प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी‘‘होमिओपॅथी स्वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !
संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे आणि डॉ. अजित भरमगुडे
पोटातील अन्न आपोआप, जोराने मुखावाटे बाहेर पडणे, याला ‘उलटी होणे’, असे म्हणतात. सामान्यतः पोटाच्या क्षमतेपेक्षा अधिक अन्न ग्रहण करणे, दूषित अन्न ग्रहण करणे इत्यादी कारणांनी उलटी होते. उलटी हे शरिराची पोटातील त्रासदायक घटक बाहेर फेकून द्यायची नैसर्गिक प्रक्रिया आहे. मळमळ होणे, ही या प्रक्रियेतील उलटीच्या आधीची पायरी होय.
जर अति खाणे, यासारख्या साधारण कारणाने उलटी झाली असेल, तर त्यासाठी औषध घ्यायची आवश्यकता नाही. अन्न ग्रहण न करणे किंवा अल्प ग्रहण करणे; तेलकट, मसालेदार पदार्थ, कॉफी इत्यादी टाळणे, यायोगे पोटाला विश्रांती देणे एवढे पुरेसे असते. त्याच्या जोडीला उलटी थांबल्यानंतर २ घंट्यांनी पाणी, सौम्य सार (सूप), तसेच फळाचा रस ग्रहण करू शकतो.
जेव्हा उलटी विशिष्ट आजारामुळे, उदा. अर्धशिशी (migraine), मूत्रपिंडाचा आजार इत्यादींमुळे होत असेल, तेव्हा त्या आजारासाठीचे विशिष्ट उपचार घेणे आवश्यक असते.
उलटी होणे, या लक्षणाच्या व्यतिरिक्त कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.
१. होमिओपॅथीची औषधे
१ अ. इपिकॅकुआन्हा (Ipecacuanha)
१. अन्नामध्ये पालट झाल्यानंतर पोटाच्या तक्रारी चालू होणे; प्रत्येक तक्रारीसह मळमळ आणि कोरडे ढेकर असणे
२. तोंडामध्ये पुष्कळ लाळ साठणे
३. उलटी झाल्यावर बरे न वाटणे
४. जिभेवर थर नसणे
१ आ. आर्सेनिकम् आल्बम् (Arsenicum Album)
१. छातीमध्ये जळजळ होणे
२. अन्नाचा वास सहन न होणे
३. उलटीवाटे अन्न आणि पित्त बाहेर पडणे
४. सतत थोडे थोडे पाणी पिणे
१ इ. फॉस्फोरस (Phosphorus)
मळमळ होत असतांना थंड पाणी ग्रहण करावेसे वाटणे, ते ग्रहण केल्या केल्या मळमळ कमी होणे; परंतु काही मिनिटांतच पोटात जळजळ होऊन लगेच उलटी होणे
१ ई. अँटिमोनियम क्रूडम् (Antimonium Crudum)
१. अति खाणे किंवा पचायला जड पदार्थ ग्रहण करणे, उन्हामध्ये तापणे यांमुळे उलटी होणे
२. अन्न किंवा पेय ग्रहण केल्यानंतर लगेचच उलटी होणे
३. जिभेवर जाड पांढरा थर असणे
१ उ. एथुजा सायनापियम (Aethusa Cynapium)
लहान मुलांमध्ये दूध प्यायल्यानंतर लगेचच उलटी होणे, मूल थकून जाणे
१ ऊ. कॉक्क्युलस इंडिकस (Cocculus Indicus)
कोणत्याही मार्गाने (रस्ता, समुद्र, आकाश मार्गे) प्रवास करणे, यामुळे उलटी होणे
२. बाराक्षार औषध
नेट्रम् फॉस्फोरिकम् (Natrum Phosphoricum) : मळमळ आणि उलटी होणे