रामनाथी (गोवा) – ठाणे येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे पुत्र पू. शरदकाका वैशंपायन यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला २ डिसेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. सनातनच्या साधिका सौ. अवनी आळशी यांनी त्यांना आश्रम दाखवून येथे चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्मप्रसार यांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी त्यांच्यासह सांताक्रुझ, मुंबई येथील साधक श्री. राजेश मेसवानी, तसेच योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची त्यांच्या देहत्यागापर्यंत सेवा केलेले सनातनचे साधक श्री. अतुल पवार उपस्थित होते.
१. पू. शरदकाका यांचा सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केला भावपूर्ण सन्मान !
३ डिसेंबर या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात पू. शरदकाका यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी ‘तुमच्या रूपात प्रत्यक्ष योगतज्ञ प.पू. दादाजी आले आहेत’, असे पू. शरद काका यांना भावपूर्ण निवेदन केले. या वेळी श्री. अतुल पवार यांनी आश्रमात आल्यानंतर योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या संदर्भात त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या.
२. योगतज्ञ दादाजी यांना गुरुस्थानी मानणारे त्यांचे सुपुत्र पू. शरदकाका !
योगतज्ञ प.पू. दादाजी आणि पू. शरदकाका यांचे नाते केवळ पिता-पुत्राचे नसून आध्यात्मिक स्तरावर होते. ते योगतज्ञ प.पू. दादाजी यांना गुरुस्थानी मानत होते. योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या प्रवासात, तसेच देश-विदेशात विविध अनुष्ठाने करतांना ते सदैव त्यांच्यासमवेत असायचे.
३. साधक श्री. राजेश मेसवानी यांनी व्यक्त केलेले मनोगत !
अभियंता असलेले श्री. राजेश मेसवानी यांनी आश्रमासंदर्भात म्हटले, ‘येथील सर्व व्यवस्था उत्तम आहे. येथील सर्वांवर गुरूंची कृपा आहे. संशोधन कार्याद्वारे तुम्ही जे अध्यात्म लोकांना वैज्ञानिक पद्धतीने पटवून सांगत आहात, ते अतिशय अप्रतिम आहे. अन्य कुठल्याही आध्यात्मिक संस्थेत मला हे पहायला मिळाले नाही.’
योगतज्ञ दादाजी आणि प.पू. डॉक्टर यांच्यात अतूट प्रेम होते ! – पू. शरदकाकासन्मान सोहळ्याच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतांना पू. शरदकाका म्हणाले, ‘‘मी घरून आश्रमात येण्यासाठी निघतांना मला योगतज्ञ प.पू. दादाजी आणि प.पू. डॉक्टर यांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. प.पू. डॉक्टर हे साक्षात् परमेश्वरच आहेत. प.पू. डॉक्टरांचे योगतज्ञ दादाजींवर अतूट प्रेम होते. एकदा योगतज्ञ प.पू. दादाजी बोलतांना मला म्हणाले होते, ‘माझ्यानंतर तुला गुरुस्थानी प.पू. डॉक्टर आहेत !’ या वेळी त्यांचा आणि उपस्थित साधकांचाही भाव दाटून आला. साधकांविषयी बोलतांना ते म्हणाले, ‘‘योगतज्ञ प.पू. दादाजी यांचे सर्व साधकांवरही पुष्कळ प्रेम होते आणि अजूनही आहे. आश्रमातील साधकांमध्येही मला वेगळेच चैतन्य दिसून आले.’’ |