बेळगाव – पूर्वीच्या काळी भारतीय अध्यात्मशास्त्र अत्यंत प्रगल्भ होते. दुर्दैवाने आताच्या काळात हिंदूंना उपवास का करावा ? देवतेला योग्य पद्धतीने नमस्कार कसा करावा ? हेही माहिती नाही. ते स्वत:च्याच मनाने साधना करत आहेत. त्यामुळे आपल्या जीवनातील संकटे, दु:ख अल्प होत नाही. समाजही धर्मपालन करत नसल्याने तो अधोगतीला गेला आहे. याउलट कलियुगात स्वतःच्या कुलदेवतेचे, तसेच श्री दत्तगुरूंचा नामजप केल्यास जीवनातील दुःखांचे निवारण होऊन तो आनंदाची अनुभूती अनुभवू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या ७ डिसेंबर या दिवशी मौजे नंदीहळ्ळी येथे लक्ष्मी मंदिरासमोर असलेल्या लक्ष्मी चौक येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ यावर आयोजित मार्गदर्शनात बोलत होत्या. याचा लाभ ३५० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. या प्रसंगी व्यासपिठावर सौ. अर्चना घनवट उपस्थित होत्या.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमस्थळी सद्गुरु स्वाती खाडये यांचे आगमन झाल्यावर त्यांनी प्रथम ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले आणि नंतर कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
२. वर्ष १९९५ मध्ये याच ठिकाणी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन झाले होते.