ईश्वर जेव्हा विशिष्ट कार्याच्या पूर्तीसाठी मनुष्य अथवा प्राण्याचे शरीर धारण करून भूलोकी येतो, तेव्हा त्याला ‘अवतार’ असे म्हणतात. भूलोकी धर्माची हानी झाली की, लोक पुरुषार्थहीन होऊन त्यांची वृत्ती अधर्माकडे वळते. सृष्टीत उपद्रव चालू होतात आणि विनाशाची प्रक्रिया वाढू लागते. तो विनाश थांबवून धर्माची घडी पुनः नीट बसवणे आणि मानवाला धर्ममार्गावर आरूढ करणे, याकरिता युगायुगातून भगवंत अवतार घेतो.
भगवंताच्या अनेक अवतारांपैकी दहा प्रमुख अवतार आहेत. त्यांपैकी श्रीराम आणि श्रीकृष्ण हे अधिक प्रचलित आणि उपास्य अवतार होत.
भगवंताचा त्रेतायुगातील अवतार ‘श्रीराम’ आणि द्वापरयुगातला अवतार ‘श्रीकृष्ण’
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळून समाजाला आदर्श घालून दिला; म्हणूनच त्याला ‘मर्यादा-पुरुषोत्तम’ म्हणतात. श्रीरामाशी एकरूप होणे म्हणजे ‘अनेकातून एकात जाणे’. ‘अनेकातून एकाकडे आणि एकातून शून्याकडे’ अशी अध्यात्मात प्रगती असते. येथे शून्य म्हणजे पूर्णावतार श्रीकृष्ण होय. श्रीरामाने संपत्कालात कसे वागावे हे शिकवले, तर श्रीकृष्णाने आपत्कालात कसे वागावे हे शिकवले. श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुनाला गीता सांगून समाजहितासाठीही मार्गदर्शन केले; म्हणून त्याला ‘जगद्गुरु’ म्हटले आहे.
अवतार हा मानवासारखा दिसत असूनही मानव नाही. याचे कारण म्हणजे मानवात असंभव असणारे गुण आणि शक्ती श्रीराम आणि श्रीकृष्ण यांसारख्या अवतारांत असतात. वाल्मिकी, वसिष्ठ, व्यास, पराशर यांसारख्या श्रेष्ठतम ब्रह्मर्षीगणांनीदेखील श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना परमब्रह्मस्वरूप साक्षात् परमात्माच मानले आहे. अनेक उपनिषदांतदेखील श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे साक्षात् परमात्मा म्हणून वर्णन केले आहे.