भगवंताची वाणी दुसर्‍याला सांगतांना प्रत्येकाने त्यात स्वतःचे मत मिसळल्याने ज्ञानाचे मूळ स्वरूप झाकले जाणे, तर केवळ संतच मूळ सत्य स्वरूपाचे ज्ञान जसेच्या तसे कथन करू शकणे

‘भगवंताची वाणी एकाने दुसर्‍याला सांगतांना (परिवर्तित करतांना) त्यामध्ये प्रत्येक जण स्वतःचे मत मिसळत असतो. त्यामुळे ज्ञानाचे मूळ स्वरूप झाकले जाते. रज-तमाचे आवरण वाढून ते परिवर्तित होते. यामुळे धर्मग्लानी आली आहे. सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रयोग करतात. एका ओळीत २५ सैनिक उभे करतात. पहिला सैनिक एक गुप्त वार्ता दुसर्‍याच्या कानात सांगून, ती वार्ता जशीच्या तशी पुढील सैनिकास सांगण्यास सांगतो. मात्र शेवटच्या सैनिकाला वार्ता मिळेपर्यंत ती वेगळीच झालेली असते; कारण प्रत्येक सैनिक त्यात स्वतःचे मत मिसळून पुढे सांगत असतो. तसेच ईश्‍वरी ज्ञानाच्या बाबतीत आहे. मूळ स्वरूप असेल, तरच आनंद मिळतो.

अनेक पंडितांनी वेदांच्या केलेल्या अनुवादात त्यांच्या त्यांच्या बौद्धिक विकासाप्रमाणे कथन केलेले असल्याने काही ठिकाणी त्यात भेद दिसून येतो; कारण प्रत्येक जण आपल्या विचारांप्रमाणे अर्थ लावतो; प्रत्येक जण आपल्या दृष्टीकोनातून जग पहातो.

याउलट संत ज्ञानेश्‍वर माऊलींसारख्या दिव्य संतांनीच मूळ सत्य स्वरूपाचे ज्ञान जसेच्या तसे कथन केले आहे.’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.६.२०१६)

Leave a Comment