भाव ओतला म्हणजे ते यज्ञकर्म होते. समजून घेऊन भावपूर्ण केलेले कर्म म्हणजे यज्ञकर्म ! त्यातून साधना होते.
३. साधना : मन, इंद्रीय आणि कर्म यांची योग्य सांगड घालून (ज्ञानपूर्ण आणि भावपूर्ण होऊन केलेले कर्म) कर्म समजून घेऊन त्यात भाव ओतून कर्म करणे, म्हणजे साधना !
४. शास्त्र : छायाचित्रकामध्ये जोपर्यंत प्रतिबिंब सुस्पष्ट येत नाही, तोपर्यंत त्याची ‘लेन्स अॅडजस्ट’ करावी लागते; म्हणून तडजोड ही महत्त्वाची भूमिका वठवते. येथे ‘लेन्स’ म्हणजे मन (शुद्ध अंतःकरण), कर्म म्हणजे ज्याची प्रतिमा घ्यायची ते (अनुसंधान साधायचे ते). या दोघांची योग्य सांगड घातली की, प्रतिमा आपल्याला पाहिजे तशी घेता येते, याला ‘शास्त्र’ म्हणतात.
५. मेधा : कोणतेही कर्म यथास्थित कृतीशील होण्यासाठी निर्णयात्मक कुशाग्र बुद्धीने जाणून घेणारी संवेदना (मेधा) म्हणजे ज्ञान ! म्हणजेच आत्मज्ञान !!
६. अभ्यास : कर्म यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध कृतीचा केलेला सराव म्हणजे अभ्यास !
७. भगवंताने हा देह साधना करून ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी दिला असणे : भगवंताने मला हा देह दिला, सर्व इंद्रिये दिली आणि कार्यक्षमता दिली. याच्यासाठी मी देवाला किती पैसे दिले ? तो मला हे सर्व विनामूल्य देत आहे, तर मला त्याची किती जाणीव आहे ? देवाने हे आपल्याला विनामूल्य का दिले ? तर साधना करून ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी. असे असतांना मला त्याची जाणीव का नाही ? प.पू. डॉक्टरांनी साधकांना रहायला हे आश्रम, सर्व सुविधा, महाप्रसाद विनामूल्य दिले आहेत. हे सर्व कशासाठी दिले ? तर साधना करून ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी ! हे जाणूनच आपण साधना केली, तर ती यशस्वी होईल.
८. सतर्कता आणि शरणागती : प्रत्येक कर्म करतांना सतर्कता पाहिजे. ही सतर्कता येण्यासाठी भगवंतासमोर कान धरून त्याला शरण गेले पाहिजे. त्याला प्रार्थना केली पाहिजे आणि कर्म करतांना ते लक्षपूर्वक केले पाहिजे. यासाठी मन, इंद्रिय, कर्म, भाव आणि ज्ञान हे सर्व एका कक्षेत कार्यरत पाहिजेत. असे केल्याने ईश्वरानुसंधान साधले जाते.’
– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.८.२०१६)