मनुष्याने शाकाहार केल्यामुळे देहातील तमोगुणाचा लय होतो आणि मनुष्य देवसंस्कृतीकडे प्रवास करू लागतो. शाकाहार करणे म्हणजे ‘धर्मपालन करणे’ कसे, नेहमीच्या आहारातील शाकाहारी घटक आणि त्यांची वैशिष्ट्ये, यांविषयी या लेखात पाहू.
१. शाकाहार
अ. व्युत्पत्ती आणि अर्थ
१. शाक + आहार = शाकाहार. ‘शाक’ म्हणजे पवित्र. शाकाहार म्हणजे पवित्र असा आहार
२. ‘शाकः’ म्हणजे वनस्पती. शाकंबरी नावाची देवी आहे.
आ. शाकाहार म्हणजे गर्भजन्य बीजरहित घटक
‘गर्भजन्य बीजरहित घटक’, म्हणजे ज्यात निर्मितीजन्य कनिष्ठ इच्छारूपी प्रकृतीशी संबंधित गर्भधारणा करू शकणारे बीज नाही, असे घटक. वनस्पतीजन्य योनीत तमोगुणाचे प्राबल्य प्राणीजन्य योनीपेक्षा अल्प (कमी) असल्याने त्यांच्यात संभोगातून उत्पन्न होणार्या कामवासना संबंधित निर्मितीचे गर्भजन्य बीज नसते; म्हणून शाकाहाराला ‘गर्भजन्य बीजरहित घटक’, असे म्हणतात.
इ. शाकाहारात मोडणारे अन्नघटक
इतर नैसर्गिक, म्हणजेच दुसर्या प्राणीजन्य जिवांना जन्म देण्याची क्षमता नसलेले गर्भजन्य बीजरहित घटक शाकाहारात मोडतात. ज्यातून कोणत्याही चल सजिवाचा जन्म होऊ शकत नाही, ते अन्न भाव-भावनारहित, म्हणजेच शाकाहारी असते. वनस्पतीजन्य अन्न शाकाहारी असते. दूध, फळे आणि भाज्या या अन्नघटकांतून कोणत्याही प्राणीजन्य चल सजिवाची निर्मिती होत नसल्याने ते शाकाहारात मोडतात.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, फाल्गुन शुद्ध १४, कलियुग वर्ष ५११० १०.३.२००९, रात्री ९.०७)
२. शाकाहाराचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व
अ. ‘शाकाहारात पुरेशी प्रथिने (प्रोटीन्स) असतात.
आ. शाकाहारी लोक चपळ, निरोगी आणि दीर्घायुषी असतात. जॉर्ज बर्नार्ड शॉ कडवे शाकाहारी होते. ते ९४ वर्षांपर्यंत निरोगी जीवन जगले.
इ. पश्चिमेकडील विख्यात व्यक्ती शाकाहारी आहेत. प्लेटो, सॉक्रेटिस, अॅरिस्टॉटल, रुसो, गोल्डस्मिथ, मिल्टन, न्यूटन, शेले, वॉल्टेअर, सीझर, वेजनेट, थोरो, टॉलस्टॉय, फिल्ड मार्शल माँटगोमरी, हॅरी व्हीटक्राफ्ट, ब्रिगेडिअर ग्रॉफी, ट्रागी, अँथोनी क्विनीज, माल्कम, मुगेरीस, पीटर इत्यादी. या सर्वांचे सांगणे असे आहे की, माणूस शाकाहारावर पूर्ण जीवन निरामय जगू शकतो.
ई. आधुनिक विज्ञानाने शाकाहाराचे श्रेष्ठत्व निरपवाद सिद्ध केले आहे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
३. निसर्गनियमानुसार ‘मनुष्याने शाकाहार करणे’, हेच त्याचे धर्मपालन असणे
ईश्वराने सृष्टीची निर्मिती करतांना ‘कोणत्या जिवाने कोणता आहार ग्रहण करावा’, याचे नियम बनवले आहेत. त्यानुसार हिंस्त्र प्राण्यांना दुसर्या प्राण्याची हिंसा करून अन्न भक्षण करणे सोपे जावे, यासाठी लांब सुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण दंतपंक्ती अशी रचना त्यांच्या जबड्यात केली आहे. याउलट मानवाच्या तोंडातील समोरचे दात मांस तोडण्यासाठी असमर्थ असतात. मानवाचे दात शाकाहारी अन्न सहज चावून त्याचे चर्वण करू शकतात. मनुष्याच्या दंतपंक्तींची रचना गायीच्या दातांप्रमाणे असते. निसर्गनियमानुसार गाय केवळ शाकाहारच करते. मनुष्यानेही शाकाहार करणे, हे त्याचे धर्मपालन ठरते.
४. ‘मनुष्याने शाकाहार करणे’, हेच त्याचे धर्मपालन कसे आहे ?
‘शाकाहाराने मनुष्य सत्त्वगुणी बनतो. सत्त्वगुणाच्या संवर्धनाने त्याची आध्यात्मिक उन्नती होते, म्हणजेच नरजन्माचे सार्थक करणार्या सत्त्वगुणी आहाराचे सेवन करणे, म्हणजेच धर्मपालन करणे. धर्मपालन म्हणजेच योग्य आचारसंहितेचा स्वीकार करून त्याप्रमाणे आपले आचरण करून धर्माला, परिणामी ईश्वराला आवडणे. शाकाहारातून देहातील तमोगुणाचा लय होतो आणि मनुष्य देवसंस्कृतीकडे प्रवास करू लागतो. नराचा नारायण बनवण्याचे कार्य शाकाहार करत असल्याने तो करणे, हे धर्मपालन करण्याच्या तोडीचेच आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण द्वादशी ४.३.२००८, रात्री ७.५१)
५. शाकाहारातील काही घटकांची वैशिष्ट्ये आणि परिणाम
अ. गायीचे तूप, तांदूळ, गहू, डाळी आणि धान्य यांच्या सेवनाने सत्त्वगुणाची वृद्धी होऊन माणूस सत्त्वगुणी होतो.
आ. म्हशीच्या तुपाच्या सेवनाने स्निग्धता वाढून रक्तातील स्निग्धाम्लाचे (‘कोलेस्टेरॉल’चे) प्रमाण वाढते, तर गायीच्या तुपाच्या सेवनाने रक्तातील स्निग्धाम्लाचे प्रमाण वाढत नाही.
इ. गायीचे दूध, तूप, फळे आणि पालेभाज्या यांमध्ये श्रीविष्णुतत्त्व जास्त असते. कंदमुळांमध्ये पृथ्वीतत्त्व जास्त असते.
ई. शाकाहारातील तळलेले पदार्थ नियमित खाल्ल्यामुळे रज-तम गुणांची वृद्धी होऊन कामवासना उद्दीपित होतात.
ए. दुधाने सत्त्वगुणाची वृद्धी होते; परंतु दुधावर प्रक्रिया करून इतर पदार्थ (विशेषतः दूध नासवून केलेले पदार्थ) बनवल्यास त्यातील सत्त्वगुण घटून रजोगुण वाढतो.
६. योग्य पेयपान कुठले ?
दिनान्ते च पिबेद्दुग्धं निशान्ते च पिबेत्पयः ।
भोजनान्ते पिबेत्तक्रं किं वैद्यस्य प्रयोजनम् ॥ – सुभाषित
अर्थ : संध्याकाळी (म्हणजे झोपण्यापूर्वी) दूध प्यावे आणि पहाटे (उठल्यावर तोंड धुऊन) पाणी प्यावे, म्हणजे उषःपान करावे. भोजनाच्या शेवटी ताक प्यावे; (मग) वैद्याचे काय काम बरे ?