मुंबई – सनातन संस्था सात्त्विक आचारपालन, धर्मशिक्षण आणि साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे अनेक ‘अॅप्स’ बनवून त्याद्वारे गेली अनेक वर्षे अध्यात्माचा प्रसार करत आहे. यासाठी हे अॅप्स ‘गूगल प्ले स्टोअर’वर विनामूल्य उपलब्ध होते; मात्र ऐन दिवाळीत ८ नोव्हेंबरपासून सनातन संस्थेचे ५ अॅप्स तेथून काढण्यात, म्हणजेच ‘सस्पेंड’ करण्यात आले आहेत. याविषयी ‘गूगल’ने सनातन संस्थेला कुठलीही पूर्वसूचना दिलेली नाही. कारवाई केल्यानंतर गूगलकडून ‘कंटेट रिलेटेड टू मूव्हमेंट्स ऑर ऑर्गनायझेशन्स असोसिएटेड विथ व्हॉयलेंस अगेंस्ट सिव्हिलियन्स’ (नागरिकांविरुद्ध हिंसाचारात गुंतलेल्या संघटनांशी संबंधित माहिती) असल्यामुळे हे ‘अॅप्स’ काढत आहोत’, असे ई-मेलद्वारे कळवण्यात आले. ‘सस्पेंड’ केलेल्या अॅप्सपैकी ‘सनातन चैतन्यवाणी’ अॅपचे ६५ सहस्र वापरकर्ते आहेत. या अॅपमध्ये विविध देवतांचे नामजप, श्लोक, स्तोत्रे आदी आहेत. ‘श्राद्धविधी’ अॅपमध्ये हिंदु धर्मातील ‘श्राद्धकर्म’ याविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती देण्यात आली असून त्याविषयी शंकानिरसनही करण्यात आले आहे. ‘श्री गणेश पूजा आणि आरती’ या अॅपमध्ये श्री गणेशपूजनाविषयी सविस्तर अध्यात्मशास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. या अॅपद्वारे समाजाला साधना आणि धार्मिक कृती चांगल्याप्रकारे करण्यासाठी मार्गदर्शन मिळत आहे. ‘या अॅपमधून हिंसाचाराला प्रोत्साहन कसे काय मिळू शकते ?’, असा प्रश्न सनातन संस्थेने उपस्थित केला आहे.
‘गूगल’ने केलेल्या या कारवाईचा सनातन संस्था निषेध करते, तसेच याविषयी कायदेशीर सल्ला घेत आहे, असेही सनातन संस्थेच्या वतीने कळवण्यात येत आहे. अॅप वापरकर्त्यांसाठी या अॅप्समधील माहिती सनातनच्या Sanatan.org या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध असून सर्वांनी आवर्जून त्याचा लाभ घ्यावा, असेही संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.