मलकापूर वैद्यकीय संघटनेच्या वतीने ‘श्री धन्वन्तरि जयंती सोहळा’

मलकापूर (शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर) – सगळ्या वैद्यांनी स्वतःचे आरोग्य अबाधित ठेवत असतांना समाजाचे आरोग्य उत्तम कसे राहील ? यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दीपावलीच्या उत्सवामध्ये गोवत्स पूजन आणि धन्वन्तरि पूजन हे समाजाचे शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे साधक वैद्य संजय गांधी यांनी केले. मलकापूर वैद्यकीय संघटनेच्या वतीने ‘श्री धन्वन्तरि जयंती सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी वैद्य गांधी यांनी नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया यांचे महत्त्व विशद केले. वैद्यकीय संघटनेचे ज्येष्ठ वैद्य भरत पाटील, वैद्य मनोहर पाटील, वैद्य जयवंत पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. या प्रसंगी वैद्य भूषण पाटील, वैद्य जयवंत रणवरे, वैद्य जिनानावर, वैद्य अमोल सोनटक्के, वैद्य अभिजित यादव, वैद्य ओंकार अंबिके, तंत्रज्ञ श्री. सचिन पाटील, औषध विक्रेते श्री. वसंतराव पाटील उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी ओजस आनंद भिंगार्डे यांचे विशेष साहाय्य लाभले.
विशेष
१. प्रारंभी शंखनाद झाल्यावर सर्वांकडून ‘श्री धन्वंतरये नमः’ हा नामजप करवून घेण्यात आला.
२. यापूर्वी ‘डॉक्टर्स डे ’साजरा केला जायचा. त्या ऐवजी शाहूवाडी-मलकापूर वैद्यकीय संघटनेकडून मागील २० वर्षांपासून ‘श्री धन्वन्तरि जयंती सोहळा’ साजरा केला जातो. (इतरत्रच्या वैद्यकीय संघटनांनीही पाश्चात्त्यांच्या प्रथांचा त्याग करून ‘डॉक्टर्स डे’ ऐवजी श्री धन्वन्तरि सोहळा साजरा करावा ! – संपादक)