सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे.
प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी ‘होमिओपॅथी स्वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !
संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे आणि डॉ. अजित भरमगुडे
अतिसार म्हणजे दिवसातून ५ हून अधिक वेळा जुलाब, म्हणजे पातळ शौचाला होणे. याच्या व्यतिरिक्त पोटात वेदना होणे, पोटात ढवळणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, वारंवार तहान लागणे, वजन कमी होणे, ताप येणे, मळमळणे, उलट्या होणे, निर्जलीकरण (dehydration), ही या आजाराची इतर लक्षणे आहेत. गडद रंगाची लघवी होणे, दिवसभरात लघवी होण्याचे प्रमाण ३-४ वेळांपेक्षा न्यून होणे, त्वचा, तोंड, ओठ, डोळे कोरडे पडणे, डोके दुखणे, थकवा, एकाग्रता नसणे, चक्कर येणे, ही निर्जलीकरण झाल्याची लक्षणे आहेत.
अतिसार हा दूषित आणि अस्वच्छ अन्न अन् पाणी ग्रहण केल्यामुळे होणारा आजार आहे. तीव्र अतिसार सामान्यपणे विषाणू (virus), जिवाणू (bacteria) आणि परजीवी (parasites) यांमुळे होतो. अतिसारामुळे दूषित झालेले पाणी अयोग्य हाताळणीद्वारे पसरते.
जुलाब होण्याची अन्य कारणेही असू शकतात, उदा. ग्रहणी (Irritable bowel syndrome), कंठस्थ ग्रंथीचे कार्य मंद होणे (hypothyroidism), इत्यादी
१. अतिसार होऊ नये / पसरू नये यासाठी काय करावे ?
अ. शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे
आ. अतिसार झालेल्या बाळाचे ‘डायपर’ (diaper) बदल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे
इ. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर हात धुणे
ई. उकळलेले किंवा ‘फिल्टर’ केलेले पाणी पिणे
उ. गरम पेय पिणे
ऊ. नवजात शिशु आणि मुले यांना वयोमानाप्रमाणे आहार देणे
ए. सहा मासापर्यंतच्या बाळांना केवळ स्तनपान करणे
ऐ. खाद्य पदार्थांची योग्य साठवण आणि हाताळणी करणे
ओ. शिळे पदार्थ खाणे टाळणे
औ. तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळणे
अं. निर्जंतुकीकरण (पाश्चराइज) न केलेले दूध पिणे टाळणे
क. रस्त्यावर मिळणारे अन्न पदार्थ (street food) टाळणे
२. निर्जलीकरण (dehydration) रोखण्यासाठी काय करावे ?
कोणत्याही कारणाने अतिसार झाला असला, तरी निर्जलीकरण रोखण्यासाठी ‘जलसंजीवनी’ (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन – ओ.आर्.एस्.) हा उत्तम उपचार आहे. जलसंजीवनी हे पाणी आणि ‘इलेक्ट्रोलाईट’ यांचे मिश्रण आहे. बाजारात ‘ओ.आर्.एस्.’ची तयार पाकिटे मिळतात; परंतु ती उपलब्ध नसल्यास उकळून थंड केलेल्या १ लिटर पाण्यामध्ये ६ चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळून आपण ‘जलसंजीवनी’ द्रावण तयार करू शकतो.
अ. २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रत्येक जुलाबानंतर किमान पाव ते अर्धा कप ‘जलसंजीवनी’ प्यायला द्यावे.
आ. २ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना प्रत्येक शौचानंतर ‘जलसंजीवनी’चा अर्धा ते पूर्ण कप द्यावे.
इ. प्रौढांनी प्रत्येक शौचानंतर १ पेला ‘जलसंजीवनी’ प्यावे.
३. अतिसार झाल्यास तज्ञांचा सल्ला कधी घ्यावा ?
अ. अतिसार २ दिवसांपेक्षा अधिक दिवस चालू रहाणे
आ. निर्जलीकरणाची लक्षणे असणे
इ. पोटात किंवा गुदाशयामध्ये तीव्र वेदना होणे
ई. शौच काळे किंवा कडक असणे
उ. १०२ अंश फॅरन्हाइटपेक्षा अधिक ताप असणे
४. होमिओपॅथीची औषधे
आरंभी दिलेल्या लक्षणांच्या व्यतिरिक्त कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.
४ अ. पोडोफायलम् (Podophyllum)
४ अ १. गढूळ पाण्याप्रमाणे, फेसाळ आणि ‘वर पाणी आणि खाली पिठासारखा थर साचणे’ (Chalk and cheese like stools) यांप्रमाणे जुलाब होणे
४ अ २. शौच अतिशय दुर्गंधीयुक्त असणे
४ अ ३. आहारापेक्षा अधिक प्रमाणात शौच होणे
४ अ ४. शौच करतांना पोटात वेदना न होणे
४ आ. क्रोटोन टिग्लियम (Croton Tiglium)
४ आ १. पिवळसर, पाण्यासारखे जुलाब होणे
४ आ २. पोटामध्ये गडगड असा आवाज, बंदुकीच्या गोळीसारखा स्फोटक आणि मोठा आवाज करत शौच बाहेर पडणे
४ आ ३. थोडे जरी अन्न किंवा पाणी ग्रहण केले, तरी लगेच शौचाला जावे लागणे
४ इ. चायना ऑफिसिनॅलिस (China Officinalis)
४ इ १. फळे खाल्यानंतर जुलाब होणे
४ इ २. दुर्गंधयुक्त, न पचलेले अन्न असलेले जुलाब होणे
४ इ ३. शौच करतांना पोटात वेदना न होणे
४ इ ४. शौच करतांना पुष्कळ प्रमाणात वायू बाहेर पडणे
४ ई. एलो सोकोट्रीना (Aloe Socotrina)
४ ई १. सकाळी लवकर शौचाची कळ येणे आणि त्यावर नियंत्रण रहात नसल्यामुळे अंथरुणातून शौचालयाकडे पळत जावे लागणे
४ ई २. शौचाला जाण्यापूर्वी आणि शौच करतांना पोटामध्ये कापल्याप्रमाणे किंवा आवळल्याप्रमाणे तीव्र वेदना होणे, वेदना शौच केल्यानंतर थांबणे
४ ई ३. शौचानंतर पुष्कळ घाम येऊन थकून आणि गळून जाणे
४ उ. डल्कामारा (Dulcamara)
४ उ १. थंड, दमट, धुके असलेल्या हवामानामुळे किंवा हवामानामध्ये पालट झाल्यामुळे जुलाब होणे
४ उ २. तळघरामध्ये (cellar मध्ये) काम करणार्या व्यक्तींना जुलाब होणे
४ उ ३. बेंबीच्या भोवती वेदना होऊन आंबुस, पाण्यासारखे जुलाब होणे; विशेषत: रात्री जुलाब होणे
४ उ ४. अतिशय गळून जाणे
४ ऊ. पल्सेटिला निग्रिकन्स (Pulsatilla Nigricans)
४ ऊ १. स्निग्ध पदार्थ, आईस्क्रिम खाणेे, थंडी किंवा भीती यांमुळे जुलाब होणे
४ ऊ २. केवळ रात्री, पोटामध्ये तीव्र कळा येऊन जुलाब होणे
४ ऊ ३. शौचाचा रंग, तसेच स्वरूप यांमध्ये वारंवार पालट होणे
४ ए. आर्सेनिकम् आल्बम् (Arsenicum Album)
४ ए १. तांदुळ धुतलेल्या पाण्यासारखे पातळ जुलाब होणे
४ ए २. शौचाला पुष्कळ दुर्गंध येणे
४ ए ३. गुदद्वाराशी आग होणेे
४ ए ४. अस्वस्थता आणि मरणाची भीती वाटणे
४ ए ५. पुष्कळ तहान लागून थोड्या थोड्या अंतराने पुष्कळ वेळा पाणी पिणे
५. बाराक्षार औषधे
५ अ १. फेरम् फॉस्फोरिकम् (Ferrum Phosphoricum)
अ. सतत पाण्यासारखे पातळ, हिरवट जुलाब होणे
आ. न पचलेल्या अन्नाचे जुलाब होणे
इ. कळा न येता जुलाब होणे
५ अ २. मॅग्नेशियम फॉस्फोरिकम् (Magnesium Phosphoricum)
अ. शौच पातळ आणि जोराने बाहेर पडणे
आ. पोटात कळ मारून जुलाब होणे
इ. वायूमुळे पोटात कळा मारणे, पाय पोटापाशी घेतल्याने, तसेच गरम पाण्याने शेकण्याने बरे वाटणे
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत.
आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.